मराठी भाषेला आले 'अच्छे दिन' !

    दिनांक  28-Feb-2017   

नुकत्याच राज्यभर साजऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’ची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. राज्याच्या मराठी भाषा विभागाने गेली २ वर्षे सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्याने आज हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर पोहोचला आहे. मराठी भाषेशी साहित्य, वाचनसंस्कृती, व्यावहारिक मराठी, संगणकीय मराठी आदी विविध विषयांत राबवण्यात आलेल्या उपक्रमांमुळे व अभिनव अशा प्रयोगांमुळे केवळ एका दिवसाच्या कार्यक्रमापलीकडे जाऊन ‘मराठी भाषा गौरव दिन’ भाषेच्या संवर्धनाची व प्रचार-प्रसाराची एक व्यापक मोहीम बनला आहे.

२०१० मध्ये राज्य शासनाचा ‘मराठी भाषा विभाग’ हा स्वतंत्र विभाग अस्तित्वात आला. स्थापनेनंतर हा विभाग बहुतेककरून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे राहिला. यातून या विभागाकडे काहीसे दुर्लक्ष होऊन यातून मराठी भाषेसाठी म्हणावे तसे काम झाल्याचे दिसले नाही. २१ जानेवारी, २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत विविध उपक्रमांची घोषणाही करण्यात आली. मात्र, भाषेशी संबंधित विविध विषयांचा यात समावेश न करता याचे स्वरूप केवळ साहित्य क्षेत्रातील चर्चा, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद यापुरतेच मर्यादित राहिले. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर विनोद तावडे यांच्याकडे मराठी भाषा विभागही सोपवण्यात आला. यानंतर २०१५, २०१६ व आता २०१७ अशी तीन वर्षे सातत्याने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने भाषेशी संबंधित कोणते भरीव काम करता येईल यावर विचारमंथन करण्यात आले व यातूनच या कार्यक्रमाची व्याप्ती वाढून त्याला एका व्यापक मोहिमेचे स्वरूप प्राप्त होत आहे. यावेळच्या भाषा गौरव दिनाची नुसती उपक्रमसूची जरी पाहिली तरी याची व्याप्ती आपल्या लक्षात येईल.

या दिनाच्या निमित्ताने रोजच्या व्यवहारातील मराठी, शिक्षण क्षेत्रातील मराठी, शाळा-महाविद्यालयांमधील मराठी, संगणक, इन्टरनेट त्यातही विशेषतः सोशल मीडियावरील मराठी, मराठीतील विविध प्रादेशिक बोलीभाषा, मराठी लेखन, मराठी वाचनसंस्कृती अशा विविध विषयांवर अनेक उपक्रम राबवण्यात आले. यामुळे हा दिवस केवळ कवितावाचन व परिसंवादाच्या कार्यक्रमांच्या पलीकडे गेला. आजच्या काळात संगणकाचे महत्व लक्षात घेऊन युनिकोडमधील मराठी टायपिंगच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. स्वतः मंत्री विनोद तावडे यांनी यामध्ये सहभाग घेत विकिपिडीयावर मराठीतून लिखाण करत एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. युनिकोडबाबत माहिती देणारा एक माहितीपटही बनवण्यात आला. तावडे यांच्याकडेच शिक्षण विभागाची जबाबदारी असल्याने या कार्यक्रमाला शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे झाले. या दोन्ही विभागांच्या समन्वयातून भाषेशी संबंधित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिद्ध मंडळींना राज्यातील महाविद्यालयांशी जोडून देऊन त्यांचे कार्यक्रम घेण्यात आले. भाषा गौरव दिनानंतर याअंतर्गत घेतलेल्या उपक्रमांची माहिती देणारे तब्बल ५०० हून अधिक महाविद्यालयांचे अहवाल आम्हाला येतात, अशीही माहिती मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

साहित्यिक वर्तुळाच्या पलीकडे जाऊन वाचकवर्गापर्यंतही मराठी भाषा पोहोचवण्यासाठी भाषा गौरव दिनानिमित्त सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. भाषा अभ्यासक व भाषा संवर्धक पुरस्कारांच्या माध्यमातून समाजात वाचनसंस्कृती रुजण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही होतो आहे. आज इंग्रजी भाषेचे प्रस्थ वाढत जाऊन व्यवहारात मराठी भाषा हद्दपार होण्याची भीती व्यक्त केली जात असताना शासनाच्या मराठी भाषा विभागाने भाषा गौरव दिनाच्या माध्यमातून भाषेच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या या राज्यव्यापी चळवळीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मराठी भाषेच्या दृष्टीने हे चित्र नक्कीच सुखावणारे असून मराठीलाही आता ‘अच्छे दिन’ आले असल्याचेच दिसून येत आहे.