त्यांनी उकिरडासुद्धा सोडला नाही...

    दिनांक  18-Feb-2017   


२५ वर्षांत शिवसेनाच केवळ युतीत सडली नाही, तर त्यांच्या कुकर्मांनी अख्खी मुंबई महानगरी कचर्‍याच्या डोंगरांखाली रुतून घुसमटू लागली. इतकी की, देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील आग तब्बल तीन-चार दिवस धुमसली आणि उपग्रहावरूनही त्याच्या काढलेल्या छायाचित्रांमुळे मुंबईचे नाव जगभरात धुरात मिळाले. एकाएकी प्राणवायू घातवायू ठरला आणि अनारोग्याच्या धुरक्यात मुंबई अगदी धुसर झाली. पण असा हा केवळ जळणारा कचराच नाही, तर या मुंबापुरीची कुठलीही पायाभूत सेवा नजरेसमोर आणा, त्याचा पुरता बोजवारा आज मुंबईत उडालेला दिसतो. सध्या कचर्‍याच्या समस्येने धारण केलेले भीषण रूप आणि त्यासंबंधी नंतर उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराच्या चक्रावणार्‍या प्रकरणांच्या दुर्गंधीने तर अख्ख्या मुंबईला प्रदूषणाच्या अधिकच खोल गर्तेत ढकलून दिले आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आहेत, पालिका प्रशासनावर अंकुश नसलेले सत्ताधारी आणि त्यांचे कंत्राटदारांशी असलेले आर्थिक लागेबांधे. अशा या ज्वलंत कचर्‍याच्या समस्येचा विचार करताना तीन प्रमुख गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. सर्वप्रथम कचर्‍याच्या डम्पिंगची योग्य व शहरापासून दूर अशी जागा निवडणे, दुसरे कचरा जमा करून डम्पिंगपर्यंत पोहोचविण्याची सुनियोजित व्यवस्था आणि तिसरे त्या कचर्‍याचे वर्गीकरण करून रिसायकलिंग करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे. पण या तिन्ही कचरा व्यवस्थापनाच्या शास्त्रीय प्रक्रियांचा मुंबई महानगरपालिकेने इतके वर्ष कधीही गांभीर्याने विचार केलेला सकृत दर्शनी तरी दिसत नाही.

दिवसाला नऊ हजार मेट्रिकटन इतका कचरा निर्माण करणार्‍या मुंबईच्या या कचर्‍याचा ७२ टक्के भार एकट्या देवनारच्या डम्पिंगवर. त्यातही कचरा साठविण्याची देवनारची क्षमता कधीच संपुष्टात आलेली. कांजूरचे डम्पिंगही जमिनीच्या वादामुळे सध्या संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहे. मग मुंबईचा कचरा टाकायचा तरी कुठे आणि किती वर्ष? खरंतर कचर्‍याची वेळोवेळी शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली असती, तर १३२ हेक्टर विस्तृत देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ११४ फुटी कचर्‍याचे मनोरे रचले गेले नसते.तेव्हा, गोव्यात भगवा फडकाविण्याची भाषा करणार्‍यांनी जरा तेथील शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला धावती भेटही दिली असती तरी थोडा प्रकाश नक्कीच पडला असता. पण... असो, इकडच्या महापौरांच्या परदेश वार्‍याही पर्यटनासम. अभ्यास दौरे वगैरे तर केवळ एक फार्सच! तेव्हा, मुंबईतील कचर्‍याची समस्या ही जागेच्या मर्यादेपुरती संकुचित नसून त्या कचर्‍याच्या वाहतुकीतही अनेक गैरप्रकार आढळून आले आहेत. ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या या श्रीमंत महापालिकेच्याकचरावाहक केवळ ९८३ गाड्या आणि त्यातही कहर म्हणजे त्यापैकी ६७७ या खाजगी, तर केवळ ३०६ या पालिकेच्या मालकी हक्काच्या. त्यामुळे प्रश्‍न हाच पडतो की, इतके कोट्यवधींचे बजेट असताना अजूनही मुंबई महानगरपालिकेला स्वत:च्या कचरावाहक गाड्या खरेदी का करता आल्या नाहीत? की मुद्दाम, कचरावाहकगाड्यांच्या नावे कंत्राटदारांकडून मलिदा लाटण्याचा उघडकीस आलेला प्रकार इतके वर्ष असाच बिनबोभाटपणे सुरू होता? खोट्या नंबर प्लेट्स, जीपीएस चक्कबाईकला, इतर गाड्यांना लावून कचरा वहनाच्या फेर्‍यांमध्ये हेराफेरी करणे (रोजच्या कचरा गाड्यांच्या फेर्‍या १,३९६ बरं का!) असले गैरव्यव्हार पालिकेतील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय राजरोसपणे करणे शक्यच नाही. तेव्हा, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कचरा खाऊन ढेकरही न देणार्‍यांना शासन झालेच पाहिजे.

 

असे हे मुंबईच्या कचर्‍याने कंत्राटदारांनाही कुबेराच्या धनदौलतीने गडगंज केले. पण कचर्‍यातून धनलाभाचे हे आशीर्वाद मात्र कोणत्या ‘मातोश्री’ने मुक्त हस्ते दिले, तेही जनतेसमोर आलेच पाहिजे. पण सर्वांना सामावून घेणार्‍या आपल्या सर्वसमावेशक मुंबईचाच आज असा उकिरडा झाला असून भ्रष्टाचार्‍यांनी हा उकिरडाकेवळ फुंकलाच नाही, तर त्यावर आपल्या धंद्याची आरास रचली आणि ‘कचरामाफिया’ नावाच्या बिनचेहर्‍याच्या भ्रष्टाचारी जातीचा जन्म झाला. त्यामुळेकचर्‍यातून या ऐश्‍वर्य प्राप्तीची ‘कला’ नेमकी कोणत्या ‘नगरी’च्या वाघाच्या डरकाळीवर इतकी बळावली, हे वेगळे सांगायला नकोच!

-विजय कुलकर्णी