नेपाळमध्ये निवडणुकीत ६७ टक्के मतदान

07 Dec 2017 20:17:35



नेपाळमध्ये दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकांसाठी एकूण ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती नेपाळ निवडणूक आयोगाचे आयुक्त अयोधी प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. नेपाळमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका २६ डिसेंबर रोजी पार पडल्या. आज उर्वरित नेपाळमध्ये दुसऱ्या आणि अंतिम टप्यात काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. नेपाळी संसदेच्या २७५ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहासाठी झालेल्या निवडणुकीत १६५ जागांसाठी विविध राजकीय पक्षांचे १९४५ उमेदवार मैदानात होते. उर्वरित ११० जागा ‘गुणोत्तरीय प्रतिनिधित्व’ या पद्धतीने निवडण्यात येणार आहे. याचबरोबर नेपाळ मधील ७ राज्यांच्या विधानसभांसाठी देखील दोन टप्यात मतदान पार पडले. ७ विधानसभेच्या एकूण ३३० जागांसाठी ३२३९ उमेदवार मैदानात होते.

 
 

 

२००८ साली नेपाळ मध्ये राजेशाही संपुष्टात आली. त्यानंतर संविधान निर्मितीसाठी अनुक्रमे २००८ आणि २०१३ साली संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. सप्टेंबर २०१५ मध्ये नवीन संविधानाला मान्यता देण्यात आली. संविधान निर्मिती नंतर सार्वभौम नेपाळ मध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. निवडणुकांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय निरीक्षक संस्थांनी नेपाळी जनतेचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकांत सत्तास्पर्धा डावी आघाडी आणि नेपाळी कॉंग्रेस यांच्यात असणार आहे. डिसेंबरच्या मध्यावधीत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मागील दोन दशकातील संघर्ष आणि अशांततेनंर नेपाळमध्ये येणाऱ्या सरकारला गरिबी, बेरोजगारी, अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा यासारख्या प्रमुख प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. भारत आणि चीन या दोन्ही शेजाऱ्यांचे नेपाळमधील निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0