मानवी आयुष्यात यंत्रमानवांचे स्थान

    31-Dec-2017
Total Views |



आता आतापर्यंत यंत्रमानव केवळ हॉलिवूडपटांत दिसत असत. यंत्रमानवांचा वापर करुन कित्येक चित्रपट हॉलिवूडमध्ये येऊन गेले. त्यात यंत्रमानवांना कधी मानवाचा मित्र, कधी साह्यकर्ता, संकटकाळी मदत करणारा तर कधी नियंत्रण सुटल्यानंतर मानवावरच हल्ला करणारा, स्वतःच्या बुद्धीचा विकास होऊन स्वतःचेच जग निर्माण करणारा अशा स्वरुपात दाखवले गेले. पण आता सोफियाच्या रुपाने हे चित्रपटाच्या आभासी जगातील यंत्रमानव प्रत्यक्ष मानवी जगात अवतरले आहेत. यंत्रमानवाच्या या निर्मितीतून अनेकदा निरनिराळ्या प्रकारच्या शंकाही उपस्थित केल्या गेल्या. चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी सत्यात उतरल्या तर काय होईल? यंत्रमानव हे जिवंत माणसाला पर्याय होणार का? त्यामुळे खर्‍या माणसाच्या आयुष्यात किती उलथापालथी होतील? यंत्रमानवांमुळे माणसाचे रोजगार हिरावले जातील अशी भितीही अनेकदा व्यक्त केली जाते.
आतापर्यंत मानवाच्या आदेशानुसार चालणारे यंत्रमानव पुढील काळात स्वतःच स्वतःचे नियंत्रण करु शकतील आणि भविष्यात जगातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मानवाला नक्कीच सहकार्य करतील,’’ अशी ग्वाही सोफिया या यंत्रयुवतीने दिली. मुंबई आयआयटीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या टेकफेस्टमध्ये सोफिया ही यंत्रमानव सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु होती. यावेळी तिची मुलाखतही घेण्यात आली. तेव्हाचे हे तिचे उद्गार आहेत. ज्या सौदी अरेबियात जिवंत स्त्रियांवर अनेकानेक बंधने लादलेली आहेत, जिथे स्त्रियांचे हक्क डावलले जातात, त्या देशाने नागरिकत्व दिलेली सोफिया ही जगातील पहिलीच स्त्री यंत्रमानव. ज्या दिवशी तिला सौदीचे नागरिकत्व दिले गेले, त्या दिवसापासून तिची सर्वत्र चर्चा आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापासून ते समाजशास्त्रापर्यंत सगळीकडे. सोफियाला नागरिकत्व दिले म्हणजे नेमके काय झाले? त्याने नेमका काय फायदा होईल? असे नागरिकत्व दिल्याने जित्याजागत्या माणसाच्या भविष्यात काय फरक पडेल? मानवी जीवन यामुळे अधिक सुसह्य होईल का? एक ना अनेक प्रश्न यामुळे विचारले गेले. यातील काही प्रश्नांची उत्तरे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली तर काही प्रश्नांची उत्तरे अजूनही धुंडाळली जाताहेत.
मुळात यंत्र ही आजच्या मानवी आयुष्यातील अविभाज्य भाग झाली आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून, घरगुती कामासाठी ते मोठमोठ्या औद्योगिक आणि अवाढव्य कामांपर्यंत यंत्रांचा वापर माणूस करतो आहे. युरोपात झालेली वैज्ञानिक क्रांती ही मानवी संस्कृतीच्या प्रगतीतील तिसरा टप्पा समजली जाते. या वैज्ञानिक क्रांतीमुळे निरनिराळे शोध लागले आणि त्याचा वापर माणूस दैनंदिन जीवनात करु लागला. होकायंत्रापासून, छपाईची यंत्रे, टंकलेखन, गणनयंत्र, वाफेच्या इंजिनाचा शोध, दुचाकी, चारचाकी गाडी, विमाने ते आता दूरचित्रवाणी, संगणक, भ्रमणध्वनी, उपग्रह आदी यंत्रांच्या निर्मितीमुळे मानवी जीवनात अधिकाधिक सुलभता येत गेली. यंत्रमानव हेदेखील यंत्रच असून त्याची व्याख्या मानवासारखे दिसणारे व हालचाल करणारे यंत्र अशी केली जाते. हा मानव-यंत्रअभियांत्रिकी शाखेतील अभ्यासाचा भाग आहे. मानवाप्रमाणे हालचाली करणारा यंत्रमानव रोजच्या व्यवहारात वापर करण्याच्या हेतूने बनवला जातो. यंत्रमानव रोजच्या व्यवहारात हालचाल करण्यासाठी बनवला जात असला तरी माणसे आपल्या पूर्वजांकडून ज्ञान मिळवतात; ते यंत्रमानवांच्या बाबतीत कसे शक्य आहे? तर पूर्वी यंत्रमानव चालवण्यासाठी त्याला आधी आज्ञावली द्यावी लागत असे. त्या आज्ञावलीनुसार यंत्रमानव आपली कामे पूर्ण करत असत. पण आताचा यंत्रमानव अधिक स्मार्ट झाला आहे. सोफिया ही संगणक, ऍन्ड्रॉईड विकिपीडिया यातून माहिती घेते आणि त्यानुसार माणसांशी संवाद साधते, उत्तरे देते. ही खरे तर मानवी कल्पनाशक्ती, बुद्धी आणि तंत्रज्ञानाने मारलेली मोठी मजलच म्हणावी लागेल.

आता आतापर्यंत यंत्रमानव केवळ हॉलिवूडपटांत दिसत असत. यंत्रमानवांचा वापर करुन कित्येक चित्रपट हॉलिवूडमध्ये येऊन गेले. त्यात यंत्रमानवांना कधी मानवाचा मित्र, कधी साह्यकर्ता, संकटकाळी मदत करणारा तर कधी नियंत्रण सुटल्यानंतर मानवावरच हल्ला करणारा, स्वतःच्या बुद्धीचा विकास होऊन स्वतःचेच जग निर्माण करणारा अशा स्वरुपात दाखवले गेले. पण आता सोफियाच्या रुपाने हे चित्रपटाच्या आभासी जगातील यंत्रमानव प्रत्यक्ष मानवी जगात अवतरले आहेत. यंत्रमानवाच्या या निर्मितीतून अनेकदा निरनिराळ्या प्रकारच्या शंकाही उपस्थित केल्या गेल्या. चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी सत्यात उतरल्या तर काय होईल? यंत्रमानव हे जिवंत माणसाला पर्याय होणार का? त्यामुळे खर्‍या माणसाच्या आयुष्यात किती उलथापालथी होतील? यंत्रमानवांमुळे माणसाचे रोजगार हिरावले जातील अशी भितीही अनेकदा व्यक्त केली जाते. कुशल किंवा अकुशल कामगारांची कामे यंत्रमानव करेल आणि त्यामुळे मानवावर बेरोजगारीचे प्रचंड संकट कोसळेल, असाही दावा केला जातो. अकुशल कामाच्या ठिकाणी यंत्रमानवचा वापर होऊ शकतो. जिथे फार बुद्धी वापरावी लागत नाही, अशा कामीही त्यांचा वापर पर्याय म्हणून करता येईल. आज जे दावे केले जात आहेत, अशाच प्रकारचे दावे ज्या ज्यावेळी नवनवीन तंत्रज्ञानाचा उदय झाला त्या त्यावेळी केले गेले. यंत्रांमुळे पारंपरिक उद्योग, व्यवसाय नष्ट होतील, माणसांना रोजगार मिळणार नाहीत, असे सांगितले गेले. संगणकाच्या भारतातील प्रवेशाला तर मोठा विरोध सहन करावा लागला. पण आज त्याच क्षेत्रात लाखो भारतीय कामकरत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान जसजसे प्रगती करते तसतसे त्याला हाताळणार्‍या, ती तयार करणार्‍या मानवी हातांची आणि बुद्धीचीही गरज लागतेच. यंत्रमानव हे स्वत: प्रगती करत नाहीत कारण प्रगतीसाठी तर्क आणि उस्फुर्तता या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. त्या यंत्रात नसतात. तसेच यंत्रमानवाला स्वत्वाची जाणीव नसते. यावरुन यंत्रमानवामुळे मानवी आयुष्यात काहीच फरक पडणार नाही, असे नाही. पण तो सकारात्मकच असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. कारण माणसानेच यंत्रमानवाला तयार केले आहे, यंत्रमानवाने माणसाला नव्हे. म्हणजेच त्याच्यावर शेवटी माणसाचेच नियंत्रण असणार आहे. असिमोव्ह या शास्त्रज्ञाने यंत्रमानवांना मानवाच्या अधिपत्याखाली ठेवणार्‍या तीन नियमांची रचना केली आहे. हे नियमम्हणजे यंत्रमानव माणसाला इजा करू शकत नाहीत किंवा स्वतः तटस्थ राहून माणसाला इजा होताना पाहूही शकत नाहीत. यंत्रमानव माणसाची प्रत्येक आज्ञा पाळतात आणि वरील दोन्ही नियमपाळून यंत्रमानव स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतात, असे आहेत. यावरुन बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतात आणि यंत्रमानव हे खर्‍या मानवासाठीच कार्य करतील असा विश्वासही बाळगता येतो.

दुसरीकडे जेथे मानवाला जाता येत नाही अशा ठिकाणी यंत्रमानव पाठवण्याचे प्रयत्न वैज्ञानिक जगतात नेहमीच सुरू असतात. वैद्यकीय क्षेत्रात तर कित्येक शस्त्रक्रिया या यंत्राच्या साह्याने केल्या जातात. जिथे मानवी हात पोहचू शकत नाहीत, अशा मानवी अवयवांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी छोट्या छोट्या यंत्रांचा वापर केला जातो. आता इंटरनेटवरील माहितीचा वापर करुन हालचाली करणार्‍या यंत्रमानवांची निर्मिती केली जाते. त्यामुळे अशी बुद्धीमत्ता वापरून लढाई करणारे यंत्रमानवाच्या रुपातील सैनिक विकसित करण्याचा प्रयत्नही देशोदेशीच्या संरक्षण विभाग व प्रयोगशाळांतून केला जात आहे. यामुळे मानवरहित युद्ध यंत्रणा विकसित होऊ शकते. मानवी बुद्धीने त्याच्या आरंभापासून जसजशी भरारी घ्यायला सुरुवात केली तसतशी नवनवीन गोष्टींची त्याने निर्मिती केली. यंत्रमानव हा देखील त्याच्याच बुद्धीचा आविष्कार. पण येणार्‍या काळात हा यंत्रमानव नेमके काय काय चमत्कार करेल, हे भविष्यावर सोडून देणेच योग्य ठरेल.