आमच्याच शहरात आम्ही लाचार!

    दिनांक  17-Feb-2017   
 
 
राजकारणातील भाऊबंदकी आणि त्यातही सत्तेच्या उबेपोटी चुलत्यांच्या वेगवेगळ्या पेटणार्‍या राजकीय चुली महाराष्ट्राला तशा नवीन नाहीत. आपल्या या लोकशाहीप्रधान देशातील कुठल्याही राजकीय परिवाराच्या ‘गिरेबान’मध्ये झाकून बघितले, तर कमी-अधिक प्रमाणात कौटुंबिक कलह हा परंपरागतच! उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मुलायम-अखिलेश-शिवपाल यांचा ‘सायकल संघर्ष’ही नुकताच गाजला. पण आपल्या महाराष्ट्रात कायमच अतीव चर्चेचा, भाबड्या आशेचा आणि सध्या विखारी टीकेचा विषय म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि भाजपच्या वाढत्या प्रभावाने त्यांना लावलेला जबरदस्त सुरुंग...
 
२००६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज २०१७ मधील, एका आमदारासह एका दशकानंतरची बिकट राजकीय परिस्थिती वेगळी कथन करायला नकोच. मनसेला वेळोवेळी निष्ठावंतांनी दिलेली सोडचिठ्ठी आणि एकूणच मावळलेला ‘राज’कीय प्रभाव पालिकेच्या या रणधुमाळीत कुठे तरी निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे मराठी माणसाला, मराठी अस्मितेसाठी डरकाळ्या फोडणार्‍या वाघाबरोबर, विकासाचे म्हणवले जाणारे इंजिन जोडले जावे, यासाठी भरपूर प्रयत्नही झाले. काका, मामा, सर, भाऊ सगळ्यांनी सर्वकाही करून बघितले, पण दादर आणि वांद्य्राचे काही सूर जुळले नाहीच. मग काय, या नवनिर्माणाच्या इंजिनाची क्षमता एक डब्बा खेचण्याइतपतही गळून पडून नये आणि आपले इंजिन नाशिकमध्येच कायमचे रुतून बिघडू नये, या भीतीने ‘कृष्णकुंज’ ते ‘मातोश्री’ सारे रुसवे-फुगवे विसरून कॉलिंगने सेटिंगचा समझोता करण्याचा प्रयत्नही करून झाला. ‘राजदूत’ही ‘मातोश्रीं’ना चरणस्पर्श करून आले. पण युतीचा, मैत्रीचा हात काय, साधं बोटही यांच्या नशिबी आलं नाही. मिळाला तो केवळ ठेंगा. रिकाम्या हातानेच ‘बॅक टू दादर!’ मग ‘राजाला साथ द्या’ अशी नाटकी, सांगीतिक साद घालत ‘एकला चलो रे’ शिवाय या हारलेल्या घायाळ ‘राजा’कडे पर्यायच उरला नाही. त्यामुळे ‘आधी टाळी कोण देणार आणि मग सर्वप्रथम हात पुढे कोण करणार, ’अशा टाळ्यांच्या टवाळकीत ठाकरी भावांचा हा ‘टाळाटाळी’चा खेळ चांगलाच रंगला आणि तसाच संपलाही... त्यामुळे अहंकाराच्या या लढाईत यापुढेही महाराष्ट्रात टाळीची देवाणघेवाण होईल, ही शक्यता तशी धूसरच!
 

 
पण यांचे एक मात्र बरे हं.... एखाद्या भावाच्या छातीत दुखू लागलं की, दुसरा लगेच हॉस्पिटलात सारथ्य करण्याइतपत धावून येतो, पण राजकीय पटलावर मात्र बुद्धिबळातला त्यांचा कट्टर काळा-पांढरा विरोध. त्यामुळे मुंबईकरांना गेल्या दशकभरात या भाऊबंदकीच्या भेटीगाठींची आणि नंतरच्या भांडणांची इतकी सवय झालीयं की, दोन्ही भावांनी एकत्र यावे, ही मराठी जनमानसाची इच्छाही आता मावळतीकडे झुकली आहे. कारण, राजकारणात रक्तही आपलं नसतं, तेचं खरं! आणि याची प्रचिती अशी वेळोवेळी खुद्द राजकारणीच त्यांच्या कृत्यांनी सिद्ध करतात. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्क आणि अधिकारांचा गाजावाजा करत वाक्बाण सोडणार्‍या या पक्षांमुळे मराठी माणूसच जखमी, लाचार होण्याची वेळ ओढवली आहे. कोणता झेंडा हाती घ्यावा, इथंपासून ते मराठी अस्मितेचा मुद्दाच हळूहळू क्षीण होत चालला आहे. मराठी माणसाला मराठी माणसांचीच ही मुंबई महानगरी परवडण्यापलीकडे असह्य झाली आहे. कारण, भाषिक राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणारे हे दोन्ही पक्ष मराठी माणसाचे हित विसरून टक्केवारीच्या कंत्राटांत रमले आहेत. त्यातच बाळासाहेबांच्या नावाखाली मराठी माणसाला भावनिक साद घालत गुंतविण्याचा एकीकडे प्रयत्न करायचा आणि मग त्यांचेच चिकन सूप, वड्याचे तेलही काढून दाखवायचे, असे तुपावरचे लोणी लाटण्याचे ‘ब्रदर्स’चे राजकारण. त्यामुळे प्रादेशिक अस्मितेचे हे राजकारण विकासपूरक नक्कीच नाही, याची चांगली जाण सूज्ञ मुंबईकरांना असून त्यांचे विचार मतांच्या परिवर्तनातून दिसून येतीलच, हे निश्चित.
-विजय कुलकर्णी