नाद बागेश्री- परसबाग

12 Apr 2017 15:42:39


किचनला लागून असलेल्या छोट्याशा बाल्कनीला, Dry Balcony का म्हणतात काही कळत नाही! दिवसभर ओलावा जपणाऱ्या या जागेला ‘Dry’ म्हणणे काही बरोबर नाही! वाशिंग मशीन, भांडी घासायचे सिंक, कचऱ्याच्या बदल्या अशाने माझी बाल्कनी व्यापलेली आहे.

प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी बाल्कनी मध्ये एक एक बादली आहे. कोरड्या कचऱ्यासाठी, ओल्या कचऱ्यासाठी आणि प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी प्रत्येकी एक बादली. तर रद्दी आणि काचेसाठी एक एक खोके.

तरी पण ही बाल्कनी रुक्ष नाही बरे! तीच्या बंदिस्त कठड्यावर – तुळस, गवती चहा, मिरची, कडीपत्ता, टोमटो अशी इमर्जन्सी झाडे लावली आहेत. इमर्जन्सी म्हणजे - इकडे चहाचे आदण ठेवले की तिकडून दोन तुळशीची पाने नाहीतर गवती चहाची पाने तोडून त्यात टाकायची. इकडे गॅसवर कढई चढवली की पट्कन तिकडून दोन मिरच्या आणि कडीपत्त्याच्या दोन काड्या तोडून आणायच्या. आणि कधीतरी टोमॅटो मस्त दिसतयात म्हणून कांदा आणि मिरची घालून त्याची छान कोशिंबीर करायची. या झाडांशिवाय कधी - हळद, मेथी, लाल माठ, पुदिना, पालक, कोथिंबीर, कांद्याची पात अशा वेगवेगळ्या भाज्या लावून झाल्या. ‘घरची भाजी’ तोडण्यात आणि करण्यातला आनंद कुछ और ही है!

 


स्वयंपाकघराचे आणि या झाडांचे सहजीवन फारच मस्त आहे. इकडे डाळ तांदूळ धुतले की लगेच ते पाणी झाडांना घालायचे. इकडे चहा गळाला की चोथा त्यातल्याच एका कुंडीत टाकायचा. आंबट दही धुतलेले पाणी कडीपत्त्याला घालायचे. झाडांना पाणी घालायला वेगळा वेळ द्यायला लागत नाही. स्वयंपाक करता करताच खत – पाण्याची सोय होते!

झाडांबरोबरच compost ची कुंडी पण कठड्यावर बसते. भाजी निवडली, फळे चिरली की लगेच कचरा या कुंडीतच जातो. महिन्यातून एखादवेळी ही कुंडी मोठ्या गॅलरीत नेऊन त्यातले खत इतर झाडांना घालावे लागते. क्वचित कधीतरी, पावसाळ्यात चिलटे झाली की काही दिवस या कुंडीची रवानगी मोठ्या गॅलरीत होते.

माझ्या मैत्रिणीने तिच्या dry balcony मध्ये bio-gas चे लहानसे युनिट लावले आहे. किचन शेजारी असल्याने युनिट मध्ये कचरा टाकणे सोयीचे झाले आहे. आणि त्याची gas pipe पण तिथल्या तिथे स्वयंपाकघरात घेता आली आहे. रोजचा कचरा मिक्सर मधून बारीक करून त्या युनिट मध्ये जातो. अगदी शिळे अन्न सुद्धा! त्यातून तयार होणाऱ्या गॅसवर त्यांचा सकाळ संध्याकाळचा चहा होतो. आणि त्यातल्या slurry चे झाडांना खत होते. हे युनिट म्हणजे एक पचन संस्थाच आहे! अन्न जास्त झालं तर अपचन होते. मग एखाद दिवस अनशन करावे लागते. कधी acidity होते. मग चुन्याच्या पाण्याचे औषध द्यावे लागते. घास चावून चावून खाल्ला नाही तरी पचन नीट होत नाही. पाळीव प्राण्याचा आहार सांभाळतो तसा या युनिटचा आहार सांभाळावा लागतो. एकदा का गणित जमल की दोस्ती पक्की!

बाकी माझ्या बाल्कनी मधला प्लास्टिकचा कचरा आठवड्यातून एकदा रुद्र Recycling ही संस्था घेऊन जाते. रद्दीवाला रद्दी घेऊन जातो. भंगारवाला काच घेऊन जातो. राहता राहिला कोरडा कचरा, तो मात्र नगरपालिकेच्या गाडीत द्यायला लागतो. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यामुळे, हा कचरा जास्त नसतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कचरा घरा बाहेर जातो. उरलेले पाच – सहा दिवस ‘आज कचरा नाही’ असे सांगावे लागते. हे वाक्यच मला बक्षीस असल्यासारखे वाटते!

मागे एकदा सिंक व वाशिंग मशीनचे पाणी शुद्ध करण्यासाठी एक लहानशी system केली होती. हे थोडे फार filter झालेले पाणी – गॅलरी मधल्या झाडांना आणि सोसायटीच्या बगिच्याला जात असे.

 


तर, Dry Balcony हा घराचा एक अतिशय जिवंत अवयव आहे – पाण्याचे शुद्धीकरण करणारा, पाण्याचे पुनर्वापर करणारा, ओल्या कचऱ्याचे खत करणारा, ओल्या कचऱ्यापासून उर्जा तयार करणारा, ताजी व सेंद्रिय भाजी-पाला पुरवणारा आणि प्राणवायू देणारा स्वच्छतेचा दूत आहे! स्वयंपाकघर जर रसायनशास्त्र प्रयोगशाळा असेल तर ही बाल्कनी जैव-तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा आहे. बायो-बाल्कनी हे नाव अधिक संयुक्तिक वाटे का?

तर ही Bio-Balcony, अंधाऱ्या duct मध्ये उघडणारी आणि वाशिंग मशीनच्या मापाने शिवलेल्या कुर्तीसारखी, स्लिम का बांधतात काही कळत नाही! कशी मस्त ऐसपैस असावी. भरपूर सूर्य प्रकाश असणारी. खेळते वारे असणारी. अगदी ‘मागचे अंगण’ म्हणावे अशी. इथे कपडे वाळत घालता यावेत. मिरची, कोथिंबीर आणि इतर पाले भाज्या लावण्यासाठी जागा असावी. इथल्या सोलार ड्रायर मध्ये कसुरी मेथी करून ठेवता यावी. सोलार कुकर मध्ये वरण-भाताचा कुकर लावता यावा. भाज्या साठवायला Mitti Cool चा फ्रीज ठेवता यावा. आणि Biogas, Water Recycling चे units ठेवण्याची सोय असावी.

या शिवाय एक लहानशी खुर्ची टाकून, सकाळी उन खात निवांत पेपर वाचता यावा, आणि सांजेला तुळशी समोर दिवा पण लावता यावा.

- दिपाली पाटवदकर

Powered By Sangraha 9.0