नाट्य परिक्षण - होय, मी सावरकर बोलतोय

    दिनांक  26-Mar-2017   

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्यांनी ज्यांनी तन-मन-धन रूपाने योगदान दिले, त्या सर्वांचे शिखरशिरोमणी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर. बाल्यावस्थेपासून परवशतेच्या बेड्या तोडून स्वातंत्र्ययज्ञात आहुती देण्यास सिद्ध झालेले महानायक म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांचे आयुष्य म्हणजे अष्टाधिक पैलू असलेल्या हिर्‍याचे चैतन्यदायी-तेजस्वी-ओजस्वी नि स्फूर्तिदायक जीवन. अनेकानेक प्रतिभांचे धनी असलेले स्वातंत्र्यवीर चित्रपट, नाटक, व्याख्याने, पुस्तकरूपाने भारतीय जनमानसासमोर याआधीही आले आहेत आणि पुढेही येणार आहेत; परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रच असे आहे की, ते अभिव्यक्तीच्या एकाच प्रकारात आणि एकाच वेळी साकारणे शक्य नाही. कवी सावरकर, योद्धा सावरकर, नाटककार सावरकर, भाषाप्रभू सावरकर, हिंदूसंघटक सावरकर, जातिभेदनिर्दालक-सुधारक सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर... एक ना अनेक... स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या अनेक पैलूंतील ‘राजकारण’ हा विषय घेऊन आणि अन्य सर्वच विषयांना स्पर्श करणारे प्रसंग घेऊन आकाश भडसावळे यांनी, ’होय, मी सावरकर बोलतोय’ हे नाटक रंगभूमीवर सादर केले आहे.

मुंबईजवळील बदलापूरचे ख्यातनाम चरित्र कादंबरीकार अनंत शंकर ओगले यांच्या ’पहिला हिंदुहृदयसम्राट’ या कादंबरीवर आधारित ‘होय, मी सावरकर बोलतोय’ हे नाटक त्यांनीच लिहिले असून नेरळच्या आकाश भडसावळे यांनी त्यांच्या ’अभिजात नाट्यसंस्थे’तर्फे या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे, यात जी ऐतिहासिक आणि महनीय पात्रे आहेत तशी मराठी रंगभूमीवर याआधी कधीही एकाचवेळी, एकाच ठिकाणी एकत्र आलेली नाहीत. या नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, माई सावरकर आहेत, महात्मा गांधी आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, शिवभक्त भालजी पेंढारकर आहेत, अभिनेता पृथ्वीराज कपूर आहेत, बॅरिस्टर प्रफुल्लरंजन दास, मादामकामा, जस्टीस आत्माचरण इत्यादी दिग्गज आहेत.

स्वा. सावरकरांची अमोघ वाणी, त्यांचे भाषेवर असलेले प्रभुत्व, त्यांचे वक्तृत्त्व ही खरे तर भारतभूच्या ललाटीची भाग्यकारक घटनाच होय. अखंड भारतात लेखणी आणि वाणी यांच्यावर इतके विलक्षण नियंत्रण असलेला दुसरा नेता स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात कुणीही नव्हता. अशा क्रांतिकारकांचे मुकुटमणी असलेल्या स्वा. सावरकरांच्या ओजस्वी देशभक्तीने ओतप्रोत भरलेली पल्लेदार वाक्ये, देशात घडणार्‍या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवरील त्यांची विफलता-विकलता, मातृभूमी भारतभूवर होणारे अन्याय-अत्याचार पाहून व्याकूळ करणारे त्यांचे क्षणोक्षणीचे भावदर्शन, त्यांचे कारुण्य, त्यांचे राजकारण, तसेच त्यांचा निखळ विनोद हे सारे व्यक्त करण्यासाठी तशाच ताकदीचा कलाकारही आवश्यक होता. याअनुषंगाने विचार करता आणि नाटक पाहतानाही स्वा. सावरकरांच्या प्रमुख भूमिकेसाठी स्पष्ट, जोरदार, अस्खलित शब्दफेक आणि गोड वाणीच्या जोरावर आकाश भडसावळे यांनी केलेला अभिनय बाजी मारून जातो. भालजी पेंढारकरांची भूमिका करणारे बहार भिडे आणि अभिनेता पृथ्वीराज कपूर म्हणून राजबिंडा सचिन घोडेस्वार हे शोभले आहेत. महात्मा गांधी म्हणून सुमित चौधरी, सुभाषबाबू म्हणून तेजस जेऊरकर, मादाम कामा आणि माई सावरकर यांच्या भूमिकेत सुजाता चिटणीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत हर्षल सूर्यवंशी यांच्या भूमिकाही भावस्पर्शी, उत्तम आणि साजर्‍या आहेत.

या नाटकात सावरकरांचे संपूर्ण दर्शन आहे. परंतु, मुख्यतः सावरकरांचे राजकारण हा विषय नाटकाचा गाभा असल्याने तद्नुषंगाने नाटक त्याभोवती फिरते. यात सावरकरांचे इंग्लंडमधले क्रांतिकार्य आहे, अंदमानची करुण कहाणी आहे, त्यांचे झंझावाती राजकारण आहे आणि गांधीहत्येचा खटलाही आहे. असे असले तरी स्वा. सावरकरांचे आयुष्यच एवढ्या नानाविध घटना आणि प्रसंगांनी भरलेले आहे की, ते एका कलाकृतीत सामावणे शक्य नाही, तशी अपेक्षाही नाही. परंतु, ’होय, मी सावरकर बोलतोय,’ या नाटकाने हे आव्हान पेलल्याचे जाणवते.

नाटकाची भरभक्कम बाजू म्हणजे एकापेक्षा एक टाळी घेणारी नि मातृभूमीच्या प्रेमाने, आदराने भरलेली जोरकस अन् प्रखर वाक्ये. स्वातंत्र्यपूर्व काळातले राष्ट्रीय कॉंग्रेसचे बोटचेपे धोरण, हिंदूंवर होणारे अत्याचार, मुस्लिमांचे लांगूलचालन, अखंड भारताची फाळणी, फाळणीचे परिणाम या सर्व विषयांना अतिशय नेटकेपणाने पण संयमित आणि तरीही प्रखरतेने या नाटकातून मांडण्यात आले आहे. स्वा. सावरकरांच्या तोंडची वाक्ये ऐकताना तर अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. यात सावरकर एका ठिकाणी हिंदू समाजाच्या उदासीनपणावर विफलपणे प्रतिक्रिया देताना म्हणतात, ’’लाहोर गेले हिंदू समाजाच्या उदासीनतेमुळे. शिरगणतीवर कॉंग्रेसने बहिष्कार घातला आणि हिंदूंनी हिंदुत्वाकडे पाठ फिरवली. तिथे मुसलमानांनी संख्या फुगवून सांगितली आणि लाहोर पाकिस्तानात गेले.’’ स्वतःच्या आयुष्यातील अनेक घटनांत सावरकरांना ब्रिटिशांनी तर अपमानित केलेच, पण इथल्या; या देशातल्या लोकांनीही त्यांच्याशी फटकून राहिल्याने यासंदर्भात सावरकर म्हणतात, ’’ज्या सहजपणे इंग्रजांनी माझी मालमत्ता जप्त केली, माझा चष्माच काय; पण मला वंदनीय असलेली भगवद्गीताही काढून घेतली तितक्याच सहजपणे हिंदुस्थानी नेत्यांना माझी वैयक्तिक भरपाई करता आली असती. पण सत्य हे आहे की, हे लोक मला त्यांचा प्रतिस्पर्धी नव्हे, तर शत्रूच मानत आले आहेत!’’ क्षणोक्षणी स्वा. सावरकर आपली जी ही कैफियत मांडतात, तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावल्याविना राहत नाहीत. स्वा. सावरकरांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगांनी भरलेले हे नाटक म्हणजे नाट्यरसिकांसाठी पर्वणीच.

नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसंगानुरूप लक्ष्यवेधी प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत आणि ही बाजू आदित्य दरवेस व अजिंक्य वानखेडकर यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. स्वा. सावरकरांच्या राजकीय जीवनावर सादर करण्यात आलेले हे पहिले आणि एकमेव नाटक म्हणावे लागेल. नव्या पिढीपर्यंत ज्वलंत हिंदुत्व मांडणारे असे हे स्फूर्तिदायी नाटक आहे. ’होय! मी सावरकर बोलतोय!!’


- महेश पुराणिक

9594961787