
समान आवडी निवडी असणाऱ्यांचे सहज सख्य होते. ऑरगॅनिक गार्डन ग्रुप हा असाच बागेची आवड असणाऱ्यांचा ग्रुप आहे. नीला पंचपोर या ग्रुपच्या सदस्य आहेत. नीलाताई व्यवसायाने ICWA असून त्यांचा दिवसातला बराच वेळ व्यवसायासाठी मोडतो. फावल्या वेळात त्या आपला छंद जोपासतात. मॅरेथॉनमध्ये भाग घेणे आणि गच्चीवरच्या बागेत काम करणे नीलाताईना मनापासून आवडते. आता पर्यंत १० किमीच्या ३ मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यासाठी त्या रोज सराव करतात. अशा व्यस्त दिनक्रमामध्येही बागेसाठी त्यांनी खास वेळ राखून ठेवलेला आहे. त्यांची गच्चीतली बाग बघण्याचा योग नुकताच आला. त्यांच्या बागेतील कर्पूर तुळस, ऊस, भोपळा, दोडका, काकडी, वांगी, पालक, झेंडू, लसूण, कांदा, ओवा, टोमॅटो, बटाटे, मुळा, हळद यांना अगदी बहर आला आहे. कुटुंबातल्या सदस्यांची ओळख करून द्यावी अश्या जिव्हाळ्याने त्यांनी आपल्या या झाडांची, रोपांची ओळख करून दिली.
या बागेचे वैशिष्ट्य असे की, ही सगळी झाडे अक्षरशः कशातही रुजली आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या, बादल्या, ड्रम, फुटकी कुंडी यामध्ये अगदी ऐसपैस पसरली आहेत. अशा विविध 'कुंड्या' त्यांनी भंगारवाल्याकडून घेतल्या आहेत.
आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, ही बाग माती विरहित आहे. सर्व वाफ्या मध्ये शेणखत, पालापाचोळा व ओला कचरा याचा वापर केलेला आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात त्यांची बाग तयार झाली आहे!

या झाडांनी आणि वेलींनी नीलाताईंच्या काळजी घेणाऱ्या हातात स्वतःला अगदी बिनधास्त सुपूर्द केलं आहे.
बागेची अगदी निगुतीने देखभाल होतेय हे या रसरशीत झाडांकडे बघूनच लक्षात येत होतं. भाजीपाल्याच्या वाफ्यामध्ये झेंडू, कांदा, लसूण, मोहरी लावली होती. कांदा लसणी मुळे इतर भाजीपाल्याला कीड लागत नाही. तसेच मोहरीचे झाड पण कीड आकर्षून घेते त्यामुळे इतर झाडांचं किडी पासून संरक्षण होतं. झाडांचे किडी पासून संरक्षण करण्याचा अत्यंत नैसर्गिक उपाय!

फुलपाखरे व मधमाश्या हळदी कुंकू ( हे एका झाडाचे नाव), मधुपर्णी, कर्पूर तुळस अशा सारख्या झाडांकडे लगेच आकर्षित होतात. त्यामुळे त्यांच्या ह्या बागेत मधमाश्या, फुलपाखरे यांचा अगदी मुक्त संचार आहे. पक्ष्यांनी सुद्धा हक्काने घरटी बांधली आहेत.
झाडांना पाणी घालण्यासाठी स्प्रिंकलर्स न बसवता त्या स्वतः रोज पाणी घालतात. त्यानिमित्ताने प्रत्येक झाड रोज नजरेखालून जाते. कीड लागली असेल तर वेळीच लक्षात येते. व त्यावर लगेच उपाय करता येतो. रोज संवाद होतो त्यांच्याबरोबर!

आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला वेळोवेळी जशी पौष्टिक अन्नाची गरज असते तशीच गरज या झाडांनाही असते. त्यासाठी आवश्यक तेंव्हा खत आणि जीवामृत घातले जाते. हे जीवामृत त्या घराच्या घरीच बनवतात.
झाडांसाठी खतसुद्धा घरीच बनवले जाते. त्यांच्या घरासमोर पशुपतीचे झाड आहे. या झाडाचा पालापाचोळा खूप पडतो. पहाटे jogging ला जाण्याआधी त्या त्याचा पाला पाचोळा या खतासाठी गोळा करतात. घरासमोरील अंगणात हा पाला पाचोळा, कचरा आणि culture टाकून खत तयार केले जाते. अधून मधून या थरावर पाणी मारावे लागते. २ ते ३ महिन्यात हे खत तयार होते. पाला पाचोळा जाळून टाकण्यापेक्षा खतासाठी त्याचा असा उत्तम उपयोग होतो. पोती, प्लास्टिक पिशवी, बादली यामध्ये खत बनवले जाते. 
बागकामाचा छंद असणाऱ्यांसाठी 'इनोरा' गार्डन क्लब त्या गेली सहा सात वर्ष चालवत आहेत. या क्लबद्वारे खत व गांडूळ खत उपलब्ध करून दिले जाते. या बागेच्या माध्यमातून नीला ताईंचा जनसंपर्क खूपच वाढला.
त्यांच्या यजमानांबरोबरच त्यांच्या मुलानेही आईची बागेची आवड जोपासली आहे. बागेबद्दल भरभरून बोलताना पंचपोर म्हणाले, दिवसागणिक फुलणारी ही बाग बघताना आम्हाला अक्षरशः 'क्षणिक मोक्षप्राप्तीचा' आनंद होतो.... खरंय.!!
- अनुजा जोगळेकर