अस्मितेची अफू की विकासाची वहिवाट?

    दिनांक  20-Feb-2017   
 
   
१० महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांचा शिगेला पोहोचलेला विखारी प्रचार रविवारी अखेरीस थंडावला. सोमवारी अप्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देऊन उमेदवारांनी मतदारांना आपल्याला निवडून आणण्याची गळही घातली. तेव्हा, मागच्या १५-२० दिवसांतील नेते मंडळींच्या सततच्या सभा, वृत्तपत्रातील पानभर जाहिरातींतील वचने, रस्ते व्यापणारे मोठमोठाले होर्डिंग्ज आणि उमेदवारांचे वायदे असा भरभक्कम प्रचार प्रत्येक मुंबईकराने कळत-नकळत अनुभवलाच पण उद्याचा दिवस हा खर्‍या अर्थाने परीक्षेचा. राजकीय पक्षांच्या आणि मतदारांच्याही! कारण, उद्याचा हा मतदानाचा निर्णायक क्षण. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कुठल्या चिन्हासमोर बटण दाबायचं, तेही जवळपास निश्चित असेलच आणि जर अनिश्चितता कायम असेल, तर वेळ अजूनही गेलेली नाही. नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण, ही संधी दवडली की पुढील पाच वर्षे हताशपणे राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडण्यापलीकडे आपल्या हाती काही एक उरणार नाही.
 
यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख मुद्द्यांवर खरं तर राजकीय पक्षांच्या प्रचारांची धुरा आधारभूत होती. पहिला मुद्दा प्रादेशिक अस्मितेचा, दुसरा विकासाचा आणि तिसरा प्रादेशिक अस्मिता जपत विकासाची वाट चोखाळण्याचा. मतदारांनी हे सगळं नीट पाहिलं, ऐकलं, वाचलं आणि अनुभवलंही. त्यामुळे प्रत्येक पक्षाची नेमकी भूमिका कोणती, हे आज घडीला म्हणावं तर अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट.
 
मतदार राजा तसा सूज्ञ आहेच. पण इतकी वर्षे आपण ज्या एका भावनिक मुद्द्यासाठी, मराठी माणसाच्या दैवताला साक्षी मानून मतदान केलं, त्यामुळे आपल्या आयुष्यात खरंच कितपत बदल घडला, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला मतदानापूर्वी विचारायलाच हवा. २४ तास पाणी, खड्डेमुक्त आणि ट्रॅफिक मुक्त रस्ते, सुखरूप प्रवास, शुद्ध हवा, खेळांसाठी मोकळी मैदाने अशा प्राथमिक सोई सुविधांसाठी अजून किती दशकं मुंबईकरांनी प्रतीक्षा करायची? आणि आणखी किती वर्षे घासून घासून गुळगुळीत झालेल्या मुद्द्यांवर आपण मतदानाचा हक्क बजावणार आहोत, हाही आत्मचिंतनाचा विषय आहे. त्यामुळे माझा परिसर, माझे शहर बदलले का? माझे जीवनमान खरंच या शहरात उंचावले का? हे स्वत:लाच विचारून पाहा, उत्तरं मिळतीलही, त्याचा लक्षपूर्वक विचार करा आणि मगच मतदानासाठी मार्गस्थ व्हा. ‘प्रादेशिक अस्मितेचा अभिमान, मराठी माणूस जगला पाहिजे, तो मुंबईतून हद्दपार होता कामा नये’ ही सगळी वचने वर्षानुवर्षे अफूच्या गोळीसारखी अगदी मुंबई-ठाणेकरांच्या मनामनांत ठासून बिंबवली गेली आणि मुंबईकरही खरं तर या अस्मितारुपी अफूला भुलत गेले. या अस्मितेच्या अफूच्या नशेला ते इतके अधीन झाले की, त्यांच्या संवेदना अगदी बोथट व्हाव्यात. अफूमध्ये वेदनाशामक आणि तापशामक अशी दोन द्रव्ये असतात. यामुळे सुरुवातीला मेंदू अतीव उत्तेजित होतो आणि नंतर त्याचे कामकाज ठप्प होऊन निद्रा मनाचा आणि शरीराचा कधी ताबा घेते, ते कळतही नाही. अफूसेवनाने माणूस आधी सहनशील होतो खरा, पण कालांतराने हीच अफू त्याच्या जीवावरही बेतू शकते. तसेच, लहान मुलांनी जास्त रडू नये, म्हणून त्यांना अफू देऊन शांत केले जात असे, म्हणजे पालक त्यांची कामे करण्यास मोकळे आणि आज मुलांना अफू देऊन गप्प करणार्‍या पालकांप्रमाणेच मुंबईकरांची काहीशी गत झालीये. त्यांच्यावर अस्मितेच्या अफूचा इतका भयंकर ओव्हर डोस झालाय की, वैयक्तिक आणि नागरी विकासाचे वाजलेले तीनतेरा ढळढळीतपणे दिसूनही, त्यावर अस्मितेची झापडं अजूनही लागलेली आहेत. हे दिसणारे चित्रही न दाखवणारी झापडं यंदा मात्र कुठल्याही परिस्थितीत उतरवायलाच हवी. या अफूच्या नशेच्या चिरनिद्रेतून जागे होऊन सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवत मतदारांनी मुंबईच्या भावी विकासाचे ‘व्हिजन’ आणि पुढील पाच वर्षांत अपेक्षित सुधारणांच्या मुद्द्यांवर मतदानातून आपला आक्रोश, इच्छा-आकांक्षा प्रकट करायला हव्यात. कारण, केवळ अस्मितेच्या जपनामाने विकासाचे इमले उभे राहणार नाहीत आणि ज्या पायाभूत सुविधा आपल्या नशिबी आजतागायत आल्या नाहीत, कदाचित त्या आपल्या पुढच्या पिढीच्याही नशिबी येतील की नाही, ही त्यामुळे तशी शंकाच!
 
 
खरंतर मतदानाचे मानसशास्त्र सांगते की, मतदार वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करूनच आपला मतदानाचा हक्क बजावत असतात. यामध्ये उमेदवाराची जात, त्याचा पक्ष, त्याचा एकूणच स्वभाव, आर्थिक-सामाजिक कुवत इत्यादी अनेक बाबींचा समावेश होतो पण या सगळ्यांवर अस्मितेचे इंजेक्शन मात्र अचूकपणे बोचते. नकारात्मक प्रचार हाही तसाच अगदी थेट मतदारांच्या मनाला भिडणारा. कारण, मानसशास्त्रीयदृष्ट्या, चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीच आपल्या अधिक लक्षात राहतात आणि मतदानाच्या प्रक्रियेतही याच नकारात्मक प्रचार आणि प्रसाराचा परिणाम मतदान करताना दिसून येतो. अस्मितेचा मुद्दा हा त्यामुळे वरकरणी सकारात्मक, सामाजिक हिताचा आणि भाषा समृद्धीचा वगैरे भासत असला तरी त्यातील पडद्यामागील नकारात्मकता आपण वेळीच समजून घ्यायला हवी. अस्मिता हवीच, पण तिचे रुपांतर अशा आंधळ्या अस्मितेत आणि अभिमानात होणार नाही, याची खबरदारी मतदारांनी घ्यायलाच हवी; अन्यथा या मराठी अस्मितेच्या ठायी विकासाची वहिवाट हरवून बसलेल्यांना पुन्हा अफूची गोळी देण्याची आयती संधी चालून येईल आणि सगळे पुन्हा कसे सुन्न सुन्न करून जाईल.
 
-विजय कुलकर्णी