सलमान तू ग्रेट आहेस!

12 Apr 2017 15:04:07

सलमान तू खरोखरीच भाग्यवान आहेस बाबा! काय नशीब घेऊन जन्माला आला आहेस तू? गुन्हा केला तरी तो न केल्याचे सिद्ध करणारी वकिलांची फौज उभी करण्याची ताकद काय गवसली, तुला तर कायदा पायदळी तुडवण्याचा परवानाच मिळाला गड्या. तू दारूच्या नशेत, रस्ता सोडून फुटपाथवरून गाडी चालवली, जिवंत माणसांच्या अंगावरून ती गाडी गेली, काही लोक जखमी झाले, एक जण दगावला, सेशन कोर्टाने पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षाही ठोठावली तरी वरिष्ठ न्यायालयात बाईज्जत बरी झालास तू अन् आता पुन्हा एकदा सहीसलामत सुटलास काळवीट शिकारीच्या प्रकरणात. असेल असेल! त्यावेळी गाडीही तू चालवलेली नसणार अन् राजस्थानातल्या जंगलातल्या त्या काळवीटानं तर तुझ्या हातातली बंदूक घेऊन स्वत:च स्वत:वर गोळी झाडून घेतली असणार! तुझ्यासारखा एवढा मोठा माणूस जंगलात आलाय् म्हटल्यावर शिकारीच्या तुझ्या छंदाचा अंदाज आला असणार त्यालाही. भविष्यात काही नतद्रष्ट लोक यावरून कोर्टात खेचून तुझा अकारण छळ करणार याचीही खात्री असणार त्या काळवीटाला.
 
त्या घटनेत तो जिवंत राहिला असता ना, तर स्वत:च कोर्टात येऊन साक्ष दिली असती त्यानं, तू निर्दोष असल्याची. पण हरकत नाही काळवीटाचे काम आता इथल्या न्यायव्यवस्थेने केले आहे. माणूस श्रीमंत असला, सेलेब्रिटी असला की तसेही या देशात त्यांचे फारसे कोणी काही बिघडवू शकत नाही. सलमान, तुझ्या निमित्ताने परवा ही बाब नव्याने सिद्ध झाली आहे. या देशातला कुठलाच कायदा बड्या धेंडांना लागू होत नाही बहुधा! कायद्याचा बडगा उगारण्यासाठी गोरगरीब, सर्वसामान्य लोकांची मोठी गर्दी उपलब्ध असताना तुझ्यासारख्या सेलेब्रिटीजच्या मानेभोवती कोण आवळणार रे कायद्याचा फास? त्यामुळे तू रस्त्याने फिरताना माणसांचा बळी घेतला काय किंवा जंगलात जाऊन जनावरांची शिकार केली काय, तुझ्या केसालाही कधी धक्का लागणार नाही बघ इथे. अरे कायद्याची पत्रास बाळगायला तू काय सामान्य माणूस आहेस? हिरो आहेस तू हिरो. या देशातले लोक डोक्यावर घेऊन नाचतात तुला. चित्रपटात नुसता अंगातला शर्ट काढून हिंडला तरी पोरी फिदा होतात लेका तुझ्यावर.
 
त्याच सर्वसामान्यांच्या जिवावर करोडो रुपये कमावून तू मुजोरी केली नाहीस तरच नवल! तशी ती तू करतोसही. काय तो तोरा असतो बाबा तुझा! काय तुझी ती स्टाईल. कुठला तो ‘बिग बॉस’ नावाचा तद्दन फालतू कार्यक्रम. पण स्वत:च्या जिवावर पाऽऽर लोकप्रिय केलास तू. पब्लिक जाम खुश आहे मित्रा तुझ्यावर! आपल्या देशातल्या झाडून सार्‍या व्यवस्था अशा बड्या लोकांच्या चरणी लीन होण्यासाठीच अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे सलमान खान नावाची एक सेलेब्रिटी संकटात सापडलीय् म्हटल्यावर सर्वांनी तुझ्या मदतीला धावून येणे तर क्रमप्राप्तच होते. तू त्या फुटपाथवरच्या निष्पाप लोकांच्या अंगावरून गाडी चालवली. नरुल्ला नावाचा एक मजूर दगावला त्यात. तू दारू पिऊन बेधुंद अवस्थेत गाडी चालवत होतास म्हणे त्यावेळी? पण खरं सांग, काही बिघडलं तुझं? काडीचाही परिणाम झाला तुझ्यावर? तेरा वर्षे केस चालली. तरी तू आपला मोकळाच.
 
या काळात किती गाजलेले चित्रपट काढलेस, चिक्कार पैसा कमावला. त्यातून व्यवस्था विकत घेण्याचे कौशल्य आणि बळ कमावले. केस चालत राहिली कोर्टात. तू दारू प्यायलेला नव्हताच इथपासून तर गाडी तू चालवत नव्हतासच, इथपर्यंतची विधानं हा हा म्हणता बदलली तुझ्या बाजूच्या अन् विरोधातल्या साक्षीदारांनी. या देशात दारू तयारच होत नाही तर तू पिणार कुठून, असे म्हणायलाही कमी करणार नाही इथली सिस्टीम अन् ठामपणे उभी राहील बघ तुझ्या पाठीशी. तसेही फुटपाथ ही काय झोपण्याची जागा आहे? रात्री अपरात्री दारू ढोसून (सॉरी! पार्टी एन्जॉय करून) सलमान खान या रस्त्याने जाणार म्हटल्यावर सावध राहायला नको होतं त्यांनी स्वत:च? पण झोपले राहिले निर्धास्तपणे ते लोक सार्वजनिक फुटपाथवर. तू तर साधा, भोळा, सोवळा, सज्जन माणूस. तुझ्यावर आळ घेतलेला कसा चालेल बरं! त्यावेळी सेशन कोर्टाला तुझी ताकद लक्षात आली नसेल कदाचित! नाही तर तुझ्यासारख्या  हिरोला सक्त मजुरीची शिक्षा कधीच दिली नसती त्यांनी. पण हरकत नाही. त्या कोर्टाची ‘चूक’ वरच्या कोर्टाने दुरुस्त केली आणि तू बाईज्जत बरी झालास! या प्रकरणात दगावलेल्या त्या मजुराला निदान नरुल्ला की कायसं नाव तरी होतं. पण राजस्थानातल्या जंगलातल्या त्या काळवीटाला तर नाव नाही की गाव नाही. तशीही जंगलातल्या कळपात कितीतरी काळवीटं, हरणं असतात. त्यातल्या एखाद्याला तू उडवलाच तुझ्या बंदुकीनं, तर कोणाच्या बा चं काय गेलं? जंगल उजाड थोडीच झालं ते एक जनावर कमी झाल्यानं? पण नाही.
 
प्राण्यांवरही दयामाया दाखवतात या देशातले काही लोक! अरे जिथे तू माणसांचीच कदर करीत नाहीस, तिथे एका काळवीटाची काय बिशाद, एवढी साधी बाब कळू नये त्यांना? पण जळतात रे तुझ्यावर सारे. संधी गवसली की तुला अडकवायला बघतात लोक. पण तू कुठे भीक घालतो त्या दीडदमडीच्या लोकांना. पैशाच्या बळावर व्यवस्था कशा विकत घ्यायच्या नि सिस्टीम कशी तुकवायची हे एव्हाना चांगलंच लक्षात आलं आहे तुझ्या. न्यायालयाचा कालचा निकाल बघितल्यानंतर तर यासंदर्भातले कौशल्य तू फार चांगल्या तर्‍हेने सिद्ध केल्याचे स्पष्टच झाले आहे. ते साहेब म्हणाले, तो काळवीट तूच मारल्याचं सिद्ध होत नाही. पुरावेच मिळाले नाहीत बघ कोर्टाला! आहे ना मज्जा! अरे तो नरुल्ला मेला तुझ्या गाडीखाली. तेव्हाही कुठे पुरावे सापडले होते कोर्टाला? फारच विचित्र आहे ना इथली न्यायव्यवस्था? तुलाही गम्मतच वाटली असणार. मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या असतील तुला तर निकाल ऐकल्यावर. आपण कसं मूर्ख बनवलं या न्यायव्यवस्थेला, हे आठवून तर दिलखुलास हसला असशील तू. मूर्खात काढलं असशील सर्वांना. हो ना!
 
सलमान, अरे तू असो किंवा संजय दत्त, तुम्हाला काय फरक पडतो रे चार-दोन दिवसांच्या जेलच्या हवेनं. मोठी माणसं तुम्ही. कारागृहात जाणे म्हणजे काय शिक्षा असते तुमच्यासाठी? थोड्या दिवसांची पिकनिक ती. तेरा वर्षांच्या काळात ज्या न्यायव्यवस्थेला, तू त्या दिवशी दारू प्यायला होता की नाही, गाडी तू चालवीत होतास की नाही एवढं देखील कळू शकलं नाही, अठरा वर्षांच्या काळात बेकायदा शस्त्र बाळगल्याची बाब ज्या न्यायालयात सिद्ध होऊ शकली नाही, की शिकार तू केल्याची बाब कुणाला पटली नाही, तिथल्या न्यायव्यवस्थेची कशाला रे चिंता वाहायची तुझ्यासार‘या मातब्बरांनी? लोक म्हणतात, तू कायदा पायदळी तुडवला. व्यवस्था विकत घेतली. दरवेळीच कसे तुझ्याविरुद्धचे पुरावे सिद्ध होत नाहीत न्यायालयात? अन् प्रत्येकच वेळी तुला कसा मिळतो संशयाचा फायदा? पैशाच्या बळावरच ना! की सेलिबि‘टी आहेस म्हणून? जाम लकी आहेस लेका सलमान तू! गुन्हा केला तरी संशयाच्या बळावर ‘बाईज्ज्त बरी’ व्हायला अन् वर पुन्हा कॉलर टाईट करून दिमाखानं मिरवायला गट्स लागतात ना राव. मानलं बुवा सलमान तुला. ग्रेट आहेस तू. आता तुझ्यासारख्याला ग्रेट म्हटल्यावर आपल्या व्यवस्थेला काय म्हणायचं हे काय वेगळ्यानं सांगायला हवं रे गड्या? 
Powered By Sangraha 9.0