राज्यातील एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही : मुख्यमंत्री

    दिनांक  09-Dec-2017

 
 
औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवन देण्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यातील एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
 
लासूर स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, आमदार सर्वश्री प्रशांत बंब, विनायक मेटे, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, शांतीगिरी महाराज, रामगिरी महाराज आदी उपस्थित होते.
 
 
 
शासन शेवटच्या रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, परंतू ज्या रूग्णांना अशा योजनांचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी अशी मोफत आरोग्य शिबीरे वरदान ठरत आहेत असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शिबिरातून शासन, प्रशासन आणि जनतेमधील सहभाग दिसून येत आहेच पण या माध्यमातून शेवटच्या रूग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यात येणार आहेत. हे महाआरोग्य शिबीर म्हणजे जनसागर असून नवीन पॅटर्न म्हणून उदयास आला आहे. अशा शिबीरांमध्ये सहभागी होऊन लाभ घेतलेल्या रुग्णांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत, ते घेण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
या महाशिबिराच्या माध्यमातुन आत्तापर्यंत लाखो रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. राज्य शासन जीवनदायी योजनेच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी २ लाखापर्यंतची मदत करत आहे. सर्वांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेऊन दररोज व्यायाम आणि योगा करावा जेणेकरून आपण आजारापासून दूर राहू असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले.
 
 
 
या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आमदार प्रशांत बंब यांचा मोलाचा वाटा आहे. या शिबिरासाठी अनेक नामवंत डॉक्टरांची, कार्यकर्त्यांची फौज झटत आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा आमचा मानस आहे. या शिबिरांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना यानंतरही आरोग्य सेवा पुरविणार आहोत. शिबिराच्या माध्यमातून अनेक संस्था, दानशूर व्यक्ती मदत करत आहेत अशा सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचा मी आभारी आहे असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यावेळी म्हणाले.
 
 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमदार प्रशांत बंब यांनी शिबिराच्या संकल्पनेविषयी माहिती देतांना सांगितले की, अशा शिबिराची संकल्पना ही मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत २२५ शिबिर घेण्यात आले आहेत. या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचेही बंब यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जी.एस.टी अर्थात वस्तू आणि सेवा कर कायद्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बालसुधारगृहाच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.