मुंबई निवडणूक : भाजपचा अंदाज ठरला ९९ % खरा !

    दिनांक  27-Feb-2017   

सकारात्मक प्रचार लोकांना भावला, वॉर रूमने निभावली निर्णायक भूमिका

“मुंबईच्या या निवडणुकीचं वर्णन एका बाजूला केडर बेस्ड पार्टी विरुद्ध पार्टी विथ क्लीन इमेज लीडर यांच्यातील लढाई असंच करावं लागेल. आणि जर निकाल पाहिले तर स्पष्ट दिसून येतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेवर लोकांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला. त्यामुळेच मुंबईत याआधी फारशी संघटनात्मक ताकद नसलेल्या भाजपने ३१ वरून थेट ८२ पर्यंत मजल मारली. यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की, यापुढच्या निवडणुका जर तुमच्या पक्षाकडे आश्वासक आणि विश्वासार्ह चेहरा असेल तरच जिंकता येतील, केवळ पक्ष कार्यकर्त्यांचं बळ, नारेबाजी, हुल्लडबाजी यावर जिंकता येणार नाहीत !” मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या यशात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या भाजपच्या ‘वॉर रूम’च्या टीममधील एका प्रमुख रणनीतीकार व अधिकारी व्यक्तीने दै. मुंबई तरुण भारत’सोबत झालेल्या वार्तालापात व्यक्त केलेले हे मत. मुख्यमंत्री, पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, मुंबई भाजपचे नेते, पक्ष कार्यकर्ते व या सर्वांमध्ये समन्वय करणारी यंत्रणा वॉर रूम यांच्या उत्कृष्ट अशा नियोजनातून भाजपने केलेला आक्रमक प्रचार कमालीचा यशस्वी ठरला मुंबई महापालिकेच्या इतिहासातील भाजपने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.  

 

निवडणुकीच्या कित्येक महिने आधीपासून निवडणुकीच्या एकूण प्रचार व धोरणावर वॉर रूम काम करत होती. भाजप प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांच्या समन्वयाखाली विविध क्षेत्रांतील ६०-७० तज्ञ व्यक्तींची टीम यात कार्यरत होती. वॉर रूमने या कालावधीत वर्तवलेले अंदाज व त्यानुसार ठरवलेले धोरण जवळपास ९९ % यशस्वी ठरल्याचे दिसून आले. निवडणूक व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट असा वस्तुपाठच भाजपच्या वॉर रूमने घालून दिल्याचे स्पष्ट होते. भाजपच्या व इतर पक्षांच्या कामगिरीबाबत भाजपने निवडणुकीआधी वर्तवलेले अंदाज किरकोळ अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी खरे ठरले. “कालिना, वडाळा, घाटकोपर आदी भागांत आम्हाला अपेक्षा होत्या. त्यामुळे आमचा पक्षांतर्गत अंदाज ११० जागांचा होता. तर कमीत कमी ८४ जागा मिळतील अशीही अपेक्षा होती. या अंदाजानुसार आम्हाला यश मिळालं. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल वॉर रूमच्या अंदाजाच्या बरेच जवळ होते, कालिना, वडाळा, घाटकोपरमध्ये चांगलं यश मिळालं असतं तर कदाचित आणखी चांगली कामगिरी करता आली असती. इतर पक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची कामगिरी वाईट होईल असाच आमचा अंदाज होता तो खरा ठरला. मनसेच्या कामगिरीबाबत आम्ही साशंक होतोच मात्र त्यांची कामगिरी इतकी खराब होईल असं मात्र वाटलं नव्हतं ”असंही वॉर रूममधील या अधिकारी व्यक्तीने स्पष्ट केलं.

 

भाजपच्या वॉर रूमने तीन आघाड्यांवर काम केलं. एकतर आपला पक्ष व इतर पक्ष यांचं ट्रॅकिंग, दुसरं म्हणजे त्यावर आधारित पक्षाचं व प्रचाराचं धोरण ठरवणं, आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्ष प्रचार. पक्षाला जिथे जिथे गरज भासेल तिथे तिथे आवश्यक ते ‘इनपुट्स’ देण्याचंही काम वॉर रूमने केलं. याशिवाय प्रचाराची दिशा ही सकारात्मक व विकासाची असेल हे वॉर रूमचं धोरण अतिशय यशस्वी ठरलं. सोशल मिडियातून तर अतिशय आक्रमक आणि सकारात्मक प्रचार झाला. व्हिजन महाराष्ट्र आदी माध्यमातून चालवण्यात आलेल्या प्रचार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. दुसरीकडे शिवसेना नकारात्मक प्रकारे प्रचार करेल हाही भाजपचा अंदाज खरा ठरला ज्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदाच झाला.

 

या निवडणुकीत विशेषतः मुंबईत राजकारणाबाहेरचा मतदार वर्ग, जो कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडला गेलेला नाही, तो कोणत्याही पक्षाचा ‘पारंपारिक मतदार’ नाही, त्याच्या आशा-आकांक्षा व अपेक्षा या पूर्ण नव्या व आधुनिक आहेत, असा वर्ग या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावेल असा भाजपचा आडाखाही खरा ठरला. १०-१२ टक्क्यांचं जास्त झालेलं मतदान याचंच एक उदाहरण. मुख्यमंत्र्यांची विकासाची भाषा, वैयक्तिक टीका-टिप्पण्यापेक्षा मेट्रो, कोस्टल रोड, स्वच्छता, पारदर्शक कारभार, वायफाय आदी सुविधा आदी नागरी सुविधा व प्रश्नांवर दिलेला भर आणि त्याचं इतर नेते, प्रसिद्धीपत्रके, सोशल मिडिया आदी मध्येही दिसलेला प्रभाव यामुळे या वर्गातील मतदारांमध्ये सकारत्मक संदेश गेला व त्यांचं मतदान मोठ्या प्रमाणावर भाजपला झाल्याचं वॉर रूमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेषतः युवक आणि महिला यांच्याकडून भाजपला भरघोस मतदान झाल्याचं भाजप वॉर रूमच्या या अधिकाऱ्याने सांगितलं. प्रत्येक बूथनुसार या मतदानाचे आमचे विश्लेषण लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

एकेकाळी मराठी भाषा, अस्मिता, मराठी माणसांना नोकऱ्या, बाहेरून येणाऱ्या लोकांच्या समस्या आदी प्रश्न महत्वाचे ठरायचे. मात्र, मराठी माणसांमध्ये मध्यमवर्गाचा उदय झाल्यानंतर या गोष्टी बदलल्या. त्यातच मुंबईत गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये येऊन स्थायिक झालेल्या मराठी माणसांमुळेही यात फरक पडला. या वर्गात आता रस्ते, स्वच्छता, मलनिस्सारण,आरोग्य, अन्य सुविधा या गोष्टी जात-धर्म, अस्मिता आणि प्रांतावादापेक्षा महत्वाच्या ठरू लागल्या. हीच बाब भाजपने चाणाक्षपणे हेरत प्रचारामध्ये केवळ आणि केवळ ‘विकास’ हीच मुख्य भाषा ठेवली. तर दुसरीकडे इतर पक्षांच्या प्रचारात ‘आम्ही काय करू’ यापेक्षा ‘ते काय करत आहेत’ यावर जास्त भर देण्यात आला. या साऱ्याचा परिणाम शेवटी मतपेटीतून दिसून आलाच.

 

युतीच्या काळात मुंबईत शिवसेनेला अधिक झुकतं माप असायचं त्यामुळे मुंबईत अनेक भाग असे होते की जिथे भाजपने कधीच निवडणूक लढली नव्हती. तिथे शिवसेनेचे उमेदवार असायचे आणि भाजप कार्यकर्ते त्यांचे प्रचार करायचे. निवडणूक न लढल्यामुळे साहजिकच तितके सक्षम पक्ष संघटनही भाजपकडे नव्हते. जे शिवसेनेकडे अत्यंत मजबूत होते. या निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईतील भाजपच्या पक्ष संघटनेच्या वाढीला चालना मिळणार आहे. एकीकडे आश्वासक व लोकप्रिय नेतृत्वाचा चेहरा आणि दुसरीकडे या हळूहळू सक्षम होत जाणाऱ्या पक्ष संघटनेच्या जोरावर भाजप यापुढच्या निवडणुका सहजपणे जिंकू शकेल असे मतही भाजपच्या वॉर रूमशी संबंधित या अधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केलं.

-निमेश वहाळकर