'महारेरा'मुळे बांधकाम उद्योगात पारदर्शकता आणि शिस्त येईल – गौतम चटर्जी

27 Apr 2017 22:01:12

 



क्रेडाई-महाराष्ट्रतर्फे पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन


महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट, २०१६ (महारेरा) मुळे बांधकाम उद्योगात पारदर्शकता आणि शिस्त येईल. यामुळे अनेक गोष्टी सुलभ होतील आणि कायदा पाळणाऱ्यांना त्यामुळे कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन सनदी अधिकारी व महाराष्ट्र राज्याचे रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे प्रमुख गौतम चटर्जी यांनी गुरुवारी येथे केले.

'रेरा नियम व नियमन' या विषयावर क्रेडाई-महाराष्ट्रतर्फे पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत चटर्जी बोलत होते. क्रेडाई-नॅशनलचे निर्वाचित अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, क्रेडाई-नॅशनलचे रेरा समिती सदस्य सुहास मर्चंट, क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे आणि अन्य मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




या कार्यक्रमाला विकसक, बांधकाम व्यावसायिक, चार्टर्ड अकाऊंटंट्स आणि कायदातज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी प्रास्ताविक  केले.तसेच राज्यातील ४० शहरांतील १००० पेक्षा अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते.  तसेच  गौतम यांनी क्रेडाई सदस्यांच्या शंकांचे निरसन केले.

'महारेरा'ची निवडक वैशिष्ट्ये समजावून सांगताना चटर्जी म्हणाले, "गृहनिर्माणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. या कायद्याची अधिसूचना काढणारे व त्याची अंमलबजावणी करणारे आपले पहिले राज्य आहे. एक मे २०१७ नंतर बांधकाम उद्योगातील सर्व व्यवहार ऑनलाईन करायचे आहेत. आम्ही 'झिरो फूटफॉल-झिरो पेपर'चे धोरण स्वीकारले आहे. 'महारेरा'मुळे पारदर्शकता आणि शिस्त येईल. त्यामुळे विकसक व त्यांच्या ग्राहकांमध्ये विश्वासाचे नाते तयार होईल. विश्वासाच्या नात्याची ही निर्मिती करणारे आम्ही केवळ माध्यम आहोत. बांधकाम व्यावसायिकांना आम्ही सर्वतोपरी मदत करू."

बांधकाम व्यावसायिकांनी माहिती देताना प्रामाणिकता जपावी, असा सल्ला त्यांनी दिला. "तुम्ही माहितीची जबाबदारी घ्यायला हवी आणि बरोबर माहिती दिली जात असल्याची खात्री करावी. राज्यातील ग्रामीण असो वा शहरी, सर्व भाग या कायद्यांतर्गत येणार आहेत. चुकीच्या माहितीकरता तुम्ही जबाबदार असाल त्यामुळे 'महारेरा'वर आपल्या प्रकल्पांची नोंदणी करण्याचे काम इतरांना सोपविणाऱ्यांनीही माहिती तपासून घ्यावी," असे ते म्हणाले.

यावेळी या प्रसंगी रेराची वैशिष्ट्ये व प्रक्रियांची माहिती देणारे एक पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. क्रेडाईच्या युवक शाखेने हे पुस्तक तयार केले आहे.

Powered By Sangraha 9.0