मुंबई महापालिकेतही मनमोहन सिंग?

    दिनांक  16-Feb-2017   

 
केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात लाखो कोटींचे घोटाळे झाले. हे घोटाळे होऊनही त्यात पंतप्रधान मनमोहनसिंगांचे हात मात्र भ्रष्टाचाराने बरबटल्याविना राहिले, असा त्यांचा दावा असतो. यावर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहनजींच्या स्तुतिपर केलेल्या वक्तव्यावरुनही बराच धुरळा उडाला. अर्थात सभ्यतेचा रेनकोट घालून भ्रष्टाचाराच्या बाथरुममध्ये काळ्या पैशांचा वर्षाव होत असतानाही मनमोहनजी भिजले नाहीत, हा मोदीजींच्या टीकेतला अर्थ होता.
असेच काही रेनकोटधारी आपल्या मुंबईतही आहेत. जे कुठलीच निवडणुक लढवत नाहीत. आव मात्र सगळी मुंबई आपली खानदानी मालमत्ता असल्याचा आणतात. निवडून गेले की लोकांना उत्तरदायी व्हावे लागते मात्र, घरात बसून आरोळ्या ठोकल्या की काम झाले किंवा नाही, त्यांना आपली जबाबदारी नसल्याचा साक्षात्कार होतो.
 
दिल्लीमध्ये सोनियांनी मनमोहनना आणून बसवले आणि देशाचा कारभार मात्र, स्वतःच हाकला. ही वस्तूस्थिती असली तरी, निदान मनमोहन सिंगांची काहीतरी क्षमता तरी होती. मुंबईतील घराणेशाहीचे सेनापती आणि त्यांच्या खुशमस्कर्‍यांचे मात्र जरा वेगळेच आहे. येथे क्षमताही नाही आणि कार्यकर्तृत्वही नाही. हेमचंद्र गुप्ते व शुभा राऊळ यांच्यासारखे सन्माननीय महापौर वगळता सध्याच्या सत्ताधारी पक्षाने मुंबईकरांना दिलेले बाकी सगळे महापौर हे रबर स्टॅम्पच होते. केवळ आदेश आला की, त्याच्या तालावर नाचणारे हुजरे म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरु झाली आणि विझली देखील.
 

 
सध्याच्या महापौर तर सुरुवातीलाच गाजल्या त्या लाल दिव्याची गाडी हवी म्हणून. आपण महापौरपदी बसलो की आपल्याला शानदार नी आलीशान गाडीघोडे दामटत मानमरातबात मिरवता येईल, हा त्यांचा यामागचा उद्देश होता. मात्र, केवळ वांदर्‍याच्या कृपाप्रसादाने मिळवलेले मुंबईचे प्रथम नागरिकत्व म्हणून असलेले आपले कर्तृत्व त्या विसरल्या. मुंबईच्या पालिकेत केवळ एका घराण्याची सत्ता आणि त्यांच्या तालावर कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचणारे भारवाहू असले की, याव्यतिरिक्त दुसरे काही होणे शक्यही नसते म्हणा.
 
असे असताना आता मुंबईकरांना केवळ आदेशाचे शब्द झेलणारे झेले नव्हे, तर विकासाचे इमले रचणारे दुरदृष्टी असलेले नेतृत्व हवे आहे. आतापर्यंत मुंबई आमचीच असे वचावचा ओरडत पण प्रत्यक्षात मात्र तिला ओरबाडत, खरवडत फक्त दोन्ही हातांनी घेणारेच इथे मिरवले. आता मात्र मुंबईकरांना, मुंबईला प्रगतीची, नाविन्याची विकासगंगा देणारे हात हवेत. हे मुंबईकरांच्या प्रतिक्रिया-प्रतिसादांतूनही दिसतेच आहे.
 
मुंबई महापालिकेचे बजेट एखाद्या छोट्या राज्याच्या बजेट इतके आहे. असे असूनही मुंबईच्या बकालपणाचाच गाजावाजा नेहमी होतो. याला कारणीभूत महापौरपदी बसणारे आणि त्यांना त्या ठिकाणी आणून बसवणारे खंडणीखोरांचे सम्राटच नव्हे काय? स्वतःच्या विचाराने एखादा अभिनव प्रकल्प राबवण्याची मोकळीक नसणारे पात्रताशुन्य लोक महापौरपदी चिकटवायचे आणि त्यांच्या हाताने मलिद्याचा प्रसाद खायचा. हाच कित्ता सत्ताधारी पक्षाने नेहमी गिरवला.
कॉंग्रेस आणि सत्ताधार्‍यांत तसेच मनमोहनसिंग आणि मुंबईच्या गेल्या २५ वर्षांतील महापौरांत हेच साम्य आहे. मुंबईचे कारभारीही सेम टू सेम तसेच आहेत. केवळ कोट्यावधी रुपयांच्या प्रस्तावावर सही करणे आणि टक्केवारीची रक्कम सुखरुपपणे आपल्या सरदाराकडे सुपुर्द करणे एवढेच त्यांचे कार्य. असे असताना मुंबईकरांसाठी असले शिक्केबाज मनमोहन कशाला हवेत.?
 
- महेश पुराणिक