ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचा कायापालट

27 Apr 2017 21:24:21

 

पर्यटकांचा प्रतिसाद वाढतोय...!

गडकोट किल्ल्यांमध्ये राज्यांत आपले अस्तित्व टिकवून असलेल्या किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा आणि आपली वेगळी ओळख जपत आलेला नळदुर्ग किल्ल्याचा कायापालट झाला आहे. नरमादी धबधबा ही नळदुर्ग किल्ल्याची विशेष ओळख आहे. पावसाळ्यादरम्यान याकिल्ल्याला दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.
तसेच नळदुर्ग आणखी एक ओळख म्हणजे जेजुरीच्या खंडोबारायाचे आणि त्यांची दुसरी पत्नी बानुचा विवाहसोहळा याच नळदुर्गात संपन्न झाला होता. म्हणजे ऐतिहासिक स्थळासोबतच नळदुर्गला मोठी धार्मिक ओळख देखील आहे.  



किल्ल्याचा सुमारे १२५ एकरचा परिसर पाहता सरकारकडून नेमण्यात आलेल्या जेमतेम कर्मचाऱ्यावर देखरेखीचा भार होता. या मोजक्या व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे किल्ल्याच्या भग्न अवस्थेमध्ये दिवसेंदिवस भर पडत गेली. पावसाळ्यातील पंधरा-वीस दिवस वगळता वर्षभर किल्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या द‌ेखील कमीच होती. मागील काही वर्षात याकिल्ल्याचे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर होते. या किल्ल्यात अनेकांनी अतिक्रमण करून या किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न चालविला होता.

मात्र आता या क‌िल्ल्याला युनिटी मल्टिकॉन्सकडून पंचतारांकित लुक देण्यात येऊ लागले असल्यामुळे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. आणि आगामी पावसाळ्यात हे रूप आणखी बहरेल व मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
मागील तीन वर्षांपासून युनिटी मल्टीकॉनच्या माध्यामातून या किल्ल्यातील बोओटी तत्त्वावर विकासकामे केली जात असल्याने किल्ल्याचे रुपडे पालटले आहे.

राज्य शासनाच्या महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजनेतंर्गत सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉनच्या माध्यामातून सामंजस्य करारानुसार २६ ऑगस्ट २०१४ रोजी हा किल्ला संगोपनासाठी हाती घेतला होता. आणि आता सुशोभिकरण व विकासाचे काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे किल्ल्याचे रूप पालटले आहे.

असा आहे नरमादी धबधब्याचा इतिहास
नळदुर्गच्या किल्ल्यातील नरमादी धबधबा १६ व्या शतकात इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या कालखंडात बांधण्यात आला. याच कालखंडामध्ये किल्ल्यातील अनेक वस्तूची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात किल्ल्यामध्येच मुन्सफ कोर्ट व नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण होते. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यानंतर हा प्रदेश भारतात विलिन झाला. व ऐतिहासिक किल्ला केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली आला.

Powered By Sangraha 9.0