खरे फेकू कोण?

    दिनांक  14-Feb-2017   

 
शिवसेना खा. राहुल शेवाळे यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये माहीमकॉजवे येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढील ६ महिन्यांत सुरू करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आज फेब्रुवारी २०१७ उजाडले तरी शेवाळेंनी दिलेले आश्वासन काही पूर्णत्वास गेले नाही परंतु, माहिम नदीवर प्लॅस्टिक, कचरा, विषारी-रासायनिक पदार्थ आणि त्या जोडीला घोटाळ्यांचे शेवाळ मात्र तयार झाले. आता यावरुन खरे फेकू कोण, हे धडधडीत सत्य मात्र मुंबईकरांसमोर पुढे आले, हे खरेच.
 
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणार्‍या दहिसर, पोईसर आणि गोरेगावातून वाहणारी ओशिवरा नदी आज मरणासन्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे. या सर्वच नद्यांवर जलपर्णी, हिरवा थर, प्लॅस्टिक आणि कचर्‍याचे थरच्या थर साचलेत. परिसरातील रहिवाशांना कायमच नाके मुरडत नी तोंडावर रुमाल धरून जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे पण गेल्या कित्येक वर्षांपासून पालिकेची सत्ता आपल्या हातात काबीज केलेल्या सेनेला या गोष्टींवर कोणताही उपाय शोधण्याचे सोयरसुतक नाही. केवळ बोलघेवडे खासदार नि त्यांचे शिलेदार यांनी सोडलेल्या शाब्दिक बुडबुड्यांचे समर्थन करणे हाच त्यांचा धंदा झाला आहे.
 
माहिम खाडीत वाहणार्‍या मिठी नदीत अंधेरी, कुर्ला, साकीनाका, धारावी यासारख्या ठिकाणांतून ४० केंद्रांवर घाण वाहून येते. तरीही या ठिकाणी सांडपाणी प्रकल्प उभारण्याची सुबुद्धी महापालिकेला झाली नाही. शहरातील नदीनाले स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी महापालिका तब्बल ७०० कोटींच्या निधीची तरतूद करते, परंतु हे ७०० कोटी नेमके कोणाच्या घरात वाहतात नी कोणाच्या तिजोर्‍या भरतात, हेही मुंबईकरांना समजणे गरजेचे आहे.
 
 मुंबईतील नद्यांच्या गलिच्छ अवस्थेवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने डिसेंबर २०१६ मध्येच मुंबई महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचे निकष आणि नियमपाळण्याची तंबी दिली होती. एवढे होऊनही, सामान्य मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असेच, वर्तन करण्यामागे सत्ताधार्‍यांचा नेमका कसला डाव आहे, हेही सर्वांसमोर यायला हवे. मुंबईच्या या विविध प्रभागांतील आजी-माजी नगरसेवक केवळ उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यातून शिवसेना आणि आश्वासनबहाद्दर सामान्यांचे जीवनात हालच कसे होतील याची तजवीज करत असल्याचे स्पष्ट होते.
 
-महेश पुराणिक