जोड्या जुळू लागल्या

14 Feb 2017 21:05:00


नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. राजकारणातही सध्या आतापर्यंत कधी न जुळणार्‍या जोड्या जुळू लागल्या आहेत आणि या सर्वांचा रोख मात्र केवळ आणि केवळ भाजपचा विरोध करणे हाच आहे. एकमेकांना इशारे देत सत्तासुंदरीला कधी एकदा आपल्या मांडीवर खेळवतोय, यासाठी उतावीळ झालेल्या लोकांत आता उत्तरेत राहुल गांधी आणि अखिलेश यादव, तर मुंबईत उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस असे सूत जुळत आहे. याआधी एकमेकांकडे कायमडोळे वटारून पाहणार्‍यांत सत्ता जाण्याच्या भयाने मात्र चांगलीच जवळीक निर्माण झाली. उत्तरेत तर आघाडीचा पाळणाही हलला. इकडे नोटाबंदीची मिरची चांगलीच झोंबल्याने मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख कॉंग्रेसच्या गुणगाणांची दोरी हाती घेऊन आपणही आघाडीचा पाळणा हलविण्यास इच्छुक असल्याचे इशारे स्वतःच्या वर्तनातून देऊ लागले आहेत.
 
नरेंद्र मोदी आणि भाजपच्या झंझावातापुढे दांडी गूल झालेल्या स्वपक्षाच्या यादवीत वाताहत झालेल्या अखिलेश आणि राहुल यांची चांगलीच पंचाईत झाली. मग आपली पंक्चर झालेली सायकल वाचविण्यासाठी अखिलेशने राहुलच्या हाताचा आधार घेतला. अर्थात पिता मुलायमसिंह यांचा आशीर्वाद आणि मतदारराजांची साथ या जोडगोळीला खरेच मिळेल का, लोकांच्या पसंतीला येईल का, हा प्रश्नही हळूहळू मतपेटीत बंद होतोय.
 
इकडे, महाराष्ट्रात शिवसेना आणि कॉंग्रेसची आघाडी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबईतील कम्युनिस्टांचे प्राबल्य संपविण्यासाठी केलेली आघाडी असो किंवा इंदिरा गांधींना आणीबाणी काळात दिलेला पाठिंबा असो. याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची वसंतसेना अशी संभावनाही करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी शिवसेनेने आपल्या मनात कॉंग्रेसप्रती असलेली हळूवार भावना दाखवून दिली. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडणुकीवेळी तर ही भावना जास्तच वाढली, नि आपण ज्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहोत, हे विसरून शिवसेना चक्क कॉंग्रेसच्या नावाने कंकण बांधण्यास तयार झाली.
 
 आता तर, उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस प्रेमाचे एवढे भरते येत आहे की, त्यामुळे खुद्द कॉंग्रेसलाही बास म्हणण्याची वेळ आली. पण उद्धवजी मात्र, ’करू कौतुक गडे किती’च्याच पावित्र्यात आहेत. देशाचा सर्वाधिक विकास कॉंग्रेसनेच केला, असे सांगत ते आता खुल्लमखुल्ला कॉंग्रेसशी जोडी जुळविण्याचे स्वप्न थाटत आहेत. उद्धव ठाकरेंचा जोडी जुळविण्याचा हा बाणा पाहून कॉंग्रेसलाही चांगल्याच गुदगुल्या होत आहेत. अर्थात सत्तेसाठी मुस्लीमलीगसारख्यांशी आणि आता आता तर ‘एमआयएम’सारख्या पक्षाशीही सौख्य करणारे कोणाशीही आपली नाळ जुळवू शकतात, हेही तितकेच खरे म्हणा.
 
मात्र, या सर्व गदारोळात कॉंग्रेसने केलेल्या भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे काय? शिवसेनेची कॉंग्रेसच्या घोटाळ्यांनाही संमती आहे का, की शिवसेनाही त्यात सहभागी आहे? की नोटाबंदीने दिवाळखोर झाल्यासारखे वागत असलेल्या उद्धवना आता कॉंग्रेसचे सारेच गोडगोड वाटत आहे?
 
उद्धव ठाकरे यांचा फक्त कॉंग्रेसशीच घरोबा करण्याचा इरादा नाहीये, तर स्वतःला प्रखर, ज्वलंत हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणार्‍या ठाकर्‍यांनी तिकडे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पदर पकडून भाजपवर निशाणा साधण्याचाही प्रयत्न केलाय. नोटाबंदीमुळे आपल्या राज्यातील सगळ्याच बर्‍या-वाईट कारनाम्यांचे दुकान उठल्याने ममतादीदींनी चांगलाच थयथयाट केला. ममतादीदी एकट्याच खिंड लढवत असल्याचे पाहून उद्धवजींना राहवले नाही नि त्यांनी आपले शिलेदार ममताच्या दावणीला बांधले. या काळात बंगालमध्ये हिंदूंवर झालेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात मात्र सेनानेतृत्वाने ‘ब्र’ही काढला नाही. नेहमी आपल्या आक्रमकतेची टिमकी वाजविणार्‍या उद्धव ठाकरेंनी यावेळी डोळ्यांवर कोणती पट्टी बांधली होती. मुख्य मुद्दा म्हणजे या काळात पक्षाच्या संजयलाही आपल्या दूरदृष्टीने कशाचे दर्शन झाले नाही.
 
राजकारणातील या जोड्या जुळू लागल्याने सामान्य नागरिकांचे मात्र, चांगलेच मनोरंजन झाले. आपल्या खुर्चीला, तिजोर्‍यांना जरा झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली की, कोणाशीही संग करण्यासाठी अखिलेश असो की राहुल, वा उद्धव असो की, कॉंग्रेस आणि ममता असो की, उद्धव ठाकरे सारेच एका पायावर तयार असल्याचेच यातून स्पष्ट होत नाही का?
 
 
-महेश पुराणिक 
Powered By Sangraha 9.0