सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मध्यस्थीने बहिष्कार मागे

    दिनांक  27-Dec-2017

दै. ‘मुंबई तरुण भारत’ इम्पॅक्ट

 
 
 
 
 
पालघर : वर्षानुवर्षे भेडसावणार्‍या रस्त्याच्या गंभीर समस्येमुळे सफाळे येथील कपासे डोंगरपाडा गावातील नागरिकांनी कपासे ग्रामपंचयतीच्या निवडणुकीत सर्वानुमते बहिष्कार टाकून उन्हातान्हात उभे राहून आपला संताप व्यक्त केला. यासंदर्भात दै. ’मुंबई तरुण भारत’च्या दि. २६ डिसेंबरच्या अंकात ’कपासे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर डोंगरपाडा ग्रामस्थांचा बहिष्कार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. यामुळे सर्वच यंत्रणेला खडबडून जाग आली. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उदय बंधू पाटील आणि सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जितेंद्र ठाकूर यांनी मध्यस्थीची भूमिका घेत रस्त्याची समस्या सोडविण्यास पुढाकार घेण्याची हमी दिल्याने नागरिकांनी बहिष्कर मागे घेत मतदान केले.
 
 
कपासे ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या कपासे डोंगरपाडा गावातील नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्य रस्त्यावर पोहोचण्यास रस्ताच उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. सद्यस्थिती नागरिकांना येण्या-जाण्यासाठी एक खाजगी जागेतून कच्चा व खड्डेमय पायवाटेचा आसरा घ्यावा लागतो. पावसाळ्यात मात्र याच रस्त्यावर कमरेइतकं पाणी साचल्याने येथील दैनंदिन नोकरदार वर्ग, विद्यार्थी, भाजी व दुध विक्रेते यांच्यासह गरोदर स्त्रिरा, रुग्ण व्यक्ती, मृत इसमाची प्रेतयात्रा आदी सर्वांना धोकादायक रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करावा लागतो. अशातच अपघातांच्या प्रसंगांचे सावट सतत नागरिकांच्या जीवावर बेतलेले असते.
 
 
याबाबत डोंगरपाडा गावातील नागरिकांनी स्थनिक ग्रामपंचायतीपासून संबंधित अधिकारीवर्गाकडे रस्त्याच्या समस्येबाबत दाद मागूनही कोणीच लक्ष देत नव्हते. यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी, दि २६ डिसेंबर रोजीच्या कपासे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा पवित्रा घेतला होता. सकाळपासूनच गावातील महिला, पुरुष, वृद्ध व्यक्ती, लहान मुले आदी सर्वच दिवसभर उन्हातान्हात उभे राहून आपला संताप व्यक्त करत होते. याबाबत दै. ’मुंबई तरुण भारत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला जाग आली. त्यानुसार पालघर तहसीलदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांना ग्रामस्थांशी चर्चा करण्यात पाठविले होते. त्याचप्रमाणे गावातील सामाजिक कार्यकर्ते उदय बंधू पाटील आणि सफाळे पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी ग्रामस्थांची भेट घेतली.
 
 
यावेळी ग्रामस्थांनी आपल्याला रस्त्याअभावी भेडसावणार्‍या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानुसार उदय पाटील यांनी सदर खाजगी जागेतील बिपीन पाटील व इतर सर्व मालकांशी बोलून व प्रशासकीय कायदेशीर बाबींची पूर्तता करून ६ महिन्यांत रस्त्याची समस्या सोडविण्याची हमी ग्रामस्थांना दिली. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आपला बहिष्कार मागे घेत मतदानाचा हक्क बजावला.