बुलढाण्यातील हातणी व खंडाळा गावांना टँकरने पाणी पुरवठा

    दिनांक  29-Apr-2017


उन्हाळा सुरू होऊनही अनेक गावांना पुरेसा पाणी पुरवठा नाही

बुलढाण्यातील अनेक गावे पाण्यासाठी सध्या टँकरवर अवलंबून आहेत. टप्प्याटप्प्याने पाण्याचे टँकर पुरवण्यावर प्रशासन लक्ष पुरवत असले तरी परिस्थिती गंभीर आहे. आज पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट २ गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहेत. यात हातणी व खंडाळा या गावांचा समावेश आहे.

उन्हाचा तडाखा बसणे अजून कायम असून कित्येक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चिखली तालुक्यातील हातणी गावाची लोकसंख्या १६३६ आहे. त्यासाठी २४ मेट्रीक टन क्षमतेचा १ टँकर दिवसातून दोन फे-यांमध्ये गावांना पाणी पुरवले जाणार आहे. तर मेहकर तालुक्यातील खंडाळा गावातील २२०० लोकसंख्येसाठीसुद्धा २४ मेट्रीक टन क्षमतेचा १ टँकरद्वारे दिवसातून दोन वेळा पाणी पुरवले जाणार आहे.

दोन्ही गावांची तुलना केल्यास खंडाळा गावात ५६४ गावकरी अधिक असूनही सारख्याच प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे आधीच अपु-या पाणी पुरवठ्यात इतका फरक ठेवल्याने शासनाच्या या धोरणाबद्दल ग्रामस्थ नक्कीच चिंताक्रांत असतील.

टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असा निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई निवारण कक्षाने दिला आहे.