भीती नव्या राहुल गांधींची

    दिनांक  14-Feb-2017   

नवी दिल्लीमध्ये बसून आणि उठसूट परदेशवारी करणार्‍या राहुल गांधींची राजकारणातील कॉपी आता मुंबईतही अवतरलीय. आम्हीच मराठीचे रक्षक असल्याच्या थाटात नेहमीच कर्कश्श आवाजात ओरडणार्‍या, पण स्वतः कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतलेल्या या मुंबईच्या पप्पूने महापालिका निवडणुकीत रस्तोरस्ती भटकत मुंबईकरांचे चांगलेच मनोरंजन सुरू केलेय. अर्थात त्यांनी कितीही विदुषकी बडबड केली तरी ती बाष्कळ आणि बालिशच असते आणि एका कानाने ऐकून त्याच कानाने सोडून देण्याच्याही लायकीची नसते, हे मुंबईकरही पक्का ओळखून आहेच.

गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता असूनही ज्यांना मुंबईचा विकास नव्हे तर मुंबईला भकासच करता आले, ते आता आपल्या आजोबांच्या पुण्याईवर मतांचा जोगवा मागत, म्हणजे बांडगुळी परपोषी रूप घेऊन फिरतायेत. त्यात भर म्हणजे कोणालाही कीव वाटेल असा ओढून-ताणून आणलेला वाघोबाचा आव आणि तो पाहून मांजरसुद्धा झडप घालेल की काय असले पुचाट वर्तन. मग काय, मुंबईकरांच्या नशिबी आहेच, पुन्हा पुन्हा तेच ते जुन्या-पुराण्या भावनिक विषयांचे नर्तन.

नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा किंवा प्रगतीचा कोणताही ठोस कार्यक्रमनसणार्‍या झुंडसेनेकडून यापेक्षा दुसरे काही कोणी अपेक्षितही नाही, हेही खरेच म्हणा. पण आता पक्षाची तिसरी पिढी राजकारणात आलीय म्हटल्यावर काहीतरी नवी ध्येये, नवी दृष्टी, नवी उमेद असेल अशी अपेक्षा सामान्य मुंबईकराने केली तर ती अवास्तव तर म्हणता येणार नाही ना? मात्र, युवा शिपायांची भाऊगर्दी झालेल्या आणि युवकांसाठी कोणताही प्रगतीशील कार्यक्रमनसलेल्या या संघटनेच्या युवराजाने काही विधायक कामे करण्याऐवजी चक्क पेंग्विन नामक पक्षी राणीच्या बागेत आणण्याचा हट्ट धरला. आपल्या निरागस पुत्राच्या लडिवाळ बालहट्टासाठी मग शिवशाही नाही, पण झुंडशाहीची परंपरा पुढे चालवणार्‍या पक्षप्रमुखांनीही मग हा हट्ट ’सर आँखो पे’ म्हणत पुरवला. पुढच्या घटनाक्रमाने मात्र त्यांनी स्वतःचे चांगलेच हसेही करून घेतले, हेही खरेच. पण, पेंग्विनसारखे पक्षी सांभाळण्याची आपल्या महापालिकेची लायकी नसतानाही या बालहट्टापायी एका निष्पाप पेंग्विनचा आणि मुंबईकरांच्या कररूपी पैशाचा बळी मात्र घेतला.

शिव्या-शाप, कौल असल्या शब्दांवर विश्वास असणार्‍या या पक्षाला आता त्या पेंग्विनचाही तळतळाट लागेल का?

सुविधांच्या नावाने पुरती बोंबाबोंब उडालेली असताना आणि मुंबईकरांना पुरते देशाधडीला लावून झालेले असताना या महाशयांनी एक नवीनच खुळ काढले, ते म्हणजे नाईट लाईफचे! काय तर म्हणे, मुंबईकरांना रात्रीही आरामात, मजेशीरपणे जगता यावे! पण, आता यांच्यामुळे मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेल्या सर्वच प्राथमिक गरजांच्या गैरसोयीत जिथे दिवसाही श्वास घेणे कठीण झालेय, तिथे नाईट लाईफ सुरू करून यांना कसली मजा मारायची होती?
केवळ परदेशात पाहिले म्हणून आपल्याकडेही तेच हवे असा शेंबडा हट्ट धरणार्‍या आणि वाघ वाघ म्हणत स्वतःचे हसे करून घेणार्‍या वांदर्‍याच्या या युवराजांचे पार्सल नेमके कुठे पाठवायचे, हे समस्त मुंबईकरांनी ठरवण्याची वेळ खरे तर आता आली आहे.

- महेश पुराणिक