रासायनिक खत विक्रेत्यांना POS मशीनचे वाटप व प्रशिक्षण

27 Apr 2017 21:59:58


 

केंद्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) प्रकल्पाअंतर्गत खरीप हंगाम 2017-18 मध्ये रासायनिक खताची विक्री POS (Point of Sale) मशीनद्वारे करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची अंमलबजावणी 1 जून 2017 पासून सुरु होणार आहे. त्यानुसार रोकडरहीत व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी व रासायनिक खताची खरेदी विक्री व्यवहार पारदर्शी व सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा आणि शिरुर या तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देऊन POS मशिनचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी MFMS मध्ये नोंदणी असलेल्या बीड तालुक्यातील 96, गेवराई 98, पाटोदा 25, शिरुर 20 आणि आष्टी 18 अशा एकुण 257 विक्रेत्यांना POSमशीनचे वाटप करण्यात आले.

ही POS मशीन आधार क्रमांकाशी लिंक असून खत विक्रेत्याला Mobile Fertiliser Monitoring System (MFMS) मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आय.डी. व पासवर्डद्वारे सदरील POS मशीन कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी विक्रेत्याकडे MFMS ID असणे आवश्यक आहे. रासायनिक खत खरेदी करताना आधार क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांचा अंगठ्याचा ठसा POS मशीनवर घेऊन त्याची पावती शेतकऱ्यांना देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या ताब्यात खताची गोणी गेल्याशिवाय कोणत्याही कंपनीला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे विक्री केलेल्या प्रत्येक गोणीचा हिशोब मिळण्यास मदत होणार आहे.

भविष्यात रासायनिक खतांचे सर्व खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ऑनलाईन होणार असून या बदलाचा सर्व विक्रेत्यांनी स्वीकार करुन त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन बीडचे कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी केले. जे विक्रेते MFMS मशीनमध्ये रजिस्ट्रेशन करणार नाहीत व POSमशीनद्वारे व्यवहार करणार नाहीत त्यांचावर खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खत खरेदी करताना आधार कार्ड नोंदणी करुनच खताची खरेदी करावी. त्याचबरोबर मालवाहतूक (गाडी वाला) करणाऱ्यांकडेही आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

Powered By Sangraha 9.0