ओवी लाईव्ह - माय मराठी

    दिनांक  27-Feb-2017   

“कॉलेज मध्ये गेल्यावर सगळ शिक्षण इंग्लिश मधून. मग काय? पाहिलं वर्ष काय बोलतायत हे कळण्यात गेलं! दुसऱ्या वर्षी थोड थोड कळायला लागलं. आणि तिसऱ्या वर्षी नीट कळायला लागेपर्यंत कॉलेज मधून बाहेर पडलो होतो. पुढे काम करता करताच सगळे शिकलो. आज असे वाटते की मराठीतून शिकलो असतो तर मला खूप फायदा झाला असता. कदाचित पुढे आणखीही शिकलो असतो. असो. आता वेळ गेली आहे.”, नुकतेच रिटायर झालेले विजय काका त्यांच्या कॉलेजच्या आठवणी सांगत होते.

त्यावर निलेश म्हणाला, “काका, अजून कुठे उशीर झाला आहे? आज ज्यांना इंग्लिश मधून शिकलेले कळत नाही, त्यांना तुम्ही मदत करू शकता. आता तुमच्याकडे वेळ पण आहे आणि अनुभव पण आहे.”   

सुरेश काका म्हणाले, “बर का विजय, काही बदलले नाहीये! अशीच परिस्थिती ज्ञानेश्वरांच्या काळातही होती. सगळ ज्ञान संस्कृत मध्ये! आणि सामान्य माणसाची भाषा मराठी! तेंव्हा त्यांनी गीता मराठीत आणायचे  काम केले.

“आता पुन्हा तशीच वेळ आली आहे – सगळ ज्ञान इंग्लिश मध्ये आणि सामन्याची भाषा मराठी. शक्य तितके शिक्षण मराठीत उपलब्ध केले पाहिजे. उच्च शिक्षण सुद्धा मराठीतून घेता येण्याची सोय असली पाहिजे. मराठी ताकदीची भाषा आहे, त्यामध्ये उच्च शिक्षण घेता येणं खरोखर शक्य आहे.”


मराठीचे वर्णन करतांना ज्ञानेश्वर म्हणतात -

कोणा लावण्यवतीने रत्नजडीत अलंकार घातला, तर तो दागिना तिच्या सौंदर्यात भर घालतो! आणि तोच दागिना हातात घेऊन पहिला तरी त्याचे सौंदर्य कमी होत नाही! किंवा सोन्याच्या अलंकारात पाणीदार मोती बसवले, तर ते मोती सोन्याच्या अलंकाराचा मान वाढवतात! आणि तेच टपोरे मोती वेगळे काढून पहिले तरी त्यांच्या सौंदर्याला उणेपण येत नाही !

तसा हा मराठीतला गीतार्थ! संस्कृत गीतेला सौंदर्याची जोड देतो, गीतेचा अर्थ खुलवून सांगतो, गीतेचा मान वाढवतो! संस्कृत गीतेबरोबर जर मराठीतला गीतार्थ वाचला तर तो संतोष देईल यात शंकाच नाही! आणि संस्कृत गीतेशिवाय वाचला तरी गीतार्थात काही कमीपणा येणार नाही. तोच संतोष, तोच आनंद आणि तेच समाधान देणार!

मराठीची गोडी अशी आहे की, एखाद्या कसदार गायकाने या ओव्या गायल्या, तर त्याच्या गायनाला शोभा येईल. आणि ज्याला गायन येत नाही अशाने या ब्रह्मरसात मुरलेल्या ओव्या म्हणाल्या, तरी त्या ओव्या अमृताची गोडी आणतील!

माझी मराठी भाषा अशी कौतुकाची आहे की पैजेवर अमृत जिंकेल! ज्ञानेश्वरी मध्ये अशा सुंदर, रसिक अक्षरांचा मेळा आहे!  

-दिपाली पाटवदकर