#ओवी Live - Cotton King

    दिनांक  23-Apr-2017   


रघु आणि रजूची उन्हाळ्याची सुट्टी मस्त मजेत चालू होती! दुपारी मामीने केलेला आमरस, मामाकडून आईस्क्रीम आणि रात्री पूजाताईच्या गोष्टी!

"पूजाताई! आज अजून एक ज्ञानेश्वरीतील ओवी सांग!”, रघुने त्याचा अर्ज पूजाताईला दिला.

"आज एक गंमतीदार गोष्ट सांगते!” असे म्हणून पूजाताई हसू लागली.

“अग, किती हसतेस ताई! अशी आहे तरी काय ही गोष्ट?”, रजू म्हणाली.

“गोष्ट ऐकल्यावर तुम्ही पण हसत बसाल!”, पूजा ताई सांगू लागली.

“ईस. पूर्व ३०० च्या दरम्यान ग्रीक सम्राट अलेक्झांडर भारत जिंकायला आला होता. त्यावेळी ग्रीक लोकांनी भारतात प्रथमच कापसाचे वस्त्र पहिले. अलेक्झांडर बरोबर आलेल्या एका सेनापतीने परत जाऊन असे वर्णन केले की – भारता मध्ये झुडूपांवर लोकर फुलते! ती लोकर अतिशय सुंदर, शुभ्र आणि तलम आहे! ग्रीस मधली कोणतीही लोकर, किंवा कोणतेही वस्त्र इतके सुंदर नाही!”

“हे कर्णोपकर्णी होत, युरोप मध्ये अशी आख्यायिका पसरली की – भारतात एक प्रकारचे झाड आहे, ज्याच्यावर मेंढ्या उगवतात. या मेंढ्या झाडाच्या आजूबाजूचे गवत खातात. गवत संपले, की त्या मेंढ्या मरतात आणि झाड वळून जाते. मग शेतकरी त्या मेंढ्यांची पंढरी शुभ्र लोकर काढून त्यापासून तलम वस्त्र तयार करतो!”, पूजा ताई म्हणाली.

“चल! काही तरीच काय, पूजा ताई!”, रजू म्हणाली.

“अग, रजू खोटे नाही हे. शपथ! लोकांनी या दंतकथेने भारावून, मेंढ्यांच्या झाडावर कविता लिहिल्या होत्या! १८ व्या शतकात लिहिलेल्या Latin कवितेचा अनुवाद पहा -

For in his path he sees a monstrous birth,
the vegetable lamb arises from the earth.
Upon each stalk is fixed a living brute,
a rooted plant bears a four legged fruit.
The animal sleeps by day and wakes at night.
As it is rooted in the ground,
it feeds on grass that is around.

कापसाच्या झाडाची काही चित्रे पण पहा -

 


“शेकडो वर्ष Lamb of Tartary ची विचित्र गोष्ट युरोप भर फिरत होती! इंग्रज भारतात आल्यानंतर मग कुठे सत्य कळले!”, पूजा ताईने सांगितलं.

रघु पोट धरून हसायला लागला! “झाडाला मेंढ्या!!”

“तर या कापसाचे उदाहरण ज्ञानेश्वर सांगतात -

आणि संबंधु तोही ऐसा | मृत्तिके घटु लेकु जैसा |
का पटत्व कापुसा | नातू होय || १४.१२० ||

कृष्ण म्हणतो – अर्जुना! माती पासून तयार झालेला घट मातीच्या लेकाप्रमाणे आहे. कापसापासून तयार झालेले वस्त्र, कापसाच्या नातावाप्रमाणे आहे. कापसा पासून तंतू आणि तंतूपासून पट, म्हणून नातू. तसा माझा आणि जगाचा संबध आहे. हे संपूर्ण विश्व माझ्या पासूनच तयार झाले आहे. म्हणून जगाला बाजूला सारून मला पाहू जाशील, तर मी सापडणार नाही! कारण मीच जगद्रूप आहे!

References

· Connubia Florum, Latino Carmine Demonstrata (1791), Dr. De la Croix