भाजपचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' ? 

    दिनांक  23-Mar-2017   

 
महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चाहूल 
 
२९ विरोधी आमदार भाजपप्रवेश करणार 
 
भाजप शिवसेनेला सरकारमधून डच्चू देण्याची शक्यता 
 
निमेश वहाळकर 
आजचा दिवस संपताना घडलेल्या घडामोडींनी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे. काँग्रेसमधील १५ व राष्ट्रवादी काँग्रेसमधील १४ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असून शिवसेनेच्या रोजच्या कटकटींना कंटाळलेला भाजप शिवसेनेला सरकारमधून लवकरच 'जय महाराष्ट्र' करण्याची शक्यता आहे.

२९ आमदारांच्या जोरावर भाजप एकट्याने बहुमतापर्यंत पोहोचणार असून भाजप गरज पडल्यास सरकार विसर्जित करून मध्यावधी निवडणुका घेणार आहे. संध्याकाळीच हाती आलेल्या या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 
गुरूवारी (ता. २३) संध्याकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आदी वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मात्र, कोअर कमिटीतील प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे व संघटनमंत्री रवींद्र भुसारी हे मात्र अनुपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी आपली मते मांडली. शिवसेनेची नाराजी, सरकारविरोधी मतप्रदर्शन, सतत बदलणारी भूमिका या साऱ्याला भाजप कंटाळला असून त्यामुळे शिवसेनेला तात्काळ 'घटस्फोट' द्यावा असे मत या बैठकीत मांडण्यात आले.

काँग्रेसमधील १५ व राष्ट्रवादीतील १४ आमदार स्वपक्षावर नाराज असून भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांना तातडीने प्रवेश द्यावा, त्यांच्या पोटनिवडणुका घ्याव्यात. या २९ पैकी २१ हून अधिक आमदार निवडून येऊ शकतात, त्यामुळे भाजप स्वबळावर बहुमतापर्यंत पोहोचेल असा निष्कर्ष या बैठकीत मांडण्यात आला. तसेच सरळ सरकार विसर्जित करून मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे असेही मत या बैठकीत मांडण्यात आले. 
 
सर्वांची मते ऐकल्यावर मुख्यमंत्र्यांनीही याला अनुमोदन देत, ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले. या साऱ्या खात्रीलायक वृत्ताने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
आज विधीमंडळ कामकाजादरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी सकाळीच मंजूर झालेल्या लेखानुदानावर चर्चेची मागणी केली. लेखानुदानावर सत्ताधाऱ्यांनी चर्चेची पद्धत नाही. त्यामुळे गिरीश बापट यांनी ही मागणी धुडकावून लावली. त्यानंतर नियम २९३ अन्वये पुन्हा शिवसेना आमदारांनी चर्चा मागितली. त्यामुळे यावर सत्ताधाऱ्यांमध्येच चर्चा घ्यावी लागली.

संसदीय प्रथेच्या पूर्णपणे विसंगत अशा या घटनेमुळे भाजप अंतर्गत तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. याची परिणती अखेर संध्याकाळच्या भाजप बैठकीतील या निर्णयात झाली.
 
भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याचा दुजोरा 
भाजप कोअर कमिटीमधील एका वरिष्ठ मंत्र्याने या वृत्ताला अनौपचारिक वार्तालापात दुजोरा दिला. शिवसेनेच्या आमदारांनी आजच्या प्रकारानंतर पुन्हा सेनेच्या मंत्र्यांना धारेवर धरले. सकाळी सरकारच्या बाजूने असणाऱ्या या मंत्र्यांनी पुन्हा भाजप मंत्र्याकडे येऊन आमदारांच्या तक्रारी मांडण्यास सुरूवात केली. त्यामुळे भाजपचे मंत्री पार वैतागून गेले असल्याचे या मंत्र्याने सांगितले.
 
मध्यावधी निवडणुका झाल्यास भाजपच्या एकट्याच्या स्वबळावर १८० ते २०० जागा निवडून येऊ शकतात व भाजपचे स्पष्ट बहुमतातील सरकार सत्तेवर येऊ शकते असे या मंत्र्याने सांगितले. तशीही तयारी भाजप करत असून तसे न झाल्यास २९ पैकी निवडून येऊ शकणाऱ्या २१-२२ आमदारांसह भाजप बहुमत गाठू शकतो. तसेच शिवसेनेचेही 'खूप सारे' आमदार सातत्याने भाजपच्या संपर्कात असून सेना सत्तेतून बाहेर पडल्यास कोणत्याही क्षणी भाजपमध्ये येऊ शकतात असे ते म्हणाले.
 
तसेच भाजपचे सगळे मंत्री मध्यावधी निवडणुकीस तयार असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसे स्पष्टपणे सांगितल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शिवसेनेला कंटाळलेला भाजप आता अत्यंत आक्रमक बनला असून लवकरच शिवसेनेला सरकारमधून डच्चू देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.