सौर उर्जेच्या माध्यमातून गंगापूर धरणावरील जलउपसा केंद्र चालणार

27 Apr 2017 21:16:45


 

महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेसाठी दरवर्षी कोट्यवधींची वीज खर्ची पडते. या खर्चात बचत करून पाणीपुरवठय़ातील तोटा भरून काढण्यासाठी गंगापूर धरणावरील जलउपसा केंद्र सौर ऊर्जेच्या माध्यमातून चालविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी शासन अनुदानातून गंगापूर धरणावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची उभारणी प्रस्तावित आहे.

नाशिक महापालिकेची वाटचाल सध्या आर्थिक डबघाईच्या दिशेने सुरू आहे. नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी महापालिकेला उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांचा अवलंब करतानाच काटकसरीचे धोरणही स्वीकारावे लागणार आहे. त्यामुळे बचतीचा एक भाग म्हणून गंगापूर धरणाच्या मोकळ्या जागेवर सौर उर्जेचे पॅनल बसवून त्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव महापौर रंजना भानसी यांनी पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे.

गंगापूर धरणावरील महापालिकेच्या जलउपसा केंद्र व धरणाच्या भिंतीवर दहा ते पंधरा फूट उंचीवर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्यायोगे वीजनिर्मिती केली जाणार आहे. आ. बाळासाहेब सानप यांचे सहकार्य यासाठी लाभत असून, आ. सानप व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून सौर ऊर्जा निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदान मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले. याद्वारे जलउपसा केंद्रांसाठी दरवर्षी लागणार्‍या कोट्यवधींच्या विजेचीही बचत होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांवर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या वापराद्वारे महापालिकेची आर्थिक बचत साधली जाईल, असेही महापौर भानसी यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0