मनमोहाडी गावातील वनवासी आजही रस्ता आणि विजेपासून दूर

    दिनांक  29-Dec-2017

जव्हार तहसीलदारांनी गावाची केली पहाणी

 
 
 
 
जव्हार : मनमोहाडी हे जव्हार तालुक्याचे शेवटचे गाव पिंजाळ नदीच्या काठावर वसलेले आहे. जुलै महिन्यात जास्त पाऊस पडल्याने येथील गावात जाणारा रस्ता भुस्खलनात पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे गावात जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही आणि अद्याप वीजही पोहोचली नसल्याने येथील वनवासी पारतंत्र्यात जगत आहेत.
 
रस्ता आणि वीज याबाबत ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि सरकारी कार्यालयात फेर्‍या मारत असत. याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी अखेर बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी मनमोहाडी गावास भेट देऊन ग्रामस्थांशी विविध अडचणींबाबत चर्चा केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
जव्हार शहरापासून २३ किमीवर हे गाव आहे. आज शासन गाव तेथे रस्ता आणि घराघरात वीज देण्याचे आश्‍वासन देत आहे. मात्र, येथील वनवासी हलाखीचे जीवन जगत आहेत. पावसाळ्यात येथे असलेला लहान रस्ता पूर्ण स्खलनात गेला त्यामुळे येथे येण्या-जाण्याचा रस्ताच राहिला नाही.
 
''भूस्खलन फारच मोठे झाले आहे. नशीब आमचे गाव नदीच्या दुसर्‍या बाजूला होते. नाहीतर गाव गाडले गेले असते.'' असे ग्रामस्थांनी सांगितले. सध्या मनमोहाडी, भाटीपाडा, वडपाडा अशा तीन गावांचा संपर्क तुटला आहे. पाहणी करताना जव्हार तहसीलदार संतोष शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता डि. डि. पाटील, माजी पं. स. सदस्य विनायक राऊत, झाप आणि यैना ग्रामपंचायतचे सरपंच, जिल्हा बांधकामचे जे. ई. पवार उपस्थित होते.
 
मनमोहाडी आणि तेथील नागरिकांचे या भुस्खलनात मोठे नुकसान आणि गैरसोय झाले आहे. लवकरात लवकर त्यांना एमआरइजीएसमधून प्रस्ताव तयार करण्याचे ग्रामपंचायतने सांगितले आहे. त्यांच्या रस्त्याचा प्रश्‍न लवकरच सोडविला जाईल.
 
- संतोष शिंदे, जव्हार तहसीलदार