#ओवी लाईव्ह जल  बिन मछली

    दिनांक  20-Mar-2017   

 
निमिषा कदम, वय २८. एका वर्षामागे निमिषा लग्न करून आली. काही दिवस तर सगळे छान चालले होते, नव्यानवलाईचे, कोड कौतुकाचे. पण हळूहळू तिच्या लक्षात आले की तिच्या सासूला तिचे स्वयंपाक करणे आवडत नसे. लवकरच सासू तिला स्वयंपाक करू देत नाही,  स्वयंपाकघरात प्रवेशही करू देत नाही, यामुळे निमिषा त्रस्त झाली. तिला त्या घरात घुसमट होतय असे वाटू लागले. एका वर्षात निमिशाने नवऱ्याबरोबर घर सोडले. – Hindustan Times, 12 Nov 2015

श्रीधर देशमुख, वय ३५. ऑफिस मध्ये नुसते बसून राहावे लागते, बॉस काम देत नाही यामुळे त्रस्त! दिवसभरात फार तर २ तास काम आणि उरलेला वेळ कसा घालवावा हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्न! जेंव्हा तक्रार करून, बोलूनही हा प्रश्न सुटेना, तेंव्हा श्रीधरने नवीन नोकरी शोधली. – एका Multinational Company मधील घटना.

सुरेश पाटील, वय ६०. दोन वर्षांपूर्वी सुरेश काका निवृत्त झाले. मग त्यांच्या मागे काहीच व्यवधान नव्हते. ना त्यांनी  कोणते छंद जोपासले होते. ना काही जबाबदाऱ्या घेतल्या होत्या. त्यामुळे  वेळ चांगल्या प्रकारे घालवण्याचे काही साधन नव्हते. एका वर्षात त्यांचे वय पाच वर्षांनी वाढल्यासारखे वाटू लागले.  – सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले एक काका.       

आपण काही काम करत नाही / कुणाच्या उपयोगी पडत नाही ही जाणीव फार सुन्न करणारी आहे. बेचैन करणारी आहे. वरील प्रसंगांच्या उलट हा एक प्रसंग पहा –

खेड्यातील एक अपंग मुलगी. शालेय शिक्षणापासून वंचित, नैराश्याने घेरलेली. तिला शिवणकामाचे शिक्षण मिळाले. मग जवळपास राहणाऱ्यांचे कपडे शिवून देऊ लागली. हळूहळू तिचा जम बसला. आता दोन चार निराधार महिलांना हाताखाली ठेवून शिवणकामाचा व्यवसाय करत आहे. घर सांभाळत आहे. प्रत्येक दिवस उत्सहाने जगत आहे.  – चाळीसगाव येथील, स्वयंदीप या संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेली एक प्रातिनिधिक महिला.

या दोन्ही प्रकारच्या घटनांमधून दिसते की - काम करून आत्मविश्वास मिळतो, आनंद मिळतो, समाधान मिळते. आणि तेच कर्म न केल्याने आत्मविश्वास, आनंद आणि समाधान हरवते.


ज्ञानेश्वर म्हणतात -

स्वधर्मा पासून, स्वकर्मा पासून मनुष्य दूर राहूच शकत नाही! मुलाच्या खेळण्यावर बंदी घालून पहा! शिक्षकाला शिकवण्यापासून वंचित ठेऊन पहा! पाण्या बाहेर काढलेल्या मास्यासारखा, तो आपलं काम करण्यासाठी तडफडेल.