कोटी कोटींचे नगरसेवक आमचे... त्यांच्या म्होरक्याला कोटी प्रणाम!

    दिनांक  15-Feb-2017   
 
 
निवडणुका आल्या की, त्यात प्रत्येक प्रभागात, मतदारसंघात नागरिकांसमोर पाच वर्षांत एकदाच हात जोडून उभ्या राहणार्‍या उमेदवारांच्या संपत्तीची चर्चा नेहमीच होते. यंदाही मुंबई महापालिकेतील एका ‘श्रद्धावान’ नगरसेविकेने आपली संपत्ती जाहीर केली. त्यांनी संपत्ती जाहीर करताच सामान्य मुंबईकरांचे मात्र डोळे पांढरे झाले नसते तरच नवल! केवळ नावाचाच ‘राजा’ असलेल्या मतदारांच्या अपेक्षांची कोणतीही पूर्तता न करता गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेच्या सत्तेवर भुजंगाप्रमाणे अर्थपूर्ण वेटोळे घालून बसलेल्या या पक्षाच्या सामान्य उमेदवारांचे सत्ताप्राप्ती झाली की नशीब एकदम कसे फळफळते, याचे हे एक उत्तम उदाहरणच.
 
मागच्या पंचवार्षिकला एकपट असलेली संपत्ती थेट पंचवीस पट-पंचवीस कोटींचे उड्डाण घेते म्हणजे, यामागे नक्कीच काहीतरी संशयास्पद नि सांगता न येणार्‍या व्यवहारांची खाण असायला हवी, हे सामान्य मतदारांनाही समजू शकते. अर्थात पक्षप्रमुखांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असले की, विचारणारे कोणी नसलेल्या आणि मुंबईकरांच्या तोंडाला कायम पाने पुसण्याचीच ख्याती असलेल्या अशा धन्नासेठांची झिंग मुंबईकरच उतरवतील, हेही खरेच म्हणा.
 
परंतु, एवढ्या सगळ्या बजबजपुरीत मर्द मावळ्यांच्या सरदाराला याचे कसलेही सोयरसुतक असण्याची अजिबात शक्यता नाही. कारण आपल्या भाषणात नेहमी तेच ते मावळे, कावळे, कोथळे, खंजीर, शान-मान वगैरे भावनिक, पण शिळ्या-पाक्या शब्दांचे भेंडोळे फेकत मर्दानगीचा आव आणत ते सध्या गल्लोगल्ली-गावोगावी हिंडताहेत. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की, मुंबईकरांना आपल्या समस्या सोडवणारा नगरसेवक नि महापौर पाहिजे की, केवळ स्वतःच्या संपत्तीची कोटीची कोटी उड्डाणे घेणारा, घराण्याच्या तालावर नाचणारा हुजर्‍या हवाय?
 
घराण्याच्या, अस्मितेच्या, शिवरायांच्या नावावर जनतेला भुलवायचे, सतत खेळवत राहायचे, सोई-सुविधांच्या नावाने सारी बोंबाबोंब माजू द्यायची एवढेच कर्तव्य असलेल्या पक्षाला पैसा मात्र बक्कळ हवा असतो, हे त्यांनी विविध ठिकाणी दिलेल्या उमेदवारांवरूनही सहज लक्षात येते. मात्र, या लोकांनी कधी सामान्यांना भेडसावणारे ज्वलंत, पण साधे साधे प्रश्न त्याच बक्कळ सामर्थ्याने सोडवल्याचे कधी समोर आले नाही.
 
’मुंबई कोणाची, आवाज कोणाचा?’ असे किंचाळत राहायचे आणि मराठी माणसांच्या निवार्‍याचा प्रश्न आला की, आपला कोट्यवधींचा ‘अर्थपूर्ण’ मतलब साधत टोलेजंग इमारती उभारून, त्याला त्यांच्याच भूमीतून हद्दपार करायचे, यातून अमाप पैसा कमवायचा, तो पुन्हा निवडणुकीत लावायचा, पुन्हा मतदाराचा खिसा ओरबाडायचा हाच यांचा धंदा. अशा पक्षाला निष्ठावान किंवा काम करणारे नगरसेवक वा उमेदवार नको असतात, तर केवळ तिजोर्‍या भरणारे, वांद्रे महालाच्या तालावर नाचणारे मर्कट हवे असतात, कर्तृत्वशून्य लादलेले नेतृत्व हवे असते. त्यामुळे आता सामान्य मुंबईकरांच्या जिवावर पैशांची शिखरे गाठणारे, कर्मदरिद्री कुबेरांचे उकीरडे चिवडणारे धनाढ्य उमेदवार सामान्य मतदार पुन्हा निवडून देणार का? एका बाजूला मुंबईच्या विकासाचा-प्रगतीचा ठोस आराखडा असलेला पक्ष आणि त्यांचे उमेदवार असताना नेमकी याच्या उलट परिस्थिती असलेले आणि भाजप-मोदींच्या नावाने शिमगा करून घसा फाटेपर्यंत ओरडणार्‍या उमेदवारांपैकी हे कोटी कोटीचे प्रकार कोणी केले, याचा जबाब सगळ्यांवर आरोप करीत सुटलेल्या पक्षप्रमुखांना जरुर द्यावा लागेल.
 
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर अशांची यादीच जाहीर केली आहे. एवढी रक्कम यांच्या खात्यात येते कुठून? हा प्रश्नही उपस्थित केला आहे. असे असताना मात्र पक्षप्रमुख एका बाजूला नोटाबंदीचा कडवटपणे विरोध करतात आणि दुसर्‍या बाजूला त्यांच्याच नगरसेवकांच्या समृद्धीत वाढच होत राहते, हा विरोधाभास कसा?
 
- महेश पुराणिक