मोदींनी मानले सोलापूरकरांचे आभार

    दिनांक  17-May-2017

केंद्र सरकारच्या गेल्या तीन वर्षांतील अनेक यशस्वी योजनांपैकी एक योजना म्हणजे 'गिव्ह इट अप' योजना. योजना जाहीर झाल्यापासूनच देशातील अनेक लोकांनी त्यात सहभागी होण्याविषयी उत्सुकता दाखवली होती. अपेक्षेप्रमाणे त्या लोक सहभागीही झाले. आता या सर्व लोकांचे आभार मानायचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवले आहे. त्यासाठी तसे प्रत्यक्ष त्यांचे पत्रच लोकांना देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातून अनेक जणांनी यात सहभाग नोंदवला होता. त्या सर्वांनाच आता अशी आभारपत्रे वाटण्यात येत आहेत. "महाराष्ट्रातून आणि सोलापूर जिल्ह्यातून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही आता सर्वांचे आभार मानायचे ठरवले आहे. त्यासाठीच अशा आभारपत्रांचे वाटप आम्ही सुरू केले आहे." असे भारत गॅसचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी विजय सेहगल यांनी महाएम.टी.बी.कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Embeded Object

ज्या घरांमध्ये गॅस पोहोचलेला नाही अशा घरांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून घरगुती गॅसला मिळणारे अनुदान सोडण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. देशभरातून त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळाला होता. गेल्या काही महिन्यांत तब्बल दीड कोटींहून अधिक लोकांनी आपल्या घरगुती गॅसला मिळणारे अनुदान 'गिव्ह इट अप' योजनेद्वारे रद्द करून या योजनेत सहभाग घेतला होता. सोलापूर जिल्ह्यातही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. सोलापूर शहरातून तसेच जिल्ह्यातूनही अनेक लोकांना स्वतःहून आपल्या गॅसवरील अनुदान घेण्यास नकार देत या योजनेत सहभाग नोंदवला.

Embeded Object

केंद्र सरकारच्या या योजनेत सहभाग घेतल्याबद्दल केंद्र सरकार, पेट्रोलियम मंत्रालय आणि भारत गॅसतर्फे या सर्वांचे नुकताच आभार मानण्यात आले. देशभर हे कृतज्ञता अभियान सुरू असून योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र व आभाराचा संदेश असलेले त्यांचे एक आभारपत्र देण्यात आले आहे. भारत गॅसच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्याभरात रोज अशा सर्व ग्राहकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Embeded Object