पत्रकार आंबेडकर

    दिनांक  06-Dec-2017

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही जितकी सामाजिक विषयांची आहे, तितकीच ती राष्ट्रीय विषयांचा आग्रह धरणारी आहे. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’मधून त्यांनी जे जे विषय हाताळले, ते सर्वच विषय या ना त्या संदर्भात संविधानातून प्रकट झाले आहेत. मग विषय स्त्री-पुरुष समानतेचा असो की हिंदू समाजातील अस्पृश्यता निवारणाचा असो, कामगारांचा असो की भाषेचा असो. हे सारे विषय सापेक्षी संपादक आणि पत्रकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळले आहेत. बाबासाहेबांची पत्रकारिता ही निर्भय आणि निर्भेळ होती. आपल्या चिंतनातून त्यांनी अनेक राष्ट्रीय समस्यांकडे नेमकेपणाने बोट दाखवले होते.
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६) यांना आपण ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून ओळखतो पण, तेवढ्यापुरती त्यांची ओळख मर्यादित नाही. बाबासाहेब म्हणजे प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, घटनातज्ज्ञ, लाखो उपेक्षितांचे तारणहार इत्यादी संबोधने डॉ. बाबासाहेबांच्या नावाला जोडली जातात. जन्मापासूनच अस्पृश्यतेचा अनुभव गाठीशी बांधून बाबासाहेब शिकले. परदेशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि परंपरागत समाजव्यवस्था बदलण्यासाठी ते मैदानात उतरले. प्रत्यक्ष कृतीबरोबरच वैचारिक प्रबोधन करण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भर राहिला आहे. बाबासाहेबांच्या वैचारिक प्रबोधनाचा गाभा समजून घेण्यासाठी ‘पत्रकार बाबासाहेब आंबेडकर’ समजून घेणे आवश्यक आहे.
 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणार्‍या सर्व मंडळींनी वृत्तपत्रांचा आधार घेतला. लोकमान्य टिळक म्हटले की ‘केसरी’ आणि महात्मा गांधी म्हटले की ‘यंग इंडिया’ आणि ‘हरिजन’ ही नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. अगदी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले की ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ ही नावे डोळ्यासमोर येतात.
 
माणगावच्या सभेत राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आणि बाबासाहेबांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास सुरू झाला. आपल्या समाजबांधवांचे दुःख, दैन्य दूर करण्यासाठी काही उपाय शोधले पाहिजेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करणे गरजेचे आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणले होते. १६ मार्च १९१९ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या अंकात बाबासाहेब आंबेडकरांचे एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्या ते लिहितात, ‘‘स्वराज्य हा जसा ब्राम्हणांचा हक्क आहे, तसाच तो महारांचाही आहे, हे कोणीही मान्य करील. म्हणून पुढारलेल्या वर्गांनी दलितांना शिक्षण देऊन त्यांच्या मनाची व सामाजिक दर्जाची उंची वाढविणे, हे आद्य कर्तव्य आहे. हे जोवर होणार नाही, तोवर भारताच्या स्वराज्याचा दिन बराच दूर राहणार, हे निश्चित.’’ बाबासाहेबांचे हे पत्र वाचले की, त्यांच्या मनातील तळमळ आणि सामाजिक आस्था आपल्या लक्षात येते. दलित समूहाला त्याच्या लाजिरवाण्या जिण्यापासून मुक्त करून समाजाच्या मुख्य धारेचा घटक बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी ‘पत्रकारिता’ हा एक मार्ग होता. या मार्गातील पहिला टप्पा म्हणजे, ‘मूकनायक’ होय. ‘मूकनायक’ या नियतकालिकाच्या पहिल्याच अंकात बाबासाहेबांनी आपली भूमिका आणि ध्येय स्पष्टपणाने मांडले होते. ते लिहितात, ‘‘आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांची खर्‍या स्वरूपात चर्चा करण्यास वर्तमानपत्रासारखी दुसरी भूमीच नाही. म्हणून स्वजनोद्धाराचे महत्कार्य करणार्‍यास योग्य पथ दाखविण्यासाठी आपण ‘मूकनायक’ हे पत्र सुरू करीत आहोत.’’ बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’चा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला.
 
‘मूकनायक’ या वृत्तपत्राच्या अग्रभागी संत तुकारामांच्या अभंगाचा काही भाग बाबासाहेबांनी घेतला, तो पुढीलप्रमाणे होता -
 
काय करू आता धरुनिया भीड|
निःशंक हे तोंड वाजवले।।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाणे|
सार्थक लाजून हित नव्हे।।
 
जे मुके आहेत, दलित-पीडित आहेत, उपेक्षित आहेत, अशांचा ‘नायक’ म्हणून बाबासाहेब जेव्हा पुढे येतात, तेव्हा त्यांच्या मनात या सार्‍या समूहाबद्दल पराकोटीचा कळवळा तर असतोच, पण समाज आणि राष्ट्र एकरस झाले पाहिजे, सारे भेद गळून पडले पाहिजेत व सर्वांना समान संधी प्राप्त झाली पाहिजे, असा सामाजिक दृष्टिकोनही असतो.
 
देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीतून ज्या भारताची उभारणी बाबासाहेबांनी केली, त्याची बिजे ‘मूकनायक’च्या सुरुवातीच्या काळात पाहाता येतात. ‘मूकनायक’ च्या दुसर्‍याच अंकात बाबासाहेब लिहितात, ‘‘भारत स्वतंत्र होण्यानेच सर्व कार्यभाग साधेल असे नाही. भारत असे राष्ट्र बनले पाहिजे की, ज्यात प्रत्येक नागरिकाला धार्मिक, आर्थिक व राजकीय हक्क सारखे व व्यक्ती विकासाला प्रत्येकाला वाव हवा.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी व्यवस्था निर्माण केली, त्यांची बिजे आपल्याला वरील वाक्यात पाहायला मिळतात.
 
समाजात प्रबोधनातून बदल घडवून आणता येऊ शकतो, यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी विविध मार्गांनी प्रबोधनाचे विषय हाताळले. ‘मूकनायक’चा सारा भर हा प्रामुख्याने सामाजिक समस्यांचे आकलन व त्या अनुषंगाने समाज जागरण यावरच राहिला. ‘मूकनायक’चे सर्व लेखन बाबासाहेब एकहाती व एकटाकी करत असत. एकूण तेरा अंकांचे संपादन बाबासाहेबांनी केले. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जावे लागले. तेव्हा ‘मूकनायक’ची जबाबदारी ज्ञानदेव घोलप यांच्याकडे सोपवली.
 
बाबासाहेबांचे दुसरे वृत्तपत्र म्हणजे ‘बहिष्कृत भारत’ होय. समाजातील दलित, पीडित, वंचित व शोषित अशा सर्वच बहिष्कृतांना संघटित करणे व त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे, ही ‘बहिष्कृत भारत’ची भूमिका बाबासाहेबांनी अधोरेखित केलेली आहे. या नियतकालिकाचा पहिला अंक ३ एप्रिल १९२७ रोजी प्रकाशित झाला, तर शेवटचा अंक १५ नोव्हेंबर १९२९ रोजी प्रसिद्ध झाला. या अडीच वर्षांच्या काळात ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकाने विचारांची वादळे व चळचळीचा झंझावात निर्माण करून महाराष्ट्रातील विचारविश्व व समाजजीवन चांगलेच घुसळून काढले होते. या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक प्रकाशित झाले. त्यातील ३३ अंकांत बाबासाहेबांचे विचारप्रवर्तक अग्रलेख आहेत.
 
त्याच जोडीला विविध विषयांवरील १४५ स्फूट लेख आहेत. ‘बहिष्कृत भारत’ची आर्थिक स्थिती बेताची होती. या अंकाचे २४-२४ स्तंभ बाबासाहेब एकहाती लिहित असत. संपादनाची संपूर्ण जबाबदारी त्यांना एकट्याला पार पाडावी लागे. अर्थात, बाबासाहेबांना याची खंत नव्हती. कारण अविचल निष्ठेने व सामाजिक ॠण फेडण्याच्या भावनेतून त्यांनी हे असिधारा व्रत चालवले होते. ते म्हणतात, ‘‘बहिष्कृत भारताची संपादकी हा इतर पत्रांच्या संपादकाप्रमाणे पैसे कमविण्याचा मार्ग नसून ही लोकजागृतीची घेतलेली स्वयंदीक्षा आहे.’’
‘बहिष्कृत भारत’चा कालखंड आणि महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा कालखंड एकच आहे. महाडच्या समतासंगरात, धर्मसंगरात ‘बहिष्कृत भारत’ची भूमिका खूप महत्त्वाची आहे. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहास बाबासाहेबांनी विचारपूर्वक ‘धर्मसंगर’ म्हटले आहे. या विषयावर त्यांनी तीन अग्रलेख लिहिले आहेत. महाड येथील धर्मसंगरासाठी समाजाच्या सर्व पातळीवर प्रबोधनाची भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली दिसते. वरिष्ठ हिंदूंना त्यांची चूक दाखवून देतानाच बाबासाहेबांनी दलितांच्या मानसिकतेवरही बोट ठेवले आहे. ते म्हणतात,‘‘अस्पृश्यतेची रुढी चालू राहिली याचे मुख्य कारण म्हणजे, अस्पृश्य लोकांनी त्या रुढीस कधी हरकत घेतली नाही. त्यांनी हरकत घेतली असती तर स्पृश्य लोकांना अस्पृश्यतेच्या कल्पना कधीच बदलाव्या लागल्या असत्या.’’ समाजाचा आचारधर्म सुधारला, तर अनेक सामाजिक समस्यांचे निराकारण होईल, असे बाबासाहेबांचे मत होते. ते म्हणतात, ‘‘हिंदू धर्माची दोन अंगे आहेत, एक तत्त्वज्ञान व दुसरे आचार. यापैकी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अस्पृश्य लोक स्पृश्यांना समान असले तरी आचाराच्या दृष्टीने ते असमान, नव्हे अपवित्र आहेत. म्हणून त्यांच्याशी व्यवहार करणे अधर्म होय.’’ अशा समाज वास्तवाला बदलण्यासाठी बाबासाहेब पुढे सांगतात, ‘‘समाजाचा आचारात्मक धर्म जर त्यांच्या विचारात्मक धर्माच्या नांगरांशी जोडलेला नसेल, तर समाज होकायंत्राशिवाय समुद्रात सोडून दिलेल्या जहाजाप्रमाणे कोठेही वाहत जाईल व कोणत्या खडकावर आदळेल याचा नेमनाही.’’ बाबासाहेबांचे हे निरीक्षण आजही आपल्या समाजाला लागू आहे. आज ‘एकसंघ समाज’ ही केवळ पुस्तकी कल्पना झाली आहे. आज आपला समाज विविध गटांत आणि विचारधारेत विभागला आहे. ‘एकसंघ समाज’ म्हणून आपले अस्तित्व दाखवण्यापेक्षा आपली वेगळी चूल मांडून स्वाथार्र्ची पोळी भाजून घेणार्‍यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘बहिष्कृत भारत’मधील लेख वाचले पाहिजेत.
 
१९३० साली बाबासाहेबांच्या ‘जनता’ या नियतकालिकाची सुरुवात झाली. पुढे १९५६ साली ‘जनता’चे ‘प्रबुद्ध भारत’मध्ये रुपांतर झाले. ‘जनता’ची आवश्यकता सांगताना बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘आपल्या स्वावलंबनाच्या व भावी राजकीय हक्काच्या लढ्यासाठी आपले वृत्तपत्र आपणास भरभराटीस आणले पाहिजे. ‘जनता’ पत्राची त्यासाठी गरज आहे.’’ बाबासाहेबांनी ‘जनता’ पत्र सुरू केले, पण त्यात त्यांना फार लक्ष देता आले नाही. सततचे प्रवास आणि अन्य कामामुळे खूप इच्छा असूनही बाबासाहेब ‘जनता’ पत्र स्थिर करू शकले नाहीत. एका सहकार्‍याकडे त्यांनी ही जबाबदारी दिली होती पण, ते बाबासाहेबांच्या उंचीचे नव्हते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही जितकी सामाजिक विषयांची आहे, तितकीच ती राष्ट्रीय विषयांचा आग्रह धरणारी आहे. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’मधून त्यांनी जे जे विषय हाताळले, ते सर्वच विषय या ना त्या संदर्भात संविधानातून प्रकट झाले आहेत. मग विषय स्त्री-पुरुष समानतेचा असो की हिंदू समाजातील अस्पृश्यता निवारणाचा असो, कामगारांचा असो की भाषेचा असो. हे सारे विषय सापेक्षी संपादक आणि पत्रकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळले आहेत. बाबासाहेबांची पत्रकारिता ही निर्भय आणि निर्भेळ होती. आपल्या चिंतनातून त्यांनी अनेक राष्ट्रीय समस्यांकडे नेमकेपणाने बोट दाखवले होते.
बाबासाहेब हे चरितार्थासाठी पत्रकारितेत आले नव्हते. ते मूक समाजाचे प्रतिनिधी म्हणून लिहित, बोलत होते. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा, चळवळीचा उद्देश समता प्रस्थापित करणे, माणसाला माणूस म्हणून पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणे हा होता. बाबासाहेबांची पत्रकारिता ही न्यायाची पाठराखण करणारी होती; आजच्यासारखे न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन सनसनाटी निर्माण करणारी नव्हती. राष्ट्र, समाज यांच्या उन्नतीची आणि हिताची बाजू घेऊन बाबासाहेबांनी पत्रकारिता केली. बाबासाहेबांची पत्रकारिता आणि त्यांची चळवळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याचप्रमाणे एकमेकांना पूरकही आहेत. या दोन्हीही गोष्टींना बाबासाहेबांनी पुरेपूर न्याय दिला आहे. ‘मूकनायक’ व ‘बहिष्कृत भारत’ ही दोन्हीही नियतकालिके जरी अल्पजीवी असली तरी त्यातून बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यासंगाचे आणि समाजहितैषी भूमिकांचे दर्शन घडत असते.
- रवींद्र गोळे