हिंदुत्त्वाच्या प्री नर्सरीत राहुल

    दिनांक  23-Dec-2017   
 
राहुल गांधी यांनी गुजरात निवडणूक प्रचाराची सुरुवात अनेक मंदिरांना भेट देऊन, आरती करून, प्रसाद ग्रहण करून केली. लगेच वर्तमानपत्रांनी त्यावर टिपणी लिहायला सुरुवात केली की, राहुल गांधी मवाळ हिंदुत्त्वाची कास धरीत आहेत. कॉंग्रेसची प्रतिमा ‘हिंदूविरोधी पक्ष’ अशी झाली. ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करीत आहेत. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ अशी शिवी दिली. परिणामी गुजरातच्या जनतेने कॉंग्रेसला कोपर्‍यात नेऊन बसविले. ‘मुसलमानांचा पक्ष घेता का? मग भोगा आपल्या कर्माची फळे,’ असे गुजरातच्या जनतेने कृती करून दाखविले. २०१४ च्या निवडणुकीत देशाच्या जनतेने त्यावर मोहर उमटविली. आणि कॉंग्रेसला जाग आली.
 
आपला वारस हिंदूविरोधी असू नये, म्हणून या वारशाला मंदिरांचे उंबरठे झिजवायला लावले. हिंदुत्त्वाच्या शाळेत राहुल गांधी आज तरी प्री नर्सरीमध्ये आहेत. मंदिरात गेल्याने कोणी हिंदुत्त्ववादी होत नाही आणि न गेल्याने तो हिंदुत्त्ववादी नाही असे होत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मंदिराच्या यात्रा केल्या असे त्यांच्या चरित्रात वाचायला मिळत नाही, परंतु ते हिंदुत्त्वाचे भाष्यकार समजले जातात आणि स्वामी विवेकानंदांनी मंदिर दर्शनाची देशव्यापी यात्रा केली, तेही हिंदुत्त्वाचे महान भाष्यकार मानले जातात. मंदिरात जाणार्‍या आणि न जाणार्‍या ज्याला समजला त्याला हिंदुत्त्व समजले. ‘टिळा, टोपी, माळा| कंठी क्रोधाचा उमाळा|’ हा खरा भक्त नव्हे, असे तुकोबाराय सांगून गेले. टिळा, टोपी, माळा, अबीर, गुलाल, याने कुणी हिंदुत्त्ववादी होत नाही.
 
कॉंग्रेसचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास काय सांगतो? इतिहास हे सांगतो की, कॉंग्रेसने देशातून हिंदुत्त्व चिरडण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. पहिला प्रयत्न महात्मा गांधींच्या खुनात सावरकरांना गोवण्याचा केला. दुसरा प्रयत्न गांधी हत्येत संघाला गोवण्याचा केला आणि संघावर बंदी घातली. तिसरा प्रयत्न रामजन्मभूमीचा प्रश्न सडत ठेवला, चौथा प्रयत्न काशीतील बाबा विश्र्वनाथाचे मंदिर आणि मथुरेचे कृष्णाचे जन्मस्थान मशीदयुक्त ठेवले, सोमनाथाचे मंदिर बांधण्यास विरोध केला. हिंदू दहशतवाद हा शब्द शोधून काढला, त्याचेच पुढचे रूपांतर भगवा दहशतवाद याच्यात झाले. रामसेतू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. रामऐतिहासिक पुरूष नसून काल्पनिक पात्र आहे असे न्यायालयाला सांगतिले. हिंदू मंदिरे ताब्यात घेऊन भाविकांनी त्यात दिलेला पैसा, अन्य कामासाठी वळविला, मशिदी, दर्गे आणि चर्च यांना हात लावला नाही. हजयात्रेला जाणार्‍या मुसलमानांना भरपूर अनुदान दिले आणि काशीयात्रेला जाणार्‍या हिंदूंना चेंगरून मरू दिले. हे कॉंग्रेसचे हिंदुत्त्व आहे. ते विसरणे म्हणजे दुर्योधन विसरणे, रावण विसरणे, अफजल खान विसरणे, औरंगजेब विसरणे होय. म्हणून राहुल गांधींच्या मंदिरभेटीचे स्वागत फार सावधपणे करायला पाहिजे. साठ वर्षांत घडलेला स्वभाव दोन दिवसांत बदलता येत नाही.
 
प्री नर्सरीत असलेल्या राहुल गांधी यांनी, हिंदुत्त्वाच्या नर्सरीत किंवा पूर्व प्राथमिक शाळेत जाण्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत. या काही गोष्टी अशा आहेत की, त्या आज तरी राहुल गांधी करू शकत नाहीत. उद्या देशातील हिंदूंनी मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही कानशिलात वाजविल्याशिवाय या गोष्टी ते करू शकणार नाहीत. या गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट त्यांनी हिंदू समाजाची माफी मागण्याची आहे. त्यांनी पहिली माफी मृत्यूंजय सावरकरांचा पदोपदी अपमान केल्याबद्दल मागितली पाहिजे. दुसरी माफी, गांधी हत्येत संघाचा काहीही हात नसताना, माझ्या पणजोबांनी त्यात संघाला गोवून चूक केली, याची मागितली पाहिजे. तिसरी माफी त्यांनी घटनेत ३७० कलमघुसवून, काश्मीरचा प्रश्न निर्माण केला आणि काश्मीरमधील हिंदूंना देशोधडीला लावले याबद्दल मागितली पाहिजे. अयोध्या, काशी, मथुरा संबंधात गेल्या ६७ वर्षात कॉंग्रेसने काहीही केले नाही, त्याबद्दल हिंदूंची माफी मागितली पाहिजे. मानस सरोवर चीनला दान दिले, त्याबद्दल हिंदूंची माफी मागायला पाहिजे. गंगा अपवित्र करून टाकली त्याबद्दल क्षमा मागायला पाहिजे. राहुल गांधींकडून या क्षमायाचनेची अपेक्षा करणे म्हणजे सुकलेल्या आंब्याच्या खुंटाला पालवी फुटण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. आज त्यांचा प्रवास सोमनाथ मंदिर ते गुजरातमधील अन्य लहान-मोठी मंदिरे एवढाच झालेला आहे, एवढ्याने राहुल गांधींना ते जानवेधारी हिंदू आहेत, म्हणून कोणी स्वीकारणार नाहीत. खरं म्हणजे जानव्याचा आणि हिंदुत्त्वाचादेखील काहीही संबंध नाही, हिंदू असण्याचाही काही संबंध नाही. हिंदू ही एक मनोभावना आहे आणि समूहदृष्ट्या विचार करता ती एक जीवनपद्धती आहे. राहुल गांधींच्या सल्लागारांपुढे या बाबतीत राहुल गांधींचे पाठ घेणे, हे मोठे कामआहे. आपण आशा करूया की, त्यांच्या सल्लागारांना हिंदूंची मनोभावना म्हणजे काय आणि हिंदू जीवनपद्धती म्हणजे काय, हे समजले असेल. राहुल यांच्या नावात ‘ग़ांधी’ आहेत. गांधी म्हणजे सनातनी आणि कर्मठ हिंदू, पण तितकेच दुसर्‍याशी व्यवहार करताना अत्यंत उदार, सर्वांना आपल्या छत्रीखाली घेणारे. डॉ. आंबेडकरांनी गांधीजींचा जन्मभर विरोध केला, त्या आंबेडकरांना गांधीजींनी संविधान सभेत घेण्यास नेहरू-पटेल यांना सुचविले. चेन स्मोकर्स असणार्‍या डॉ. लोहियांना गांधीजींनी आपल्या जवळ केले. स्वतः कर्मठ राहा, परंतु ती दुसर्‍यावर लादू नका हा गांधीजींचा संदेश आहे. भगवद्गीता ही गांधीजींना प्रमाण होती. गांधीजींनी एकादशव्रताचा आग्रह धरला. राहुल गांधींच्या सल्लागारांनी हे गांधी राहुलजींना सांगितले पाहिजेत. गीता म्हणजे काय, व्रत म्हणजे काय, हे समजले की हिंदुत्त्व समजण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. मंदिरात जाण्याशी त्याचा काही संबंध नाही.
 
काही पत्रपंडित सुतावरून स्वर्गाला जात असतात. गुजरातमध्ये राहुल गांधींनी मवाळ हिंदुत्त्वाचा प्रयोग केला, या पत्रपंडितांनी निष्कर्ष काढला की, तो यशस्वी झाला. म्हणून याच पत्रपंडितांनी २०१८साली होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही करतील आणि मोदींना हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरदेखील आव्हान देतील. हिंदुत्त्वाचा मुद्दा हा मोदींचा एकमेव मुद्दा राहणार नाही. शेख महम्मदी स्वप्नात रमणार्‍यांना आपण रमू द्यावे, पण लक्षात ठेवले पाहिजे की, हिंदू जनता अशिक्षित असली, भोळी असली, श्रद्धाळू असली, तरी ती बावळट नाही. या जनतेला साधूच्या वेशात भिक्षेसाठी रावण आलेला आहे, हे नक्कीच समजतं. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राहुल गांधी यांची ’हिंदू’ या विषयावर अजिबात तुलना होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी बालपणापासून संघस्वयंसेवक आहेत, संघाच्या तृतीय वर्षाचे त्यांचे शिक्षण झालेले आहे, तृतीय वर्षापर्यंत जेव्हा एखादा स्वयंसेवक जातो, तेव्हा त्याच्या हिंदुत्त्वाचा पाया, भूकंपानेदेखील डळमळीत होणार नाही इतका मजबूत झालेला असतो. ते प्रचारक होते, प्रचारक म्हणजे ज्याने आपले जीवन मातृभूमीच्या चरणी समर्पित केलेले आहे, तो देशासाठी जगतो, देशासाठी तो अपार कष्ट करतो, त्याच्या डोळ्यापुढे एकच लक्ष्य असते, ’’देश मोठा झाला पाहिजे, समाज संघटित झाला पाहिजे, सार्वत्रिक बंधुभाव निर्माण झाला पाहिजे.’’ हे जगणे म्हणजे हिंदूपण किंवा हिंदुत्त्व.
 
राहुल गांधी आज नेमके कुठे आहेत? लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ते प्री नर्सरीत आहेत. हिंदू म्हणून मोदींशी मुकाबला त्यांना करायचा असेल तर, त्यांना संघात गेले पाहिजे आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे शिक्षण केले पाहिजे. ते तर अशक्य आहे, मग दुसरा पर्याय कोणता? तो त्यांनीच शोधायचा आहे. कोणताही पर्याय शोधला तरी नरेंद्र मोदींशी ते हिंदू या विषयावर टक्कर देऊ शकत नाहीत. त्याचे खरे कारण मोदींचे हिंदुत्त्व जीवननिष्ठेतून आलेले आहे आणि राहुल गांधींचे हिंदुत्त्व मतनिष्ठेतून आलेले आहे. ही मतनिष्ठा माणसाला कशी नाचवील, हे सांगता येत नाही. राहुल गांधी भावी काळात मतांसाठी काय काय नाच करतील हे आपल्याला बघत बसावे लागेल. आजवर कॉंग्रेसने आपली विचारधारा सेक्युलॅरिझमची आहे हे सांगितले. कोणत्याही प्रकारची सांप्रदायिकता कॉंग्रेस स्वीकारू शकत नाही, हेदेखील सांगितले. हा सेक्युलॅरिझमइंदिरा गांधींनी राज्यघटनेच्या प्रीएम्बलमध्ये बदल करून देशावर लादला. ज्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि ज्यांची जीवनपद्धती सर्व उपासना मार्गांचा सन्मान करणारी आहे, परमेश्र्वर एक असून त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग असंख्य असतात, त्या हिंदू समाजाला सेक्युलॅरिझमसांगणे हा मोठा विनोद आहे. कॉंग्रेसने सेक्युलॅरिझमचा अर्थ जातवाद, धर्मवाद, संप्रदायवाद, असा करून त्याच्या मतबँका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही काळ हा प्रयोग यशस्वी झाला. तो हिंदूंच्या मूळ स्वभावाशी मेळ खाणारा नसल्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे वाढत गेला. राहुल गांधींना मवाळ हिंदुत्त्वाची कास जरी धरायची असली तरी आपल्या आजीने आणलेल्या सेक्युलॅरिझमचे काय करायचे आणि पणजोबांनी आणलेल्या नेहरूवियन मॉडेलचे काय करायचे याचा विचार करावा लागेल, म्हणजे त्याला नाकारावे लागेल. घराणेशाहीत ते शक्य नसते. म्हणून राहुल गांधींचे मवाळ हिंदुत्त्व गचाळ हिंदुत्त्वच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
 
 
- रमेश पतंगे