शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : दीपक सावंत

27 Apr 2017 20:52:25





• जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक

शाश्वत शेती हे येणाऱ्या काळात मिशन असावे. शासनाच्या उन्नत शेती समृध्द शेतकरी या धोरणाचा पुरस्कार करीत आगामी खरीपाचे नियोजन करतांना धानाची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, कृषि सभापती नरेश डहारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर व उपसंचालक माधूरी सोनोने यावेळी उपस्थित होते.

शासनाच्या सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांसाठी सिंचन, वीज पंपाची उपलब्धता, आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर देण्यात यावा. खरीपाचे नियोजन करतांना बि-बिबयाणे, रासायनिक खते, कर्जाचे पुर्नगठण, कर्ज परतफेड, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पिक विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदि बांबींना प्राधान्य देण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देतांना नुकसानीसाठी मंडळस्तराचा निकष लावण्यात येतो. या निकषावर आधारित लाभ देतांना गरजु व खरे लाभार्थी वंचित राहतात अशी बाब जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर उत्तर देत सावंत म्हणाले क, हे निकष बदलण्यासाठी व पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.

Powered By Sangraha 9.0