‘वॉर रुम’ - नव्या राजकारणाची नवी संकल्पना

    दिनांक  14-Feb-2017   
 
 
 
निवडणूक काळात निवडणूक लढणार्‍या पक्षाचे कार्यालय, खास निवडणुकीसाठी सज्ज असलेले पक्षाचे एखादे अतिरिक्त कार्यालय, याशिवाय सध्या आणखी एक ठिकाण निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि ते म्हणजे पक्षाची ‘वॉर रुम!’ या नावातच त्याचा सारा अर्थ दडलेला आहे. ही ‘वॉर’ म्हणजे ढाली-तलवारी किंवा बंदुकांची वॉर नाही, तर निवडणुकीतील पक्षाचे धोरण, प्रचार यंत्रणेची निर्मिती व समन्वय, प्रचारात राबवायच्या विविध कल्पना इथपासून ते प्रसारमाध्यमांशी समन्वय इत्यादी कामे या ‘वॉर रुम’मधून केली जातात. या संकल्पनेचे खरे श्रेय जाते ते भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना. त्यांच्या पश्चात २०१४च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी या यंत्रणेचा प्रभावी वापर केला आणि त्यानंतर राजकारणात ही संकल्पना रुजली ती कायमचीच! आज निवडणुकीतील व निवडणूक वगळताही राजकारणाचा ‘वॉर रुम‘ हा अविभाज्य भाग आहे.
 
श्वेता शालिनी (भाजप प्रवक्ता)
सार्‍या राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही भाजपने सुसज्ज अशी ‘वॉर रुम’ उभी केली आहे. भाजप प्रवक्ता श्वेता शालिनी व ‘वॉर रुम’ सल्लागार प्रफुल्ल निकम हे या ‘वॉर रुम’ची जबाबदारी सांभाळत आहेत. पक्ष आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करणे उदा. सरकारच्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे, निवडणूक धोरणाशी संबंधित कामइत्यादी कामे या ‘वॉर रुम‘च्या माध्यमातून केली जातात. यामध्ये कामकरणारी टीमही पूर्णतः व्यावसायिक व संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असतात. ‘वॉर रुम’ क्षेत्र सर्वेक्षणही करते. मुंबईच्या निवडणुकीसाठी भाजपच्या या ‘वॉर रुम’ने अनेक वेगळ्या कल्पना राबविल्या आहेत. यात काही पारंपरिक आहेत, तर काही पूर्णतः नव्या. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपली ताकद ओळखून धोरण ठरविले जाते. उदा. जिथे आपली ताकद कमी आहे तिथे कोणकोणत्या मार्गाने आपली ताकद वाढवता येईल, कोणता नेता तिथे गेला तर पक्षाला प्रभाव निर्माण करता येईल, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या नव्या कल्पना राबविता येतील इत्यादी.     
प्रफुल्ल निकम (वॉर रूम सल्लागार)
 
 
‘वॉर रुम’मध्ये कामकरणारे सर्वच जण राजकारणाशी संबंधित असतातच असे नाही. कदाचित राजकारणाबाहेरचेच जास्त असू शकतात. या टीमला उद्दिष्टे निश्चित करून देण्याचे व त्यांच्याशी समन्वय साधण्याचे कामपक्षातील जबाबदारी नेमून दिलेले नेते करतात. भाजपच्या ‘वॉर रुम’मध्ये ही जबाबदारी सध्या प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी सांभाळत आहेत; परंतु प्रत्यक्षात कामकरणारे लोक हे सक्रिय राजकारणाशी संबंधित नसतात. भले त्यांनी भाजपच्या किंवा भाजपशी संबंधित संघटनांच्या काही कामांत, उपक्रमात सहभाग घेतला असेल. संशोधन आणि विश्र्लेषण, माध्यमव्यवस्थापन, कार्यक्रमांचे व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात कामकरणारी ही मंडळी आहेत. भाजपने आपल्या ‘वॉर रुम’चे तीन स्तरांत नियोजन केले आहे. पहिल्या फळीत पक्षनेते व पक्ष कार्यकर्ते आहेत. दुसर्‍या फळीत पक्षाचे स्वयंसेवक-कार्यकर्ते आहेत जे दिवसाचे सरासरी दोन-तीन तास प्रचाराशी संबंधित कामकरतात. यांची संख्या सुमारे सहा-सात हजारांच्या आसपास आहे, तर तिसर्‍या फळीत निवडणूक धोरणाचे प्रत्यक्ष नियोजन व अंमलबजावणी करणारे लोक असून यांची संख्या ६०-७०च्या आसपास आहे.
 
‘‘भाजपचा प्रचार हा सकारात्मक, विकासाच्या मुद्द्यावर भर देणारच असला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिल्या आहेत. त्यामुळे आमचा अजेंडा हा पूर्णपणे सकारात्मकच आहे. पण समजा, विरोधी पक्षांकडून काही कुरापत काढण्याचा प्रयत्न झाला, तर आम्हीही त्याला तितकीच कडक प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहत नाही,’’ असे प्रफुल्ल निकम सांगतात.
 
 
ही ‘वॉर रुम’ केवळ निवडणुकीपुरतीच कामकरते असेही नाही. निवडणुकीनंतरही सरकारची धोरणे, विविध योजना, राजकीय घडामोडी, त्यावर लोकांमधील प्रतिक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी, विश्र्लेषण करण्यासाठी ‘वॉर रुम’च्या रूपाने छोटी टीमकामकरतच असते. पण निवडणुकीच्या काळात अर्थातच कामजास्त असल्याने जास्त लोक लागतात, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची जास्त गरज भासते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात ‘वॉर रुम’ ही खरोखरच ‘वॉर रुम’ बनलेली दिसते. राजकारण आता आधीसारखे राहिलेले नसून ते पूर्णपणे व्यावसायिक बनले असल्याचीच ही पावती आहे. आता राजकारण ही केवळ आवड म्हणून करण्याची गोष्ट नाही. समाजाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास करून, लोकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यावर पक्षाचे व पक्ष धोरणाचे वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत नियोजन व समन्वय करणारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मिळून बनलेली ‘वॉर रुम’ ही एक जबरदस्त यंत्रणा आहे. सध्याच्या राजकारणाचे हेच वर्तमान असून हेच भविष्य असणार आहे.
 
‘वॉर रुम’द्वारा ९० टक्के माहिती, १० टक्के टीका
 
‘‘वॉर रुमच्या एकूण कार्यशैलीबाबत अनेक समज-गैरसमज लोकांमध्ये असतात. उदाहरणार्थ सोशल मीडियावर आपल्या पक्षाच्या विरोधकांची थट्टामस्करी, टीका करणारी (ज्याला सध्या ‘ट्रोल/ट्रोलिंग’ म्हणतात) अशी फौज म्हणजे ‘वॉर रुम.’ पण प्रत्यक्षात तसे नसते. ‘वॉर रुम’मध्ये सोशल मीडिया चालविणारी स्वतंत्र टीमआहे. आमचा एकूण प्रचार पाहिला, तर त्यात साधारण ९० टक्के भाग हा सरकारच्या कामाची माहिती देणारा, सकारात्मक आहे. तर जेमतेमदहा टक्के भाग हा टीकात्मक आहे.’’-
‘वॉर रुम’ सल्लागार प्रफुल्ल निकम
 
निमेश वहाळकर