योगींचा धडाका, विरोधकांना झटका

    दिनांक  24-Mar-2017   
 
 
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून काही तासांच्या आतच योगी आदित्यनाथ यांनी कामाचा जबरदस्त धडाका लावला आहे. महिला-मुलींसाठी आजपर्यंत उत्तर प्रदेश नेहमीच बदनाम राहिल्याचे गेल्या कित्येक वर्षांतील घटना, प्रसंग आणि बातम्यांतून देशासमोर आले. आतापर्यंत उत्तर प्रदेशात हजारो छेडछाडीच्या, विनयभंगाच्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. काही घटना उजेडात आल्या तर काही दाबल्याही गेल्या परंतु, आता योगी आदित्यनाथ यांनी कारभार हाती घेताच कॉलेजात जाणार्‍या, नोकरी करणार्‍या मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी अँटी रोमिओ स्क्वॉड तैनात करून आपण राज्यात स्त्रीसुरक्षेला प्राधान्य देत असल्याचेच दाखवून दिले. गेल्या दोन दिवसांत साध्या कपड्यांतील महिला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील अनेक शहरांतील शाळा-कॉलेजातून मुलींना नाहक छेडणार्‍या रोडरोमिओंना चांगलाच दणका दाखवला. अखिलेश-मुलायमच्या समाजवादी राज्यात तर मुल्ला मुलायमयांनी मुलींवर बलात्कार करणार्‍यांना ’बच्चे तो बच्चे होते है’ असे म्हणत अशा नृशंस अत्याचाराच्या घटना हसण्यावारी नेल्याचा अश्लाघ्य प्रकार केला होता.
 
समाजवादी राज्यात जिथे पोलीस आणि प्रशासन सुस्त झाले होते तेदेखील आता फुल ऍक्शनमध्ये काम करताना दिसू लागले. बरेलीसारख्या शहरात तर शाळेत जाण्याच्या रस्त्यावर टपोरी मुले छेडछाड करतात म्हणून शेकडो मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते. मात्र, आज भगवे वस्त्र घातलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री म्हणून निवडीनंतर जेवढी मळमळ आणि जळजळ तमाम पुरोगामी, बुद्धिजीवी अन् सेक्युलर ओकत आहेत, तशी कधी त्यांनी मुल्ला-मुलायमच्या काळात केल्याचे दिसत नाही. आज योगी आदित्यनाथ यांनी या प्रकाराविरुद्ध कारवाईला सुरुवात केली तर रंजिता रंजन, रेणुका चौधरी या कॉंग्रेसच्या महिला नेत्या आणि सपाचे घनश्याम तिवारी हे बोलके बोलघेवडे पोपटपंची करू लागले, परंतु सपा सरकारातील बलात्काराचा आरोप असलेल्या गायत्री प्रजापती या मंत्र्याविरोधात या वाचाळांनी कधी आघाडी उघडल्याचे समोर आले नाही. केवळ हिंदू धर्माचा अभिमान असलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर बसल्याने या सर्वच तोंडपाटीलकी करणार्‍यांची पोटदुखी वाढली आहे, मात्र योगीजींच्या सध्याच्या धडाकेबाज कारवाईने उत्तर प्रदेशाची वाटचाल उत्तम प्रदेशाच्या दिशेने होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
***

 
देशातील ज्वलंत प्रश्नांपैकी एक म्हणजे वाढती व्यसनाधीनता. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच सर्व सरकारी कार्यालयात तंबाखू, गुटखा, पान, पानमसाला, मावा आदी पदार्थ (?) खावून पिचकार्‍या मारणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला. अनेक घरातील कर्तीधर्ती पिढी या व्यसनाधीनतेमुळे बरबाद झाल्याचे नेहमीच ऐकायला मिळते. आणि सरकारी कार्यालयातील भिंती, कोपरे, जिने हे अशा व्यसनांच्या पिचकारीने रंगल्याचेही पाहायला मिळते. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाने आता हा प्रकार कमी होऊन ओंगळ आणि अस्वच्छ सरकारी कार्यालये चकाचक होण्याची आशा आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात दारुबंदी करण्याचेदेखील सुतोवाच केले. मात्र, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी आणि त्यानंतरही त्यांच्यावर टीका करणार्‍या बोलभांड मुखंडांना याकडे पाहायला वेळ नाही. एखादी व्यक्ती एखाद्या पदावर बसण्यापूर्वीच त्याची यथेच्छ निंदानालस्ती करण्याची मुजोर खोड आपल्याकडील मूठभर रिकामटवळ्यांना लागलेलीच आहे. आताही त्यांनी तसेच केले. त्यात योगी आदित्यनाथ म्हणजे हिंदू मठाधीश, भगवे वस्त्रधारी मग तर या बुद्धी आणि पुरोगामित्वाच्या ठेकेदारांना टीका करण्यासाठी जणू काही चेवच चढला पण योगींनी जो काही कामाचा धडाका लावला आहे, तो पाहून आता ही छद्मी सेक्युलर-पुरोगामी जमात त्यांच्या चांगल्या कामांनाही नावे ठेवायच्या मागे जुंपली. अर्थात आता विरोधासाठी विरोध हा खेळ यांनी सुरू केला. यातून योगीजींच्या निवडीने विरोधकांना किती झटका बसला असेल, त्याची कल्पना करता येते.
 
योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी तर स्वतःच हातात झाडू घेऊन आपल्या कार्यालयातील स्वच्छतेला सुरुवात केली तर तिकडे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी लखनौतील पोलीस ठाण्याला अचानक भेट देत झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांचे मनोबल वाढवण्याचे आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे मतदेखील व्यक्त केले. एवढे सर्व घडत असताना तिकडे पुरोगामी आणि सेक्युलर समजल्या जाणार्‍या बौद्धिक (?) वर्तुळात मात्र योगी आदित्यनाथ यांच्यावर किती टीका करू अन् त्या माध्यमातून भाजप, संघ आणि हिंदू धर्माला किती लाखोली वाहू यात चढाओढ लागल्याचेच चित्र दिसले. उदारमतवादी वगैरे म्हणवल्या जाणार्‍या या लोकांची ही वैचारिक दिवाळखोरीच होय. भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी निवड झालेली असतानाही त्यावर आगपाखड करणारी ही धेंडेच खरे म्हणजे संविधानविरोधक असल्याचे त्यांच्या कृतीतून देशासमोर आले. त्यामुळे अशा लोकांचे सामान्य भारतीय जनमानसातील स्थान स्वकृत्यांनीच अधिकाधिक खाली जाणार, हे नक्की.
- महेश पुराणिक