बैलगाडी शर्यतींना ५ लाखांची वेसण ?

    दिनांक  14-Apr-2017   


राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि. ६ एप्रिल रोजी विधिमंडळाने वादग्रस्त बैलगाडी शर्यतींना परवानगी देणारे सुधारणा विधेयक संमत केले. सरकारच्या या कृतीबाबत विविध स्तरांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. बैलगाडी शर्यतींच्या बाजूने असणाऱ्यांनी या विधेयकाचे जल्लोषात स्वागत केले तर प्राणीप्रेमी वर्गातून याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. विधेयक संमत होऊन बैलगाडी शर्यतींच्या आयोजनाला आता मान्यता असे जरी दिसताना दिसत असले तरी, त्यातील दंडाच्या रकमेमुळे व प्राणीमित्रांच्या न्यायालयीन सक्रियतेमुळे बैलगाडी शर्यतींना वेसण बसू शकते.

‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०’ या कायद्यात महाराष्ट्रात लागू होत असताना यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये होणाऱ्या पारंपारिक उत्सव, यात्रा, जत्रांमधील बैलगाडी शर्यतींना परवानगी देणारे विधेयक विधीमंडळात संमत झाले. या विधेयकातील सुधारणेनुसार बैलगाडी शर्यत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने घेण्यात येणार आहेत. तसेच, या शर्यतीत वापरण्यात येणाऱ्या बैल, वळू किंवा तत्सम प्राण्याला कोणत्याही व्यक्तीकडून, किंवा त्याची मालकी असणाऱ्या व्यक्तीकडून कोणतीही वेदना, यातना दिली जाणार नसल्याची प्रमुख अट असेल. अशी यातना दिली गेल्यास त्या व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो अशी तरतूद या नव्या सुधारणेत करण्यात आली आहे. या ‘यातना’ व ‘वेदना’ यांच्या तरतुदींमुळेच काही शक्यता निर्माण झाल्या आहेत.

मुळात बैलगाडी शर्यत घेत असताना असेच अगदी सहजच बैलाला शर्यतीच्या ठिकाणी आणून ‘पळ’ म्हणून सांगून बैल पळत नाही. त्याला त्यासाठी उधळावे, हुसकवावे लागते. यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात. यामध्ये त्याचे शेपूट पिळण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. प्रसंगी अनेकवेळा त्या बैलांना दारूही पाजली जाते असाही प्राणीमित्र संघटनांचा आरोप आहेच. तसेच बैलाच्या शर्यती या दरवेळी बैल राहत असलेल्या गावातच असतात असे नाही. त्या बाहेरगावी असू शकतात. यावेळी बैलाला वाहनाने त्या गावी न्यावे लागते. बैलाला असे नेत असतानाही त्याच्यावर बऱ्याचदा जबरदस्ती करावी लागते. या व अशा अनेक गोष्टी या ‘बैलगाडी शर्यत’ परंपरेत नित्य घडणाऱ्या व अपरिहार्य गोष्टी आहेत.

नव्या सुधारणेत बैलाला त्याच्या मालकाने वा अन्य व्यक्तीने शर्यतकाळादरम्यान यातना/वेदना दिल्यास पाच लाखाच्या दंडाची व तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सुज्ञ प्राणीमित्र या शर्यतीच्या वेळी त्या ठिकाणी गेल्यास त्यांना अशा अनेक गोष्टी आढळून येऊ शकतात ज्या बैलाला क्रूरतेने वागवल्याची उदाहरणे ठरू शकतात. बैलांना मिळणारी ही वागणूक समोर आणली गेल्यास पुन्हा हे प्रकरण न्यायालयात जाऊ शकते. आणि पुन्हा एकदा न्यायालयात ‘प्राणीमित्र विरुद्ध बैलगाडी शर्यत पुरस्कर्ते’ असा सामना रंगू शकतो.

एक शक्यता म्हणून विचार केल्यास, अशा न्यायालयात गेलेल्या प्रकारणापैकी एखादे प्रकरण सिद्ध झाले व त्या व्यक्तीने बैलाला शारीरिक यातना, वेदना दिल्याचे निष्पन्न झाले तर त्या व्यक्तीला पाच लाखांचा फटका बसू शकतो. शर्यतीच्या योग्यतेच्या तगड्या वळू किंवा बैलांच्या किमती साधारण लाखाच्या आसपास असतात. आता बैलाची किंमत एक लाख आणि दंड पाच लाख अशी परिस्थिती एखाद्याच्या बाबतीत उद्भवल्यास त्याचा परिणामही बैलगाडी शर्यत समर्थकांवर होण्याची शक्यता आहे. या साऱ्या शक्यतांचा विचार करता वरकरणी जरी सरकारने हे विधेयक करून राज्यातील पारंपारिक व वादग्रस्त ठरलेल्या बैलगाडी शर्यतींना हिरवा कंदील दाखवल्याचे जरी दिसत असले तरी या आनंदात उधळल्या गेलेल्या ‘बैलांना’ पाच लाखांची वेसणही मोठ्या हुशारीने घातली गेली असल्याचे दिसून येत आहे.

 

निमेश वहाळकर