बडबोले बालिश अध्यक्ष

    दिनांक  30-Dec-2017   

अध्यक्षपदाची माळ गळण्यात पडल्यानंतरही राहुल यांचा बडबोलेपणा काही कमी झालेला नाही. ते युवराज होते तेव्हाही त्यांची जीभ अशीच सैल सुटलेली. किमान कॉंग्रेससारख्या जवळपास १३० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाकडून नैतिकतेची, सभ्यतेची किमान अपेक्षाच करु नये का? पण, राहुलच्या बाबतीत खरं तर कुठलीच अपेक्षा करणेच मुळात मूर्खपणाचे ठरेल. गुजरातच्या निवडणूक निकालांनंतर राहुल गांधींचा तोरा पराभव होऊनही सत्ता काबिज केल्यासारखा आहे. कारण, साहजिकच अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्यावर लहानांचा आनंद कसा गगनात मावेनासा होतो, तशीच काहीशी गत या राहुलबाबांची. त्यात त्यांच्या मातोश्री सध्या गोव्यात वर्षाअखेरच्या स्वागतासाठी ‘व्हेकेशन मूड’मध्ये आहेत. म्हणजे, कॉंग्रेसची धुरा आता सर्वस्वी एकहाती अंगावर येऊन पडलेल्या राहुलना अध्यक्षपदाच्या जबाबदारीचे अजूनही पुरते भान आलेले काही दिसत नाही; अन्यथा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अप्रत्यक्षपणे उद्देशून त्यांनी ‘जेटलाय’ असा शब्दप्रयोग आपल्या ट्विटमध्ये केला नसता. ‘जेटली’ आणि ‘लाय’ म्हणजेच ‘खोटे बोलणारे जेटली’ या आशयाने राहुलने शब्दखेळ केला खरा, पण तो त्यांच्याच अंगलट आला. कारण, अशाप्रकारे केंद्रीय मंत्र्यांच्या आडनावावरुन त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविणे योग्य नव्हे. यासंबंधीची तक्रार भाजपचे खासदार भुपेंद्र यादव यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली. राहुलच्या या नादानपणामुळे हक्कभंगाचा गुन्हाही या नूतन कॉंग्रेस अध्यक्षावर दाखल होऊ शकतो. आता या प्रकरणात पुढे काय होते, ते पाहावे लागेल. पण एक मात्र नक्की की, सार्वजनिक जीवनात वागताना, बोलताना आणि तेही एवढ्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्याचा असा अपमान करणे योग्य नाही. पण, राहुल यांना ही सभ्यतेची भाषा समजणे जर जडच जात असावे. हल्लीच त्यांनी भाजप हा संविधानावर घाला घालत असल्याचाही बालिश आरोप केला होता. एकट्या हेगडेंच्या विधानाचा अर्थ घेऊन भाजपवर अशी सरसकट टीका करणे म्हणजे सुतावरुन स्वर्ग गाठण्यासारखे आहे. उलट आज सत्तेवर हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार असल्यामुळे तिहेरी तलाक विरोधी विधेयकही मंजूर झाले, ज्याचा कॉंग्रेसच्या काळात कुणी विचारही केला नसेल. तेव्हा, अध्यक्षपदाच्या खुर्चीला टेकून धड महिनाही उलटलेला नसताना राहुलनी किमान स्वत:ची नाही, कॉंग्रेस अध्यक्षपदाची तरी किमान लाज राखावी.
 
 
‘हात’ आणि चपराक
 
सरकारी अधिकार्‍यांवर हात उचलणे हा खरं तर कायदेशीर गुन्हाच! त्यातही पोलीस अधिकार्‍यांवर हात उचलला तर काही खरं नाही. अशा कित्येक घटना यापूर्वी घडल्या आहेत, जिथे कार्यतत्पर पोलिसांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हात उचलला जातो. या गुंड प्रवृत्तीच्या किंवा पोलिसी वर्दीवर थेट हात घालणार्‍या लोकांमध्ये केवळ सामान्यच नाही, तर अनेकदा आमदार, खासदार, मंत्री मंडळीही अग्रेसर दिसतात. पण, शेवटी वर्दीवर अशाप्रकारे हल्ला करणे निषेधार्हच! शिमल्यामध्येही काल असाच एक धक्कादायक प्रकार पाहिला मिळाला आणि तोही राहुल गांधींच्या दाराबाहेर.
 
त्याचे झाले असे की, हिमाचल प्रदेशातील पराभवासाठी शिमल्यात कॉंग्रेसची चिंतन बैठक सुरु होती. राहुल गांधी नेतेमंडळी, कार्यकर्त्यांसह पराभवाच्या कारणांवर म्हणे चिंतन करत होते. कॉंग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता. अशात अचानक कॉंग्रेसच्या आमदार आशा कुमारी यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आत जाण्यास मज्जाव केला असता या आशाबाईंनी त्या महिला कॉन्स्टेबलच्या थेट कानशीलात लगावली. मग काय, त्या कॉन्स्टेबलनेही क्रियेची अवघ्या काही सेकंदात प्रतिक्रिया देत आमदार आशाबाईंच्या श्रीमुखात उलटी ठेवून दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आशाकुमारींबरोबर कार्यकर्तेही गोंधळले. अशा या बिनधास्त आशाबाई या कॉंग्रेसचे हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांची पुतणी. घडल्या प्रकारानंतर आशाकुमारींनी महिला पोलीस कॉन्स्टेबलची माफी तर मागितली, पण ‘‘मी तिच्या आईच्या वयाची आहे. तिने मला उलट मारायची गरज नव्हती. तरी मी चुकले,’’ असे सांगत सारवासारव केली.
हिमाचलमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला असला तरी डलहौसी मतदारसंघातून ५७ वर्षीय आशाकुमारी निवडून आल्या आहेत. २०१६ साली वनजमीन लाटल्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती आणि नंतर जामिनावर त्यांची सुटकाही झाली. त्यामुळे तुरुंगात जाऊन आलेल्या या कॉंग्रेसच्या आमदारबाईंना सत्ता नसली तरी लोकप्रतिनिधी असल्याचा माज मात्र कायमआहे. आपण काहीही करु शकतो, कुणावरही हात उगारु शकतो, या अविर्भावात लोकप्रतिनिधींनी वावरता कामा नये. दुसरीकडे, महिलांचा आदर करा असे जनतेला आणि कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस देणार्‍या राहुल गांधींपर्यंत या चपराकीचा आवाज पोहोचतो का आणि पोहोचला तरी मग ते आशाकुमारींना काय ‘हातो’पदेश देणार ते पाहायचे.
 
 
- विजय कुलकर्णी