कलाटणी देणारा राष्ट्रनेता

    दिनांक  28-Dec-2017   
 
 
 
 
डिसेंबर २५, १९२४ साली जन्मलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा ९३वा वाढदिवस देशाने नुकताच साजरा केला. त्यानिमित्ताने त्यांच्या अमृतविचारांचा घेतलेला हा आढावा...
 
१९९६ साली अटलबिहारी वाजपेयी देशाचे अल्पकाळासाठी पंतप्रधान झाले आणि नंतर १९९८ ते २००४ पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ते पंतप्रधान राहिले. २००४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आणि लोकशाही आघाडीला सरकार बनविण्याइतके बहुमत मिळाले नाही, त्यामुळे त्यांचे शासन गेले. भारताच्या राजकीय इतिहासात ‘पंतप्रधान’ म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी कधीही पुसला न जाणारा आपला ठसा उमटविलेला आहे. ते ज्या पक्षाचे होते, त्या पक्षावर, त्या पक्षाच्या विचारसरणीवर जबरदस्त टीका त्यावेळेस होत होती. परंतु, कोणीही अटलजींवर कसलीही व्यक्तिगत टीका करण्याचे धाडस करीत नव्हता. राजकीय भ्रष्टाचाराच्या चिखलात अटलजी म्हणजे उगवलेले पवित्र कमळ होते. टीकाकाराने एकदा म्हटले, ‘‘अटलजी चांगले आहेत, परंतु अटलजींचा पक्ष चांगला नाही.’’ अटलजींनी तात्काळ उत्तर दिले, ‘‘मग अटलजींचे तुम्ही काय करायचे ठरविले आहे?’’ राजकारणात राहूनही अटलजी अजातशत्रू होते, म्हणूनच पंतप्रधान नरसिंह राव यांचा त्यांच्यावर जबरदस्त विश्र्वास होता. अटलजींच्या आग्रहामुळेच एपीजे अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांच्या रूपाने देशाला सर्वोत्तम राष्ट्रपती मिळाला. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका असल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष, जॉर्ज फर्नांडिस असे वेगळ्या विचारधारेचे नेतेही सामील झाले. अटलजींनी आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे-
 
‘‘बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ
पॉंवो के नीचे अंगारे
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ
निज हाथों में हँसते-हँसते
आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा’’
 
 
सर्वांना बरोबर घेऊन ‘कदम मिलाकर चलना होगा’ ही ओळ त्यांनी सार्थ केली. अटलबिहारी वाजपेयी यांचा पंतप्रधानपदाचा कालखंड देशाच्या राजकीय इतिहासातील अत्यंत नाजूक कालखंड आहे. रामजन्मभूमीच्या आंदोलनामुळे देश ढवळून निघाला होता. एका बाजूला हिंदू समाज राजकीयदृष्ट्या आग्रही आणि काही प्रसंगी आक्रमक बनत चाललेला असताना अनेकांच्या मनात देशाचे काय होणार? सतत दंगली होत राहणार का? राज्यघटनेचे काय होणार? सांप्रदायिक ध्रुवीकरणामुळे देश पुन्हा विभाजनाच्या टोकाला जाणार का? असे अनेक प्रश्न होते. अटलबिहारी वाजपेयींनी आपल्या कृतीने या सर्व शंका निरस्त करून टाकल्या. भारतीय संविधानाविषयी ते म्हणाले,‘‘ज्या संविधानाला भारतीय लोकांनी आत्मसमर्पित केले आहे, त्या संविधानाला विकृत करण्याचा अधिकार कुणालाही देता येणार नाही.’’ देशात वाढणार्‍या सांप्रदायिकतेविषयी ते म्हणाले, ‘‘मनुष्या-मनुष्यातील संबंध चांगले राहिले पाहिजेत, सांप्रदायिक सद्भाव राहिला पाहिजे, धर्माचे शोषण होता कामा नये आणि जातीच्या आधारे लोकांच्या हिनभावनांना उत्तेजन देता कामा नये. यात कोणताही मतभेद नाही.’’
 
 
अटलजींच्या काळात ‘सेक्युलॅरिझम’ हा राष्ट्रीय चर्चेचा गरमागरम विषय होता. ‘सेक्युलॅरिझम’चे भाषांतर ‘धर्मनिरपेक्षता’ असे करण्यात येते. त्यावेळच्या चर्चेला उत्तर देताना अटलजी म्हणाले की, ‘‘सेक्युलॅरिझमचा अर्थ धर्मनिरपेक्षता आहे, असा जे करतात त्यांना, धर्म आणि सेक्युलॅरिझमही समजलेला नाही. सेक्युलर राज्य म्हणजे धर्मविरोधी राज्य नव्हे, किंवा अधर्मीराज्य नव्हे, या अर्थाने भारतीय जनता कधीही सेक्युलर होऊ शकत नाही. सेक्युलर राज्याचा साधा अर्थ असा होतो की, राज्याने कोणत्याही एका उपासना पद्धतीशी स्वतःला बांधून घेऊ नये. सर्व उपासना पद्धतींकडे समदृष्टीने पाहिले पाहिजे. या अर्थाने सेक्युलॅरिझम म्हणजे संप्रदाय निरपेक्षता, धर्मनिरपेक्षता नव्हे.’’ आजही सेक्युलॅरिझम म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? यावर सर्व राष्ट्राचे एकमत झाले आहे असे आपण म्हणू शकत नाही. भारतीय लोकशाही, भारतीय जनतेच्या मनात खोलवर रूजलेली आहे. कारण, भारत हे प्राचीन राष्ट्र असून ते नव्याने आपल्याला निर्माण करायचे नाही. आपल्याला या प्राचीन राष्ट्राला आधुनिक काळातील आव्हाने पेलण्याइतके सक्षम करायचे आहे, असे अटलजी सांगत. ‘भारतातील खरा प्रश्न ‘उजवे किंवा डावे’ असा नसून, ‘लोकशाही विरूद्ध सर्वंकष सत्ता’ असा आहे. आपल्याला प्रगती आणि प्रतीगामित्त्व यापैकी एकाची निवड करायची आहे. आपल्या देशात मतभेद हे राहणारच, परंतु राष्ट्रवाद आणि लोकशाही हे केव्हाही वादाचे विषय होता कामा नयेत. आपल्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे, अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक उपासना पद्धती आहेत, राहणीमानात फरक आहे, एवढेच काय पण कला आणि साहित्याच्या अभिव्यक्तीतदेखील फरक आहे. ही विविधता आमच्या राष्ट्रीय जीवनाची समृद्धी प्रकट करते. तिचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. आज आपण हे म्हणू शकतो की, देशाच्या अत्यंत आणीबाणीच्या कालखंडात, परस्पर अविश्वासाच्या कालखंडात आणि खंडित राजकीय मताच्या कालखंडात, अटलबिहारी वाजपेयी यांनी आपली लोकशाही आणि आपला समाज एक ठेवण्यात भरीव कामगिरी केली आहे. परराष्ट्रनीती हा अटलजींचा आवडीचा विषय होता. भारताच्या परराष्ट्रनीतीचा थेट संबंध पाकिस्तानशी आणि चीनशी येतो. पाकिस्तानविषयीची अटलजींची भूमिका व्यवहारवादी होती. ते म्हणत, ‘‘आपण आपला शेजारी निवडू शकत नाही.’’ पाकिस्तानात स्थैर्य राहावे, त्याची प्रगती व्हावी, अशी अपेक्षा ते व्यक्त करीत. पाकिस्तानशी बोलणी करणे त्यांनी सुरू केले. दिल्ली ते लाहोर बसयात्रेत ते गेले. पाकिस्तानने या सर्व प्रयत्नांवर संसदेवर दहशतवादी हल्ला करून आणि कारगीलमध्ये सैन्य पाठवून पाणी टाकले. पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे पाकिस्तानने आपल्या कृतीने सिद्ध केले. एका अर्थाने अटलजींच्या परराष्ट्रनीतीचे हे अपयशच आहे आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा एक मवाळ नेता अशी झाली. त्यातच कंदाहार विमान अपहरणाचे प्रकरण घडले आणि भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह, मौलाना मसुद अझहर या दहशतवाद्यास घेऊन कंदहारला गेले. ओलिस ठेवलेल्या विमान प्रवाशांची त्यांनी सुटका केली. राष्ट्रीय सन्मानाचा बळी दिला, हा घाव अनेकांच्या अत्यंत जिव्हारी लागला. पाकिस्तानच्या बाबतीत जशास तसे उत्तर अटलजींनी दिले नाही. जनतेला ते हवे होते. नरसिंह राव यांनी सुरू केलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण अटलजींनी पुढे चालविले. त्यांच्याच काळात रस्ते विकासाची प्रचंड कामे झाली. सॉफ्टवेअर विकासाच्या दृष्टीने पावले उचलली. ग्रामीण रोजगार आणि गृहनिर्माण प्रकल्पांना त्यांनी प्रोत्साहन दिले. ‘इंडिया शायनिंग’ अशी घोषणा दिली गेली. या घोषणेत लपलेली दुसरी घोषणा २००४ साली भाजपची रणनीती आखणारे विसरले. ती घोषणा होती, ‘इंडिया शायनिंग, बट भारत डिक्लायनिंग’. ‘इंडिया’ याचा अर्थ ‘शहरी भारत’ ‘पैसेवाला भारत’ असा होतो आणि ‘भारत’ याचा अर्थ ‘ग्रामीण भारत’ आणि ‘शेतकरी आणि शेतमजूरांचा भारत’ असा होतो. आर्थिक विकासाचे लाभ त्याच्या ताटात पडले नाहीत. शहरांचा विकास होत गेला आणि खेडी भकास होत गेली, हे वास्तव २००४ साली पराभव झाल्यानंतरच लक्षात आले. २००४च्या निवडणुकीने आणखी एक धडा दिला की, तुम्ही कितीही योजना करा, आर्थिक विकासाची गती वाढवा, केवळ त्यामुळे लोक तुम्हालाच मतदान करतीलच असे नाही, तसे असते तर ‘मनरेगा’ सुरु करणार्‍या कॉंगे्रसला लोकांनी दोन तृतीयांश बहुमत द्यायला पाहिजे होते. प्रश्न भाकरी बरोबरच भावनेचाही असतो. ‘अगली बारी अटल बिहारी’ अशी घोषणा तीस-चाळीस वर्षे कार्यकर्त्यांनी दिली. त्यांच्या अपेक्षा काही अटलजी पुर्‍या करू शकले नाहीत. ‘हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय’ असे म्हणणार्‍या अटलजींचा परिचय ‘मवाळ हिंदू’ असा होत गेला आणि त्यामुळे २००४ च्या निवडणुकीत असंख्य कार्यकर्ते म्हणावे तितके क्रियाशील झाले नाहीत आणि सामान्य हिंदू जनतेलाही अटलजींना पुन्हा सत्तेवर आणले पाहिजे असे वाटले नाही. परंतु, अटलजी जय-विजयाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे थोर नेते आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,
 
‘‘क्या हार में, क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
कर्तव्य पथ पर जो भी सही
वरदान नही मांगूंगा
हो कुछ पर हार नही मानूंगा|’’
 
 
जीवनभर संघर्ष करणारे अटलजी वयोमानाने थकले. मुंबईच्या एका सभेत त्यांनी खासदार प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्त्व राहील असे सुचविले आणि हळूहळू अटलजी राजकारणातून निवृत्त होत गेले. आज नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत. १९९८ ते २००४ अटलबिहारी पंतप्रधान झाले नसते, तर आज नरेंद्र मोदीदेखील पंतप्रधान होऊ शकले नसते. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपद मिळवून दोन राजकीय भ्रम तोडले. पहिला भ्रम काँग्रेसशिवाय देश चालू शकत नाही आणि दुसरा भ्रम सेक्युलॅरिझमशिवाय राजकीय मान्यता मिळत नाही, हे दोन्ही भ्रम अटलबिहारी वाजपेयी यांनी तोडून टाकले. हे दोन्ही भ्रम राष्ट्रवादी शक्तींचा प्रवाह रोखणारे होते. अटलजींनी हे अडथळे मोडून काढून भारताच्या राजकीय इतिहासाला कलाटणी दिली आणि त्यामुळेच त्यांचा आज उल्लेख ‘राजनेता’ नव्हे, तर ‘राष्ट्रनेता’ असा करावा लागतो. ते पंतप्रधान झालेले पाहण्यासाठी अनेकांनी तर मृत्यूलाही थांबून ठेवले होते आणि त्यांनी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे अटलजी पाहिले, त्यावेळी देशात शब्दशः लाखो लोकांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. ते एका अर्थाने हिंदू विचारधारेचे जीते-जागते प्रतीक झाले होते. परंतु, काळाच्या मर्यादेमुळे आणि परिस्थितीच्या बंधनामुळे त्यांना ‘रग-रग हिंदू मेरा परिचय’ या भावनेने पंतप्रधानपद राबविता आले नाही. ‘मी संघस्वयंसेवक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे’ असे जाहीरपणे उद्गार काढण्याचे धाडस ते करू शकत नव्हते, असे जरी असले तरी एक संघस्वयंसेवक म्हणून देशाचा सनातन विचार, जो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा, सर्व पंथाचा आदर करण्याचा आणि सहमती निर्माण करून राज्य करण्याचा आहे, त्याचे पालन त्यांनी सहा वर्षे केले. भविष्यात जो कुणी हिंदुत्त्ववादी पंतप्रधानपदावर येईल, त्याच्यासाठी एक वाट आखून दिली. मला असे वाटते की, मोदींचा मार्ग अटलजींनी सुकर केला. म्हणून अटलबिहारी वाजपेयी या व्यक्तित्त्वाचा नसला, तरी त्यांच्या विचारांचा वारसा नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. असे काळावर आपली अमीट छटा उमटविणारे अटलजी आता ९३ वर्षांचे झाले आहेत. ही सर्व वर्षे राष्ट्रसाधनेची वर्षे आहेत आणि साधना कधीही निष्फळ ठरत नाही. साधनेची फळे मिळतात. अटलजींबरोबर राष्ट्रसाधना करणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्या साधनेतून सत्ताप्राप्तीची सिद्धी पक्षाला प्राप्त झाली आहे, म्हणून त्यांच्या जन्मदिवसाचे स्मरण करत असताना, अशी साधना करण्याचे बळ आपणा सर्वांना प्राप्त होवो, अशी प्रार्थना ईश्वराकडे करूया.
- रमेश पतंगे