ब्रिटनमध्ये राहणारा डॉ. मुकूल हजारिका उर्फ अभिजीत बरमन उर्फ अभिजित असम याला भारतात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. गेली ३० वर्षे ब्रिटनमध्ये प्रॅक्टीस करणार्या या डॉक्टरला भारतात आणण्याची गरज एनआयएला का वाटावी? या प्रश्नाचे उत्तर गंभीर आहे. साठीला आलेला हा इसम ब्रिटनमध्ये राहून मानवाधिकाराच्या मुखवट्याखाली गेली अनेक वर्षे भारताविरुद्ध फुटीर कारवाया करतो आहे. ‘उल्फा’ या खतरनाक संघटनेचा तो म्होरक्या असल्याची पक्की माहिती एनआयएकडे आहे.
आसामी माणसाच्या स्वयंनिर्णयाची भाषा करत ‘उल्फा’ आसाममध्ये पसरली. आसामी माणसाने या चळवळीला बळ दिले. ‘उल्फा’च्या दहशतवाद्यांनी सुरुवातीच्या काळात पैसा मिळवण्यासाठी तथाकथित उपरे असलेल्या धनाढ्य व्यावसायिकांचे अपहरण करण्याचा मार्ग अवलंबला. पुढे पुढे अपहरण हा धंदा बनला. सर्वसामान्य आसामी माणसाच्या मनातून ‘उल्फा’ला असलेली सहानुभूती कमी होत गेली. ‘उल्फा’ हे परकीय शक्तींच्या हातचे खेळणे बनल्याचे लक्षात आल्यानंतर उरलेसुरले समर्थनही समाप्त झाले. लष्कराने दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी हाती घेतलेल्या कारवायांमुळे शक्ती क्षीण झालेल्या ‘उल्फा’ला वाटाघाटीच्या टेबलवर येणे भाग पडले. बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून ‘उल्फा’चा नेता अरबिंदा राजखोवा वाटाघाटीस तयार झाला. आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण होण्याची आशा निर्माण झाली. परंतु, ‘उल्फा’ची सूत्रे हलवणार्या विदेशी हातांना हे मंजूर कसे व्हावे? त्यांनी संघटनेच्या अन्य नेत्यांना हाताशी धरून राजखोवाला बाजूला सारले. सार्वभौमआसामची मागणी मान्य झाल्याशिवाय बोलणी नाही, अशी आक्रस्ताळी भूमिका घेत एक गट उभा राहिला. किंबहुना, असा गट उभा करण्यात आला असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. एक नवा प्यादा संघटनेच्या प्रमुखपदी नेमला आणि तोच हा अभिजीत असम. ब्रिटनमध्ये स्थायिक असलेला डॉ. मुकूल हजारिका हाच अभिजीत असमअसल्याची बाब केवळ योगायोगानेच उघड झाली. फेब्रुवारी २०१७ मध्ये गगन हजारिका उर्फ जयदीप चेलंग हा ‘उल्फा’चा दहशतवादी एनआयएच्या जाळ्यात आला. तपासादरम्यान त्याने धक्कादायक माहिती उघड केली. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला डॉ. मुकूल हजारिका हाच ‘उल्फा’चा हंगामी अध्यक्ष अभिजीत असमउर्फ अभिजीत बरमन असल्याचे एनआयएला त्याने आपल्या जबाबात सांगितले. अरबिंदा राजखोवा भारताशी करत असलेल्या वाटाघाटीमुळे नाराज असलेल्या ‘उल्फा’तल्या काही नेत्यांनी संघटनेची सूत्रे अभिजीत असमकडे सोपवली. नेतृत्व स्वीकारल्यानंतर डॉ. मुकूल हजारिकाने २०१२ मध्ये म्यानमारमधील ‘उल्फा’च्या ट्रेनिंग कॅम्पला भेट दिली होती. गगन हजारिकावर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी होती. तो अंगरक्षक म्हणून सतत डॉ. हजारिकासोबत वावरत होता. अगदी महत्त्वाच्या बैठकांमध्येही तो सोबत असे. या काळात डॉ. हजारिकासोबत अगदी निकट वावरला असल्यामुळे बर्याच गोष्टी त्याच्या कानावर आल्या होत्या. अभिजीत असमआणि डॉ. मुकूल हजारिका या दोन व्यक्ती वेगळ्या नाहीत हे गगन हजारिकाच्या लक्षात आले. चौकशी दरम्यान त्याने डॉ. हजारिका याचा फोटोही ओळखला.
‘उल्फा’ या फुटीर चळवळीला पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनमधून रसद पुरवठा झाला. ‘उल्फा’चा फरार नेता (उपाध्यक्ष) परेश बरूआने सुरूवातीच्या काळात बांगलादेशात आश्रय घेतला होता. परंतु, भारताने बांगलादेशला दट्ट्या दिल्यानंतर ‘उल्फा’ला तेथील पसारा आवरावा लागला. म्यानमारमध्येही याची पुनरावृत्ती झाली. परंतु, चीन आणि पाकिस्तानने मात्र अजूनही ‘उल्फा’ला पोसण्याचे कामसुरू ठेवले आहे. परेश बरुआ हा आयएसआयच्या संपर्कात असून त्याने चीनमध्ये आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडे आहे. ‘चीनच्या विरोधात बोलाल तर खबरदार,’ असा दमबरुआने सप्टेंबर २०१६ मध्ये दलाई लामांना दिला होता. त्यावरून त्याची चीननिष्ठा आणि चीनची त्याच्यावर असलेली मर्जी लक्षात यावी. स्थापनेपासून ‘सार्वभौमआसाम’ ही ‘उल्फा’ची मागणी आहे. गेल्या तीन दशकात ‘उल्फा’ला संपवण्यासाठी सातत्याने हाती घेण्यात आलेल्या लष्करी मोहिमांमुळे या संघटनेला मोठा हादरा बसला. बांगलादेश आणि म्यानमारमध्ये त्यांना मिळणारा आश्रय संपुष्टात आणण्यासाठी राजकीय मुत्सद्देगिरीचाही भारताने प्रभावीपणे वापर केला. त्यामुळेच भारताशी बोलणी केलीच पाहिजेत, अशी धारणा असलेला एक गट ‘उल्फा’मध्ये निर्माण झाला. ‘उल्फा’चा अध्यक्ष अरबिंदा राजखोवा याच मताचा होता. त्याने भारताशी बोलणी सुरू केली. परंतु, परेश बरुआ आणि अभिजीत असमआदी नेत्यांनी ‘उल्फा’ची केंद्रीय कार्यकारिणी भंग करून राजखोवाला पदावरून हटवले. संघटनेची सूत्रे अभिजीत असमच्या हाती आली. परंतु, ब्रिटनमधील डॉ. मुकूल हजारिका हाच अभिजीत असमअसल्याबाबत तपास यंत्रणा अंधारात होत्या. कारण, डॉ. मुकूल हजारिका हा १९९० पासूमब्रिटनमध्ये स्थायिक आहे. तो फिजिशीअन म्हणून प्रॅक्टीसही करतो. ब्रिटनमध्ये ‘आसामवॉच’ नावाची एक संघटना कार्यरत आहे. मानवाधिकारासाठी कामकरणारी ही संस्था आसाममधील लष्कराच्या कथित अत्याचारांचे मुद्दे संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सातत्याने उपस्थित करत असते. ही संस्था ‘उल्फा’साठी कामकरते, अशी भारतीय गुप्तचर संस्थांकडे ठोस माहिती आहे. डॉ. हजारिका या संस्थेशी संबंधित आहे. परंतु, संघटनेची सूत्र हाती देण्याइतका तो मोठा आहे, याबाबत गुप्तचर यंत्रणांना थांगपत्ता नव्हता.
१९९७ मध्ये जिनिव्हा येथे जगभरातील मूलनिवासी गटांची बैठक झाली होती. या बैठकीला परेश बरुआ आणि अनुप चेतीया हे ‘उल्फा’चे नेते उपस्थित होते. त्यांना तिथपर्यंत पोहोचविण्याचे काम डॉ. हजारिका उर्फ अभिजीत असमने केले होते. आसाममध्ये २०१३ मध्ये डॉ. हजारिकाच्या बाबत सर्वप्रथम जाहीर चर्चा झाली. ‘ईशान्य भारतातील सशस्त्र संघर्ष’ या विषयावर जिनिव्हा येथील मानवाधिकार संमेलनात बोलणार्या डॉ. हजारिका याच्या भाषणाची एक क्लीप आसमाच्या टीव्ही चॅनलनी प्रसारित केली. आसामच्या सार्वभौमत्वावर बोलणारा हा डॉक्टर कोण? असा प्रश्न गुप्तचर यंत्रणांनाही पडला होता. परंतु, हीच व्यक्ती अभिजीत असम आहे, हे तेव्हाही गुपितच होते. परंतु, गुप्तचर यंत्रणा सजग झाल्या होत्या. २०१५ मध्ये नागाव जिल्ह्यातील राधाकांत बरुआ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डॉ. हजारिकाने टेबल टेनिस प्लॅटफॉर्म भेट म्हणून पाठवला होता. त्याचे वडील इथेच मुख्याध्यापक होते. तोही याच शाळेत शिकला होता. डॉ. हजारिका हाच अभिजीत असम असल्याची कुणकुण लागलेल्या गुप्तचर यंत्रणांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. त्यांचा संशय बळावला. गगन हजारिका याच्या अटकेनंतर गुप्तचर यंत्रणांच्या संशयावर शिक्कामोर्तब झाले. जुलै २०१७ मध्ये एनआयए कोर्टाने डॉ. मुकूल हजारिका उर्फ अभिजीत असम याच्या विरुद्ध अजामीन पात्र वॉरंट जारी केला आहे. आज ‘उल्फा’चा प्रभाव आसाममध्ये आटला असला तरी चीन आणि पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांशी त्यांचे मेतकूट आहे. भारतातल्या एनएससीएन, नक्षल चळवळींशी त्यांनी सूत जुळवले आहे. त्यामुळे त्यांची उपद्रव क्षमता कायमआहे. अशा परिस्थितीत डॉ. हजारिकाला भारतात आणण्यास केंद्र सरकारला यश आले, तर नरेंद्र मोदी सरकारचा हा दहशतवादाविरुद्ध मोठा विजय असेल. आसाममधील दहशतवादी कारवायांना यातून चाप बसेलच, शिवाय ‘उल्फा’ नेत्यांना पोसणार्या चीन आणि पाकिस्तानला योग्य तो संदेश मिळेल.
- दिनेश कानजी