गौप्यस्फोट आणि आपटी बार !

    दिनांक  23-Dec-2017   


विरोधक म्हणून नैसर्गिकरित्या मिळणारी स्पेस कॉंग्रेस व राष्ट्रवादीसारखे खरेखुरे विरोधकच गमावत चालले असून ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. अर्थात, त्यासाठी हल्लाबोलसारखी स्टंटबाजी करत राहणं आणि पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजराचे खेळ सुरू करणं, याच्या पलीकडे जाऊन राज्यातील खर्‍याखुर्‍या प्रश्नांना पूर्ण ताकदीनिशी भिडण्याचं धाडस या पक्षांना करावं लागेल.
शुक्रवारचा दिवस, दुपारी साधारण दोन-अडीचची वेळ. नागपुरात दोन आठवडे चाललेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस. दोन्ही सभागृहांच्या कामकाजातून वेळ काढत मंत्री, आमदार, त्यांचे कर्मचारी, पत्रकार आदी मंडळी जेवणं आटोपून घेत होती, तोवर पत्रकारांच्या वेगवेगळ्या व्हॉटस्‌ऍप ग्रुप्समध्ये एक संदेश फिरू लागला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे थोड्याच वेळात एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत ! पटापट जेवणं आटोपून बरेच पत्रकार विधानसभेत पोहोचले. विद्यमान मुख्यमंत्र्यांशी असलेल्या मैत्रीची जाहीर कबुली देणारे विखे आता काय गौप्यस्फोट करणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अंतिमआठवडा प्रस्तावावर विखे-पाटील बोलू लागले. भाषण सुरू होऊन पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली तरी गौप्यस्फोट काही होईना. अखेर नागपुरातील एक स्थानिक गुंड नागपूरपासून २२ किमी. अंतरावर एका फार्महाऊसवर लपला आहे, असा (विखेंच्या मते) फारच मोठं वक्तव्य त्यांनी केलं खरं, मात्र लागलीच समोर बसलेल्या गिरीश बापटांनी गुंडांना लपवण्याची कला कॉंग्रेसइतकी कोणाला माहीत असणार? असा टोला लगावत विखेंच्या स्फोटातील हवाच काढून घेतली आणि राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचा हा गौप्यस्फोट अखेर दिवाळीतला आपटी बारच ठरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या वक्तव्याची साधी दखलही घेतली नाही. दर अधिवेशनाप्रमाणेच मग याही वेळी सभागृहात गपगार पडलेल्या विरोधकांनी अधिवेशन संपताच सभागृहाबाहेर येऊन कॅमेर्‍यापुढील बाईटबाजीचा आधार घेतला. त्यामुळे अखेर दैव देतं आणि कर्म नेतं अशा अवस्थेतच याही अधिवेशनाची सांगता झाली. दोन आठवडे चाललेल्या अधिवेशनाचा डोंगर पोखरून साधा उंदीरही काढण्यात विरोधक साफ अपयशी ठरले. जेव्हा विरोधी पक्षनेता गौप्यस्फोट वगैरे करू लागतो तेव्हा आता विखे-पाटील भाजपप्रवेशाची घोषणा करणार अशा स्वरूपाचे विनोद प्रसारित होऊ लागतात. खुद्द विरोधी पक्षनेत्याची ही तर्‍हा तिथे इतरांची काय वेगळी अवस्था असणार? मागील आठवड्यात पहिले दोन दिवस सभागृहात केलेली घोषणाबाजी वगळता संपूर्ण अधिवेशनात विरोधकांचं अस्तित्व शून्य होतं. विरोधक म्हणजे सरकारवर वचक ठेवणारे, अंकुश ठेवणारे या संकल्पना आता इतिहासजमा झाल्यासारखं वाटावं, इतकी ही बिकट अवस्था आहे. याउलट भाजप आणि शिवसेनेचे आमदार सरकारवर चांगला अंकुश ठेवतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संपूर्ण अधिवेशनात हाच ट्रेंड दिसून आला. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे ऍड. आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे सुनील प्रभू, प्रकाश आबिटकर, प्रकाश सुर्वे आदी मंडळींनीच वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर आपापले मुद्दे लावून धरत, प्रसंगी आक्रमक होत सरकारवर वचक ठेवण्याचं कामकेलं. यामुळे सत्तेतही भाजप-सेना आणि विरोधातही भाजप-सेनाच असं गमतीदार चित्र बहुतांश वेळा पाहायला मिळालं. नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांपासून हे सुरू असून तेच आता हळूहळू विधिमंडळ कामकाजातही दिसू लागलं आहे. विरोधक म्हणून नैसर्गिकरित्या मिळणारी स्पेस कॉंग्रेस व राष्ट्रवादीसारखे खरेखुरे विरोधकच गमावत चालले असून ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. अर्थात, त्यासाठी हल्लाबोलसारखी स्टंटबाजी करत राहणं आणि पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजराचे खेळ सुरू करणं, याच्या पलीकडे जाऊन राज्यातील खर्‍याखुर्‍या प्रश्नांना पूर्ण ताकदीनिशी भिडण्याचं धाडस या पक्षांना करावं लागेल.

हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे पहिल्या आठवड्याचे पहिले दोन दिवस वाया गेल्यानंतरही तिसर्‍या दिवसापासून अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत, सकाळी दहा वाजल्यापासून रात्री सात, आठ, नऊपर्यंत मॅरेथॉन कामकाज चालवण्यात सरकारला यश मिळालं. विधानसभेने एकूण १९ विधेयके संमत केली तर विधान परिषदेसह दोन्ही सभागृहांत मिळून एकूण ११ विधेयके संमत करून घेण्यात सरकार यशस्वी ठरलं. यामध्ये शिक्षण, महसूल, सहकार आदी विभागांशी संबंधित काही महत्त्वाच्या विधेयकांचाही समावेश आहे. अधिवेशन संपत असतानाच पुढील नागपूर अधिवेशन हे हिवाळ्याऐवजी पावसाळ्यात घेण्याचे संकेत संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापटांनी दिल्यामुळे सर्वपक्षीय आमदारांना ऐन कडाक्याच्या थंडीत घामफुटला. जून-जुलैत नागपुरात महिनाभर राहणं हे तसं जोखमीचं काम. अखेरच्या दिवशी ही कल्पना माझीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगताच आमदारांची आणखी अडचण झाली. आता कामकाज सल्लागार समितीपुढे हा मुद्दा जाईल, तेव्हाच यावर निर्णय होईल. तूर्तास तरी असं काही होऊ नये अशीच प्रार्थना आमदार, अधिकारी, पत्रकार यांच्यापासून ते पोलीस, कर्मचारी आदींपर्यंत सर्वजण करताना दिसत आहेत. भाजप-सेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी ही जुनी जोडपी हळूहळू पुन्हा जवळ येऊ लागल्याचं मागील आठवड्यातील चित्र दुसर्‍या आठवड्यातही दिसून आलं. नाही म्हणायला राष्ट्रवादीसोबत फरफट नको म्हणत जुन्या कॉंग्रेसींचा एक गट नाराज आहे. परंतु, त्यांना सध्या कोणी वाली दिसत नाही. त्यामुळे हल्लाबोलमध्ये कॉंग्रेसने बरीच मेहनत करून हवा राष्ट्रवादीने खाल्ल्यावरही केवळ चरफडत बसण्याशिवाय या गटाच्या हातात काही उरलेलं नाही. अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश यात होईल. त्यामुळेच अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विदर्भाच्या क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला तेव्हा अजित पवारांनी त्यावर आक्षेप घेत हा काय संपूर्ण महाराष्ट्राचा संघ आहे का? विदर्भाच्या वेगळ्या संघाचं अभिनंदन करून नवा पायंडा पडेल, असं म्हणत मुद्दा भलतीकडेच न्यायचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जरा खुल्या मनाने अभिनंदन करा की, असं सुनावताच समोरून चक्क पृथ्वीराजबाबांनी खुश होऊन बाकं वाजवली, ही बाब अनेकांच्या नजरेतून सुटली नाही.
भाजप-सेना मंत्री आणि आमदारांची सिझनल केमिस्ट्री रत्नागिरीच्या रिफायनरी प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादंगानंतरही फारशी बिघडलेली दिसली नाही. मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी कोकणात आणावी यासाठी मी स्वतः आणि शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत यांनीच आग्रह केला होता, ही बाब ऐन अधिवेशन काळातच उघड करत सेनेची चांगलीच अडचण केली. आता राजापुरात लोकांना काय उत्तरं द्यायची? या विचाराने चिंताग्रस्त झालेले विनायक राऊत रोज नवे खुलासे करत बसले आहेत. हा प्रकल्प व्हायचा तेव्हा होईलच मात्र सेनेच्या नेत्यांचा खरा चेहरा उघड झाल्यामुळे कोकणात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमध्येच अधूनमधून होणारे विनोद, टोमणे आणि हास्यकल्लोळ यामुळे अधिवेशन आणखी रंगतदार झालं. यावेळी भाजपचे राज पुरोहित, मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे सुनील प्रभू हे विशेष आकर्षण होते. सत्ताधार्‍यांच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने राज पुरोहित सध्या भलतेच खुशीत आहेत तर गिरीश महाजन जळगावात बिबट्याच्या पाठी पिस्तुल घेऊन धावण्याची घटना अद्याप ताजी आहे. यावरून जयंत पाटील, अजित पवार यांनी या दोघांची यथेच्छ फिरकी घेत सभागृहाचं चांगलंच मनोरंजन केलं. याशिवाय शिवसेनेने सत्ता सोडण्याचे इशारे देण्यावरून आमदार सुनील प्रभूंना डिवचण्याची संधीही विरोधकांनी सोडली नाही. शिवसेनेने दिला सत्ता सोडण्याचा ९५ वा इशारा, आता शिशुपालाचे १०० अपराध कधी होणार? असे टोमणे मारत विखे-पाटील, अजित पवार, जयंत पाटील आदींनी चांगलीच धमाल उडवून दिली.

खास वैदर्भीय हिवाळ्यात गारठलेल्या यावर्षीच्या नागपूर अधिवेशनाची अखेर सांगता झाली आणि घरच्या, गावाच्या वा आपापल्या मतदारसंघाच्या (की आणखी कशाच्या?) ओढीने सर्वपक्षीय आमदार नेतेमंडळींनी लगोलग नागपुरातून काढता पाय घेतला. आता दि. २६ फेब्रुवारीपासून राजधानी मुंबईत होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत किती फटाके शिल्लक राहतात, टिकतात आणि किती नव्याने दाखल होतात, हे पाहणं भलतंच औत्सुक्याचं ठरणार आहे...!
निमेश वहाळकर