पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई ठिबक’प्रणाली

28 Apr 2017 18:55:36

पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन योजना २०१७-१८ अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्डचा नंबर या प्रक्रियासाठी द्यावा लागणार आहे. यासाठी www.mahaethibak.gov.in या संकेतस्थळावरून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे दिली आहे.

आधार कार्ड सक्तीचे केल्याने विना अनुमती सूक्ष्म सिंचन संच लावणा-या शेतक-यांना अनुदान योजना मिळणार नसल्याचेही माहिती अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. १ मे ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करणा-या शेतक-यांना विविध टप्प्यातील माहिती मोबाइलद्वारे थेट कळविण्यात येणार आहे. यासाठी एक अधिकृत मोबाइल क्रमांक नोंदणी करताना देण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या प्रक्रियेत आधार क्रमांक हाच लॉग-इन आयडी म्हणून वापरायचा आहे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत. ई-ठिबक आज्ञावली केंद्र शासनाच्या डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) पोर्टलशी जोडण्यात येत आहे. तसेच अर्जदाराच्या जन्मदिनांकाचा समावेश शेतकरी नोंदणी अर्जामध्ये करण्यात आला आहे.
ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर स्वयंचलीत संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध अनुदान मर्यादेत ऑनलाईन पूर्वसंमती देण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संच बसवून, देयकाची प्रत ई-ठिबक आज्ञावलीवर अपलोड करणे बंधनकारक आहे. ठरवून दिलेल्या काळात देयकाची प्रत अपलोड न केल्यास लाभार्थ्याचा अर्ज आपोआप रद्द करण्याची व्यवस्था आहे. लाभार्थ्याचा अर्ज आपोआप रद्द झाल्यावर पूर्व संमती आपोआप रद्द होईल.

अनुदानासाठी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करायचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ www.mahaethibak.gov.in यावर अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0