जगातील सगळ्यात वजनदार महिलेच्या उपचारास डॉक्टरांचा नकार

27 Apr 2017 22:10:27



जगातील सगळ्यात वजनदार महिला इमान अहमदच्या बहिणीने डॉक्टरांवर केलेल्या आरोपांनंतर डॉ. लकडावाला आणि इतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इमानला पुन्हा तिच्या घरी म्हणजेच अबूधाबीला परत घेवून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इमानचे वजन ५०० किलो होते, जे शस्त्रक्रियेनंतर ११७ किलोंवर आले होते. मात्र इमानच्या प्रकृतीत सुधार होत नसल्याचा व डॉक्टर खोटे बोलत आहेत असा आरोप इमानच्या बहिणीने केला होता, ज्यानंतर इमानवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे.

इमानची बहीण शायमा हिने इमानच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्याने तिला हालचाल करता येत नसल्याचा आरोप केला होता. तसेच उपचारानंतर इमानची प्रकृती खालावल्याचे आरोपही तिने केले होते. इमानच्या वैद्यकीय अहवालावर देखील तिच्या बहीणीने शंका व्यक्त केली होती.

उपचारासाठी इमानला इजिप्तहून ११ फेब्रुवारी रोजी मुंबईत आणले होते. तिचे वजन आधी ५०० किलो होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन आणखी वजन कमी करण्यात यश आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी दिली. आधी तिचे वजन २६८ व त्यानंतर १६८ झाले.

Powered By Sangraha 9.0