..तर मुंबई भाजपचे नेते २०१९ मध्ये कोकणातून लढणार

    दिनांक  24-Apr-2017   


निमेश वहाळकर, मुंबई, दि. २४

राज्यात सर्वत्र भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरू असताना कोकण भागात मात्र पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. शिवसेनेसोबत युती असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वर्षानुवर्षे काही मतदारसंघांवर मजबूत वर्चस्व राखणाऱ्या भाजपला २०१४ विधानसभा निवडणुकीपासून कोकणात काहीसे ग्रहण लागले असून नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांतही भाजपची कामगिरी खालावलेलीच राहिली आहे. या पार्श्वभूमीवर कोकणचा गडही ‘भाजपमय’ करण्यासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील मतदारसंघांतून मुंबई भाजपचे काही मातब्बर नेते लढण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारमधील भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने आज पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक वार्तालापात ही माहिती दिली. मुंबई भाजपमधील अनेक मातब्बर मराठी नेत्यांची मूळ गावे कोकणात रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आहेत. मात्र, हे नेते मुंबईतच वाढले आहेत व त्यांचे कार्यक्षेत्रही मुंबईच राहिले आहे. दुसरीकडे कोकणात मात्र भाजपकडे जिल्हास्तरावर प्रभावी म्हणावा असा नेता नाही. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली (पूर्वीचा देवगड) या मतदारसंघांमध्ये भाजपची मोठी पीछेहाट झाली आहे. नुकत्याच झालेल्या जि. प. निवडणुकीत तर रत्नागिरीतून भाजपला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध पर्यायांचा भाजप सध्या विचार करत आहे. त्यापैकीच एक म्हणजे, मुंबईतील कोकणी नेत्यांनी पुन्हा कोकणातून निवडणूक लढवणे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती न झाल्यास या पर्यायाचा विचार होऊ शकतो.

मुंबईचे कोकणाशी असलेले आर्थिक व सामाजिक-सांस्कृतिक नाते पाहता भाजपला या डावपेचाचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मुंबईतील अशा नेत्यांमध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे किंवा मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. याची मूळ गावे कोकणात असून कार्यक्षेत्र मुंबई आहे. असे असले तरी हे नेते कोकणाशी संपर्क व प्रभाव टिकवून आहेत. तसेच या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. त्यामुळे अशा भरवशाच्या नेत्यांच्या आधारावर भाजप कोकणचा गड आपला करून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळे २०१९ मध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी या भाजप नेत्यांना कोकणातून लढावे लागू शकेल असे या मंत्र्याने सांगितले.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. तर मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही भाग येतो. रायगड मतदारसंघातून शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री अनंत गीते खासदार आहेत तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. या तीन जिल्ह्यांत मिळून विधानसभेचे १५ मतदारसंघ आहेत. (रायगड- ७, रत्नागिरी- ५, सिंधुदुर्ग- ३) या १५ पैकी भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हेच एकमेव आमदार आहेत. भाजपकडे कोकणात २-३ जिल्ह्यांमध्ये प्रभावी म्हणावा असा चेहरा आज नाही. त्यामुळेच मुंबईतून कोकणात असे नेते पाठवले जाऊ शकतात. याआधी शिवसेनेनेही अशाच मुंबईतील नारायण राणे, रामदास कदम आदी नेत्यांना कोकणात पाठवून त्यांच्याद्वारे आपले हातपाय पसरले होते व ही खेळी बरीच यशस्वी झाली होती.