"नाद बागेश्री" च्या निमित्ताने कचरा प्रश्नावर लिहिताना एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील लोक कचरा निर्माण करण्यास जास्त जबाबदार आहेत. आणि त्याची विल्हेवाट लावण्याबाबत कमालीचे बेजबाबदार!
शहरी भागात तयार होण्रार कचरा हा ग्रामीण भागातील कचऱ्यापेक्षा तुलनेने खूपच जास्त आहे. याला कारण म्हणजे शहरातील दाट लोकसंख्या आणि लोकांची अनावश्यक खरेदी!
या सर्व कचऱ्यामध्ये प्लास्टिक व थर्माकॉल चा अविघटनशील कचरा ही डोकेदुखी होऊन बसली आहे. आधुनिक जीवनशैलीचा हा एक दुष्परिणाम. हातात खेळत असलेला पैसा, डोकं गहाण ठेवून बेसुमार खरेदी करण्यास उद्युक्त करतो. गरज आणि चैन ह्यातील फरक समजून न घेता अनावश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. त्या वस्तू प्लास्टिक किंवा थर्मोकॉल मध्ये गुंडाळून येतात. आणि सरते शेवटी तो कचरा; कचरा डेपोची भर करतो.
प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापराचे जेव्हढे प्रयत्न केले जातात तेव्हढे प्रयत्न थर्मोकॉलच्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर करण्यासाठी केले जात नाहीत.

थर्मोकॉल हे वजनाला हलके आणि आकारमानाने मोठे असल्याने त्याची भंगाराची किंमत अगदीच कमी येते. त्यामुळे भंगार गोळा करणारे हा कचरा उचलत नाहीत. तो तसाच कचरा कुंड्यांमध्ये, रस्त्याच्या कडेला पडून राहते. यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबून राहू शकतात.
BARC मधील शात्रज्ञ डॉ. देविदास नाईक यांनी थर्माकोलची विल्हेवाट कशी लावावी यावर सातत्याने संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या पद्धतीने, थर्माकोलचा कचरा जवळ जवळ ९८% नी कमी करता येतो. थर्माकॉल मध्ये साधारण ९८% हवा असते, ती हवा काढून टाकल्यास थर्माकोलच्या कचऱ्याचे आकारमान आवाक्यात येते.
डॉ. नाईक यांनी विकसित केलेली पद्धत अशी आहे - ऍसिटोन हे रसायन एका रुंद तोंडाच्या बाटलीत घेऊन त्यात थर्मोकॉल चे तुकडे टाकून, त्याचे झाकण बंद करून ठेवायचे. हळूहळू थर्मोकॉल त्यात विरघळून त्याची जेली सारखी एक पेस्ट तयार होते. ऍसिटोन संपेपर्यंत तुकडे टाकत राहिल्यास घट्ट लगदा तयार होतो.

या लगद्यापासून कलात्मक वस्तू तयार करता येतात, उदा. शोभेच्या वस्तू, बाउल्स, name plates, ट्रे, व्हास, ज्वेलेरी इत्यादी. या वस्तू रंगवून त्यांना बाजारात चांगली किंमत मिळू शकते. मोठ्या प्रमाणात केल्यास या पासून लहान स्टूल किंवा टिपोय देखील तयार करता येईल. या वस्तू टिकाऊ व मजबूत असतात. अर्थार्जनासाठी हे एक चांगले साधन होऊ शकते.
ऍसिटोन अथवा ‘Nail Polish Remover’ बाजारात सहज उपलब्ध असते. मात्र पहिल्यांदा ते माहितगार व्यक्तीच्या देखरेखीखाली वापरणे आवश्यक आहे.
कोणीही वर दिलेली विघटन प्रक्रिया वापरून कचरा कमी करावा या कळकळीच्या इच्छेमुळे, डॉ. देविदास नाईक या पद्धतीचा प्रचार करतात. अनेक शाळांमध्ये, कॉलेज मध्ये जाऊन याचे प्रयोग दाखवले आहेत.

औद्योगिक क्षेत्रामध्ये पॅकिंग साठी , तसेच गणेशोत्सवाच्या काळात सजावटीसाठी थर्मोकॉल प्रचंड प्रमाणात वापरले जाते. ह्या सोप्या पद्धती मुळे थर्मोकोलच्या कचऱ्याची विल्हेवाट व पुनर्वापर सुलभ होईल.
- अनुजा जोगळेकर