'करणी आणि कथनीत फरक पडल्यामुळेच पराभव '- अण्णांचा आपवर हल्लाबोल

26 Apr 2017 15:38:35

दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेचा भाजपकडे झुकलेला कल पाहून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी मोठा झटका बसला आहे. अनेक राजकीय विश्लेषकांकडून जनतेनी आप पक्षाला का नाकारले यावर आपापली मते व्यक्त केली जात आहेत. यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आप पक्ष आणि केजरीवाल यांच्यावर टीका करत पक्षाच्या पराभवाची करणे सांगितले आहेत. ‘केजरीवाल यांच्या करणीत आणि कथनीत अंतर पडल्यामुळेच जनतेने आप पक्षाला नाकारले आहे.’ असे अण्णांनी म्हटले आहे. दिल्ली निवडणुकांमध्ये आप पक्षाला जनतेनी नाकारल्यानंतर अण्णांनी हि प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली.

‘अरविंदने माझा सल्ला ऐकला नाही. त्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला. आप पक्षाला दिल्लीत सत्ता मिळाल्यानंतर दिल्लीकरांच्या आप पक्षाकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे मी अरविंदला दिल्लीकरांसाठी काम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु अरविंदने जे बोलले ते कधीच केले नाही, त्यामुळेच दिल्लीकरांनी आप पक्षाला नाकारले आहे’ असे अण्णा म्हणाले. केजरीवाल यांना सत्तेचा लोभ चढला होता, त्यामुळे सत्ता मिळाल्यानंतर त्यांना जनतेला दिलेल्या वचनांचा विसर पडला असा टोलाही अण्णांनी केजरीवाल यांना लगावला.

तसेच केजरीवाल यांच्याकडून वारंवार इव्हीएम घोटाळ्या संबंधी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचाही अण्णांनी चांगलाच समाचार घेतला. निवडणूक आयोगाने इव्हीएम घोटाळयाप्रकरणी  घोटाळा सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान केले होते. तेव्हा केजरीवाल गप्प का बसले होते, असा प्रश्नही अण्णांनी यावेळी उपस्थित केला.

Powered By Sangraha 9.0