#ओवी लाईव्ह अमृताहुनी गोड

    दिनांक  12-Feb-2017   


सकाळचा चहा झाल्यावर तिघेही टेबलाशी आपापली कामे घेऊन बसले. नेहा तिचे न संपणारे पुस्तक वाचत बसली. सुला मावशी तिचा कणाकणाने वाढणारा स्वेटर विणत बसली. आणि सिद्धार्थ रविवारचे २ -३ पेपर घेऊन वाचत बसला. टेबलावरचे चहाचे कप कधीच वाळून गेले होते. बिस्किटांचे, टोस्टचे डबे पण तसेच पडले होते.

निवांत पेपर वाचून झाल्यावर, अंघोळ वैगरे आटोपून सिद्धार्थ रुक्षपणे म्हणाला, “नेहा, दहा वाजत आलेत. आपल्याला १२ ला निघायचे आहे. उठ आता, स्वयंपाकाला लाग!”

नेहाने चिडून पुस्तक बंद केले, आणि टेबलावर पुस्तक आपटले. “पाहिलत मावशी, कसं बोलतो हा! जहाजावरच्या Captain सारखं नुसत्या order सोडायच्या! ‘नेहा, स्वयंपाक कर!’, ‘नेहा, पुस्तक बाजूला ठेव!’, ‘नेहा, उठ!’, ‘नेहा, बस!’”, सिद्धार्थकडे रागाने पाहत नेहा म्हणाली.

सिद्धार्थ म्हणाला, “मावशी मी काही चुकीच सांगितलं का? योग्य तेच बोललो ना मी? आता स्वयंपाक नाही केला तर उशीर होईल ना.“
सुला मावशी म्हणाली, “अरे, योग्य तेच पण गोड बोलले तर बिघडले कुठे? प्रेमाने बोलणे ही सुद्धा अहिंसा आहे! ते असो. नेहा, समोरच्याने कसे बोलावे ते आपण तर ठरवू शकत नाही. पण तू स्वतः प्रेमाने बोलायचे ठरवू शकतेस!”
नेहा म्हणाली, “बोलण्यातील अहिंसा? मावशी अजून थोड उकलून सांगा ना.”
“वाचेने सुद्धा हिंसा होऊ नये, यासाठी शब्द जपून वापरले पाहिजेत असे ज्ञानेश्वर म्हणतात. एक तर कमी बोलावे. आणि जे बोलू त्याने कुणाचे मन दुखणार नाही याची काळजी घेऊन बोलावे.
“अहिंसा गुणाने सजलेल्या संतांचे बोलणे कसे असते - तर, त्यांच्या मनात आधी स्नेह पाझरतो. पोटात कृपा द्रवते. आणि मग प्रेमाने ओतप्रोत भरलेले शब्द मुखातून स्रवतात. ऐकणाऱ्याला त्यांचे सत्य, रसाळ आणि मृदू शब्द अमृताहून गोड वाटतात!
पुढा स्नेह पाझरे | माघा चालती अक्षरे |
शब्द पाठी अवतरे | कृपा आधी || १३.२६३ ||

“त्यांच्या बोलण्यातच काय, पाहण्यात देखील प्रेम भरलेले असते! चंद्राने चाकोरावर अमृत बरसावे, तशी त्यांची शीतल दृष्टी कृपा वर्षाव करते!“अशा भाषणाने ऐकणारा सुखावला नाही तरच नवल!”, सुला मावशी म्हणाली.
“मावशी अहिंसेचा इतका विचार आतापर्यंत कधी केला नव्हता. पण आता सावधानतेने बोलीन. असो, अजून उशीर न करता मी स्वयंपाकाला लागते!”, नेहा म्हणाली.
“चल, मी पण मदत करतो. भाजी निवडायची आहे का कुठली? आणि काही चिरायचे असेल दे माझ्याकडे.”, असे म्हणत सिद्धार्थही नेहाच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात गेला.