राणे येणार म्हणूनच भाजपने लाल दिवे हटवले..

    दिनांक  19-Apr-2017   

मंत्रालयात रंगल्या विनोदी चर्चा


 

केंद्रीय मंत्रीमंडळाने अधिकृत निर्णय घेऊन व त्यापाठोपाठ राज्य मंत्रीमंडळाने ‘स्वेच्छेने’ लाल दिव्यांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंत्रालय परिसरात अनेक खुसखुशीत विनोदी गप्पांना उधाण आले. त्यापैकीच एक म्हणजे ‘भाजपने नारायण राणे पक्षात येणार म्हणून धसका घेऊन आधीच लाल दिवे हटवले !’. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे कॉंग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. किमान राणे स्वतः भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर राणे जर भाजपमध्ये आले तर त्यांना ‘लाल दिवा’, थोडक्यात मंत्रिपद द्यावे लागेल. मग राणेंना ‘लाल दिवा’ दिला म्हणून पक्षांतर्गत पुन्हा काही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून भाजपने सावधगिरी व ‘दूरदृष्टी’ दाखवत सगळ्यांचेच लाल दिवे काढून घेतले आहेत. जेणेकरून उद्या समजा राणे पक्षात आले तरी त्यांना लाल दिवा मागता येणार नाही, अशा प्रकारच्या चर्चा व हास्यकल्लोळ आज मंत्रालय परिसरात चांगलाच रंगात आला होता.

काहींचे लाल दिव्याचे स्वप्न अखेर अधुरेच !


आपल्याला केव्हा ना केव्हा मंत्रिपद मिळेल व ऐटीत लाल दिव्याच्या गाडीत बसून मिरवता येईल अशा सध्याच्या अनेक आमदारांच्या स्वप्नांवर भाजप सरकारने पाणी फिरवले आहे. शिवसेनेचे विधानसभा आमदार सुनील प्रभू व विधानपरिषद आमदार नीलम गोऱ्हे यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करावा लागेल. प्रभू सेनेचे मुख्य प्रतोद तर गोऱ्हे विधानपरिषदेतील प्रतोद नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने सत्ताधारी पक्षाच्या प्रतोदांना लाल दिव्याची गाडी व राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याची तरतूद करणारे विधेयक आणले होते. यामुळे मंत्रीपदाच्या ‘वेटिंग लिस्ट’मधील प्रभू व गोऱ्हे यांना मंत्रीपद नाही तर किमान मंत्रीपदाचा दर्जा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. आता विधेयक सभागृहात मंजूर होणे वगैरे राहिल्या पुढच्या गोष्टी पण मुळात लाल दिव्याच्या गाड्याच इतिहासजमा झाल्याने ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी या मंडळींची अवस्था झाल्याचे म्हटले जात आहे.

हीच बाब भाजपचे विधानसभा आमदार राज पुरोहित व विधानपरिषद आमदार भाई गिरकर यांचीही. पुरोहित भाजपचे मुख्य प्रतोद तर गिरकर विधानपरिषद प्रतोद. मात्र, हे दोघेही १९९५-९९ च्या युती सरकारच्या कार्यकाळात राज्यमंत्री असल्याने या दोघांनीही ‘लाल दिवा’ काय असतो हे अनुभवलेले आहेच. भाजपचे हे दोघेही आमदार, विशेषतः पुरोहित हे या सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याबद्दल कधी खासगीत तर कधी उघडपणे खंत व्यक्त करत असतात. नुकत्याच आणलेल्या विधेयकामुळे गाडीवरचा ‘लाल दिवा’ अगदी डोळ्यांपुढे चमकू लागल्याने राज पुरोहित भलतेच खुशीत होते. मात्र आता मोदी- फडणवीस जोडगोळीने सगळ्यांचेच लाल दिवे हद्दपार केल्याने या साऱ्यांच्या स्वप्ननगरीत मात्र पुन्हा एकदा ‘अंधार’ पसरला आहे..!