माझे वाचन माझा मितवा

21 Dec 2017 01:00:00

 
एखादा दिवस उगवत्या सूर्याबरोबर कंटाळा घेऊन येतो. ह्या शब्दाची लागण इतकी जबरदस्त असते की, एखाद्याची जांभई बघून जशी दुसऱ्याला जांभई येते. तसं हा शब्द वाचला किंवा उच्चारला तरी आपल्याला पण कंटाळा यायला लागलाय अशी भावना होऊ शकते.
 
 
कंटाळ्याला स्थळ काळाचं काही बंधनच नाही. निरभ्र आकाशात अचानक ढग दाटून यावेत तसा हा कंटाळा तना – मनाला व्यापून टाकतो. काहीच करावसं वाटत नाही. एरवी वेळे अभावी करायला न मिळालेल्या गोष्टी अशा वेळी आठवू लागतात. त्यात तरी मन रमेल अशा कल्पनेने त्या करायला जावं तर त्या सुद्धा कराव्याशा वाटत नाहीत. खूप राग येतो स्वतःचा. आपण संपत चाललो आहोत असा भीतीदायक विचार मनात घर करायला लागतो. कंटाळा कसा घालवावा हा एकाच विचार सतत घोंघावत राहातो. अचानक, एका मुलाखतीत वाचलेले माननीय अनिल अवचटांचे विचार आठवतात. त्यांनाही कधी कधी असा कंटाळा येतो. त्यांच्या आवडीचे बासरी वादनही त्यांना करावेसे वाटत नाही. जेंव्हा असा कंटाळा येतो तेंव्हा ते म्हणतात, “ ये बाबा कंटाळ्या ये. जितका वेळ यायचंय तुला तितक्या वेळ ये” पुढे ते म्हणतात, “कंटाळा जसा येतो तसाच तो जातोही”.
 
 
इतक्या मोठ्या प्रथितयश माणसालाही जर कंटाळा येत असेल तर आपण कशाला अस्वस्थ व्हायचं? हुश्श वाटतं मग मनाला. नॉर्मल आहोत तर आपण!
 
 
आपण वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या बऱ्याच गोष्टी अशा मनात घर करून सुप्तावस्थेत बसलेल्या असतात. योग्य त्या मोसमाची वाट बघत एखादा कंद जसा जमिनी खाली असावा आणि योग्य वेळ येताच जमिनीतून तरारून वर आलेल्या हिरव्या पातीतून त्याचं अस्तित्त्व जाणवावं. तसेच वेळ आल्यावर हे सर्व संदर्भ मनाच्या भूमीतून तरारून वर येतात.
 
 
वस्त्रप्रावरणाची मोहमयी मायानगरी, भुलवणाऱ्या जाहिराती, बक्षिसांची लालूच. पाय आपसूकच वळतात तिथे. पेज-थ्री वर पाहिलेली, बड्या उद्योगपतीच्या सेलिब्रिटी पत्नीची, सोनेरी जरतारी साडी डोळ्यासमोर येत असते. अगदी तश्शीच नाही तर तशासारखी तर नक्कीच मिळू शकते आपल्याला. प्रदर्शनात एका कोपऱ्यात असलेल्या पुस्तकांच्या stall समोरून जाताना, एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सुधा मूर्ती दिसतात. त्यांच्याबद्दल वाचलेलं आठवतं कि गेली २१ वर्षे त्यांनी एकही साडी खरेदी केलेली नाही. परवडत नाही म्हणून नव्हे तर गरज नाही म्हणून. प्रदर्शनातून रिकाम्या हाताने परत फिरून देखील मनाला समाधान असतं वायफळ खरेदी टाळता आली आपल्याला, या गोष्टीचं!
 
 
कधी कधी गृहिणी या नात्याने रोज पार पाडाव्या लागणाऱ्या गोष्टी या फोलपणाच्या वाटू लागतात. सर्वच निरर्थक वाटू लागतं. आपले स्थान काय सर्वांच्या आयुष्यात? आपली खरच गरज आहे कां या घराला? असे प्रश्न सतावू लागतात मनाला. अचानक, कधीतरी, कुठेतरी वाचलेली गोष्ट आठवते.
 
 
एका मंदिराच्या बांधकामात तीन पाथरवट दगड तासण्याचं काम करत असतात. एक पांथस्त त्यांना “ तुम्ही काय करताय?” असा प्रश्न विचारतो. पहिला पाथरवट म्हणतो, “ मी माझ्या बायकामुलांची आणि माझी पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी हे मजुरीचे काम करतोय “. दुसरं म्हणतो “ मी पाथरवट आहे. मी माझे कौशल्य वापरून दगड तासतोय. त्यातून मला रोजगारही मिळतो. चरितार्थ चालतो.” तिसरा म्हणतो, “ माझं कौशल्य वापरून मी पण चरितार्थ चालवतोय पण इथे एक भव्य मंदिर उभारलं जाणार आहे. या उभारणीच्या कामाला छोटासा हातभार लावण्याचं कार्य माझ्याहातून या निमित्तानं होतंय याचा मला आनंद आहे. “
 
 
गृहिणी म्हणून माझ्या कामाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जाते ही कथा. गृहिणीच नाही तर कोणत्याही नोकरदार माणसाने सुद्धा आपल्या कामाला ही कथा जोडून पाहावी. व्यावसायिकाने आपल्या व्यावसायिक प्रगतीची सांगड देशाच्या उत्कर्षाशी घालून बघावी. दृष्टीकोनात अमूलाग्र फरक जाणवेल. पोटापाण्यासाठी केलेला उद्योग असं स्वरूपच राहणार नाही नोकरीचं किंवा व्यवसायाचं. एका खूप मोठ्या साखळीमधला एक छोटासा पण खूप महत्त्वाचा दुवा बनून जातो आपण. परिमाणच बदलून जातं आपल्या कामाचं.
 
 
काही वेळा खूप मनापासून केलेल्या एखाद्या कामाची दखलच कोणी घेत नाही. आत्मविश्वास डळमळू लागतो. आपल्याच कर्तुत्त्वाविषयी शंका मनात उत्पन्न व्हायला लागतात. अशा वेळी अनेक कलाकारांच्या स्ट्रगल बद्दल वाचलेले लेख आठवू लागतात. २० – २० वर्षे नाट्यक्षेत्रात उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असूनही एकही पारितोषिक न मिळालेले ‘ नथुराम ‘ फेम शरद पोंक्षे असतील किंवा आवाज चांगला नाही हे कारण देऊन, all india radio ने announcer म्हणून job नाकारलेले अमिताभ बच्चन असतील. प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर, आपल्या ठरवलेल्या मार्गावर चालून, अथक प्रयत्नाने आज त्यांनी आपापल्या क्षेत्रात मिळवलेले स्थान पाहून विस्मय वाटतो आणि आपल्यालाही प्रेरणा मिळते. एके दिवशी आपणसुद्धा आपले ध्येय गाठू असा विश्वास वाटतो.
 
 
कोणी लिहिलेलं, कोणत पुस्तक, कुठली आवृत्ती, कोणत पान, कोणता परिच्छेद असे मुद्दे गैरलागू ठरतात. किती वेळा तर पुस्तकाचे नांव किंवा लेखक आठवतही नाही. आयुष्यातल्या कोणत्याही वळणावर, आपल्या गरजेप्रमाणे, असे काहीतरी वाचलेले, दीपस्तंभाप्रमाणे आशेचे किरण होऊन येते. भरकटण्यापासून वाचवते, आयुष्याला नवा अर्थ देते. प्रत्येक समस्येला उत्तर असते असा विश्वास जागवते. जगण्याची नवी उमेद देते.
 
 
कधीतरी सहज म्हणून केलेले, कधी अभ्यासाच्या निमित्ताने केलेले, कधी कोणी सांगितले म्हणून केलेले तर कधी ठरवून केलेले विविध प्रकारचे वाचन, ‘ मितवा ‘ होऊन आयुष्यभर उपयोगी ठरते. कधी मित्र, कधी तत्त्वज्ञ तर कधी वाटाड्या! माझे वाचन – माझा मितवा!
 
 
- शुभांगी पुरोहित 
Powered By Sangraha 9.0