देशमुखी गढी ढासळली !

    दिनांक  23-Feb-2017   

लातूरच्या बालेकिल्ल्यातही कॉंग्रेसला नारळ

संपूर्ण राज्याचं किंबहुना देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई व मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक व इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनी आजच्या चर्चांचा अवकाश व्यापला आहे. मात्र या साऱ्या गदारोळात आणखी एक महत्वाची राजकीय घटना महाराष्ट्रात घडली आहे. ती म्हणजे, मराठवाड्यात लातूर जिल्हा परिषदेत सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा दारूण पराभव आणि भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय ! लातूर हा जिल्हा आपण सगळेच कॉंग्रेसचे दिवंगत नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखतो. विलासरावांच्या पश्चात त्यांचे पुत्र अमित देशमुख, दुसरे पुत्र धीरज देशमुख तर बंधू दिलीप देशमुख हे देशमुख घराण्याचं राजकारण सांभाळतात. या देशमुख घराण्याच्या इतक्या वर्षांच्या जबरदस्त वर्चस्वाला या निकालामुळे तडे गेले आहेत.

लातूर जिल्हा परिषदेत एकूण ५८ पैकी भाजपला ३६ म्हणजेच स्पष्ट बहुमत तर कॉंग्रेसला अवघ्या १५ जागी यश मिळालं आहे. लातूरच्या साखर कारखाना पट्ट्यात तसंच निलंगा-उमरगा पट्ट्यात कॉंग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे. तर दुसरीकडे भाजपचे लातूरमधील युवा नेते, राज्य सरकारमधील मंत्री व पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सगळी ताकद पणाला लावून कॉंग्रेसच्या या गुहेतून विजय अक्षरशः खेचून आणला आहे. आजवर शहरी भागात काहीही झालं तरी ग्रामीण भाग हा बऱ्यापैकी कॉंग्रेससोबतच असायचा. लातूरचा हा निकाल शिवाय अनेक ठिकाणच्या निकालांमधून कॉंग्रेसची ग्रामीण भागातील ही ‘भरवशाची’ ताकद दिवसेंदिवस घाटात चालल्याचेच दिसून येते. आणि याचंच प्रत्यंतर देणारी घटना ही ‘विलासरावांच्या लातुरात’ घडणं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणातील एक दूरगामी घटना म्हणावी लागेल.

महापालिका निवडणुकांच्या गदारोळात ही घटना व त्याचं महत्वही आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आता लातूरच्या लोकांनीही अखेर भाजपचाच पर्याय शोधला आहे आणि या धक्क्यामुळे मराठवाड्यातील प्रसिद्ध अशी ‘देशमुखी गढी’ चांगलीच ढासळली आहे.

निमेश वहाळकर