कर्मदरिद्री केजरीवाल

    दिनांक  07-Feb-2017   

 
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|
‘कर्म करत राहा, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका,’ असा पवित्र भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला जगत्‌मान्य गीतोपदेश. पण आजच्या काळात कुठलीही कर्मे न करता केवळ कावेबाजपणे राजकीय सारीपाटावर सत्तेचा जुगार खेळणार्‍यांचीच चलती आहे. त्यातही दिल्लीचे फिरते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अगदी आघाडीवर! मग अशा महाभागांनी किमान भगवद्गीतेतील वचने वाचावी व स्वत:मध्ये, पक्षाच्या कार्यशैलीत सुधारणा करावी, अशा अपेक्षेने पंजाबमधील ‘चंदा बंद सत्याग्रह’ नामक एका सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते केजरीवालांच्या घरी पोहोचले. त्यांचा आक्षेप होता तो पंजाबमधील ‘आप’च्या डागाळलेल्या आणि गुन्हेगार उमेदवारांवर. तेव्हा भ्रष्टाचाराचा समूळ नाश आणि स्वच्छ कारभाराची शेखी मिरविणार्‍या केजरीवालांनी अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी, या अपेक्षेसह वरील संघटनेचे कार्यकर्ते केजरीवालांच्या दारी धडकले. पण त्यांच्या पदरी पुरती निराशाच आली. या संघटनेचे संयोजक मुनीष रायजादा यांनाच केजरीवालांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. रायजादा यांनी सत्य परिस्थिती कथन करूनही केजरीवालांनी त्यांना फारसे गांभीर्याने घेतले नाही. इतकेच काय तर भेट म्हणून दिलेली भगवद्गीताही चक्क केजरीवालांनी नाकारली. रायजादा यांचा गीता भेट देण्यामागचा उद्देश केवळ इतकाच होता की, केजरीवालांनी गीतेतील कर्मसिद्धांत आत्मसात करून त्यानुसार वागणूक सुधरवावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवावा. पण झाले मात्र भलतेच! गीतेवर हात ठेवून एरवी सत्य बोलण्याची शपथ घेतली जाते, पण त्याच पवित्र गीतेला केजरीवालांनी झिडकारून रायजादा यांच्या आक्षेपांकडेही साफ कानाडोळा केला. त्यानंतर केजरीवाल हे पंजाबच्या जनतेला मूर्ख बनवत असून आदर्श मूल्यांचे पालन करत नसल्याची सणसणीत टीकाही रायजादा यांनी केली. केजरीवालांकडून याउपर अपेक्षा तरी काय करणार म्हणा! आणि भगवद्गीता वाचून यांच्यासारख्या पोकळ बुद्धिमत्तेच्या नेत्यांना त्यातले गीतासार कितपत उमजेल, हाच खरा संशोधनाचा विषय. त्यामुळे एकीकडे पारदर्शकता, नि:स्वार्थी राजकीय मूल्ये आणि स्वच्छ कारभाराच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे मात्र भगवद्गीता नाकारून सेक्युलरवादाचा मुखवटा घालून व्यापक जनहिताला तिलांजली द्यायची, असा या कर्मदरिद्री केजरीवालांचा कारभार...
-----------------
 
मोदींचा भयगंड
 
 
निवडणुकीच्या मतांच्या मौसमात राजकीय टीकाटिप्पणीला एकच उधाण येते. जो कुणी बलशाली, सत्ताधारी आणि विजयाच्या रथावर स्वार दिसेल, त्याला तोंडावर पाडण्याचे हरतर्‍हेने सफल-असफल सर्रास प्रयास केले जातात. मोदींच्या बाबतीतही सध्या तेच घडतंय. एकीकडे उत्तर प्रदेशात राहुल-अखिलेशची जोडगोळी, तर दुसरीकडे पंजाबमध्ये केजरीवालांची केरसुणी. ही गाफील मंडळी कमी होती की काय, म्हणून केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगणार्‍या शिवसेनेलाही मोदींच्या भयगंडाने पुरते ग्रासले आहे. इतके की, ‘मोदी येतील, भाईयों और बहनों म्हणून साद घालतील, आश्वासनांचा पाऊस पाडतील, पण बाबांनो, तुम्ही ती एका कानाने ऐका आणि दुसर्‍या कानाने सोडून द्या. जमलं तर ऐकूही नका...’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवधनुष्यातले रविवारच्या सभेतील हे वाक्बाण म्हणजे, मोदींचा करिष्मा, मोदींचा प्रभाव आणि मोदी लाट ही नोटाबंदीनंतरही अप्रत्यक्षपणे मान्य असल्याचा खुद्द उद्धवसाहेबांनीच दिलेला निर्वाळा. ते येतील, ते बोलतील, सभा जिंकतील आणि नंतर मुंबई महानगरपालिकेतही ‘कमळराज’ प्रस्थापित होईल, याची पुरती भययुक्त जाणीव उद्धवसाहेबांच्या भाषणातून स्पष्टपणे झळकलीच!
राजकारण किती लवकर कूस बदलते पाहा. २०१४च्या लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत युती करून जनतेसमोर मते मागणार्‍या याच शिवसेनेला मोदींच्या चेहर्‍याचा, आवाजाचा आणि एकूणच ‘मोदी’ नामक ब्रॅण्डचा वापर करून कधी नव्हे ते महाराष्ट्रातून १८ खासदार निवडून देता आले आणि आज याच मोदींच्या बुलंद आवाजाच्या भीतीने हातची मतं निसटण्याची यांना भीती सतावतेय! २०१४ मध्ये आवर्जून आपल्या मतदारसंघात मोदींच्या सभा कशा लावता येतील, यासाठी चढाओढ करणारेच आज त्यांचीच धास्ती घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच ज्याप्रमाणे राहुल-अखिलेशने देशाच्या पंतप्रधानांनाच चक्क ‘बाहरी’ म्हणून हिणवत ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचे’ असा धूळफेक करत संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचाच कित्ता साहेबांनीही गिरवला. काय तर म्हणे, ‘फडणवीसांना मुंबई कळली नाही, ते खरे मुंबईकर नाही.’ पण खरंच जर फडणवीसांना मुंबई कळलीच नसती, तर आज ते या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरुढ झाले असते का? असो... एकूणच मोदींचा हा भयगंड यंदा किती जणांना बुडवतो, तेच पाहायचे! 
 
-विजय कुलकर्णी