समृद्ध जिल्ह्यासाठी नागरीकांचा सहभाग महत्त्वाचा

    दिनांक  02-May-2017
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वार्षिक आढावा मांडला

• जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १ हजार ५२८ कामे पूर्ण

• जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ९१२ मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण

शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्याचा ५७ व्या वर्धापन दिनी ध्वज रोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते.

जिल्ह्यात उद्भवत असलेल्या पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, तीव्र उन्हामुळे पाणीटंचाईची दाहकता जाणवत असल्याने नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.

या खरीप हंगामापासून राज्यभर ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून तालुका हा कृषि विकासाचा घटक निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीचे आरोग्य समजून त्याप्रमाणे पीक घेता यावे, यासाठी मृद आरोग्य पत्रिका वितरण अभियान सुरू आहे. जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये ६० हजार ८७५ मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ४ लाख ४ हजार ९१२ आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.

खरीप हंगामात ७.४८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून त्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यासाठी सोयाबीनच्या १.१५ लाख क्विंटल व कापसाच्या ८.५ लाख बियाणे पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी गतवर्षीपेक्षा जिल्ह्याचे कृषि कर्जाचे उद्दिष्ट ९३ कोटी रूपयांनी वाढवून १४५८ कोटी रूपये निश्चित करण्यात आले आहे.

भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरत असल्याचे सांगत ते म्हणाले, भूजल पातळी वाढवून मोठ्या प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध उपचारांमुळे १२९२ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला.

स्वच्छ भारत मिशन जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीमध्येही जिल्ह्याने भरारी घेतली आहे. जिल्ह्यात ३.७० लाख कुटुंबांपैकी २.१६ लाख कुटुंबाकडे शौचालय आहेत. प्रत्येकाने व्यक्तीगत स्वच्छता पाळून स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे.